Sunday, 23 August 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 23 AUGUST 2020 TIME – 7.10 AM

 

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 August 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि.

****

** राज्यांतर्गत तसंच आंतरराज्य प्रवासी आणि मालवाहतुकीवर निर्बंध न घालण्याच्या केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना

** सुखकर्त्या- विघ्नहर्त्या गणरायाचं कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेत आगमन

** दिल्लीतल्या निजामुद्दीन मरकज प्रकरणातल्या तबलिगि जमातच्या नागरिकांविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात दाखल गुन्हे रद्द करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश 

** राज्यात १४ हजार ४९२ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, २९७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

** मराठवाड्यातही ३० बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवे एक हजार १२९ रुग्ण 

** आणि

** नांदेड जिल्ह्यात माहूरच्या तहसिलदारांकडून खंडणी वसूल करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन तालुका अध्यक्षांसह पाच जणांना अटक, अटक झालेल्यांमध्ये पत्रकारांचाही समावेश

****

राज्यांतर्गत तसंच आंतरराज्य प्रवासी आणि मालवाहतुकीवर निर्बंध घालू नयेत, असं केंद्र सरकारनं राज्य सरकारांना सूचित केलं आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी एका पत्राद्वारे राज्य तसंच केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना ही सूचना केली आहे. विविध राज्यं तसंच जिल्ह्यांद्वारे वाहतुकीवर निर्बंध घातले जात असल्याचं निदर्शनास आलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यांतर्गत किंवा आंतरराज्य वाहतुकूसाठी ई पासची आवश्यकता नसल्याचंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे लागू असलेली टाळेबंदी हटवण्याच्या प्रक्रियेत सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन केलं जावं, असंही केंद्रीय मुख्य सचिवांनी सूचित केलं आहे. 

****

मुंबईतल्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिमचा पाकिस्ताननं, पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटना आणि म्होरक्यांच्या यादीत समावेश केला आहे. याबाबत पाकिस्तान सरकारनं जारी केलेल्या पत्रकात दाऊद इब्राहिम कराची शहरात राहत असल्याचं नमूद केलं आहे.

****

नवी दिल्लीत गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या इसीस संघटनेच्या संशयित दहशतवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधील बलरामपूर इथला हा रहिवासी असून मोहम्मद मुस्तकीम खान असं त्याचं नाव आहे. त्याच्याकडून अत्याधुनिक स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. धौला कुआँ आणि करोल बाग मार्गावर शुक्रवारी रात्री त्याला अटक करताना गोळीबार करावा लागल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

****

सीमा सुरक्षा दलानं पंजाबमध्ये भारत पाकिस्तान सीमेनजिक तरणतारण जिल्ह्यात केलेल्या कारवाईत पाच पाकिस्तानी घुसखोर मारले गेले. शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री घुसखोरांच्या हालचाली जाणवल्यानंतर सीमा सुरक्षा दलानं या परिसरावर लक्ष केंद्रीत करून कारवाई सुरू केली होती. सुरक्षा दलाच्या तुकडीनं घुसखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला, घुसखोरांनी या तुकडीवर गोळीबार सुरू केल्यानंतर सैनिकांनी दिलेल्या प्रत्युत्तरात हे घुसखोर मारले गेले. घुसखोरांजवळची नऊ किलो अंमली पदार्थ असलेली नऊ पाकीटं तसंच ए-के ४७ बंदूक, चार पिस्तुलं आदी शस्त्रास्त्र तसंच ६१० रुपयांचं पाकिस्तानी चलन जप्त करण्यात आल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं.

****

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिल्लीतल्या निजामुद्दीन मरकज प्रकरणातल्या तबलिगि जमातच्या देश आणि परदेशी नागरिकांविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात दाखल असलेले गुन्हे रद्दबातल केले आहेत. सरकारनं आपत्तीच्या काळात स्वत:ची जबाबदारी विसरुन ठराविक लोकांवर कोरोना विषाणू संसर्गाचं खापर फोडल्याचं मतही न्यायालयानं व्यक्त केलं. यासंबंधी दाखल तीन याचिकांची सुनावणी करताना न्यायालयानं, संबंधित परदेशी नागरीक भारत सरकारच्या वैध व्हिसावर आले होते, असं नमूद करत, यासंबंधी अहमदनगरमध्ये दाखल असलेले ३५ गुन्हे आणि दोषारोपपत्र रद्द करण्याचे आदेश दिले.

****

अभिनेता सुशांतसिंह राजपुत आत्महत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयच्या विशेष पथकानं काल त्याच्या वांद्रे इथल्या घराची तपासणी केली. यावेळी या अधिकार्यांनी सुशांतसिंहच्या आत्महत्येचा प्रसंग पुन्हा बनवून तपासला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

**** 

सुखकर्त्या विघ्नहर्त्या गणरायाच्या दहा दिवसांच्या उत्सवाला काल पारंपरिक पद्धतीनं, मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेत प्रारंभ झाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत `वर्षा` निवासस्थानी गणरायाचं स्वागत केलं. त्यावेळी जनतेला संबोधताना मुख्यमंत्र्यांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर योग्य काळजी घेत गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले

...

 

उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवा कुठे गर्दी करू नका एकमेकांपासून अंतर ठेवून हा सार्वजनिक ठिकाणी तोंडावरती मास्क, सतत हात धुवत रहा या काय आपल्या उपाययोजना आहेत त्याचं भान कधी हरपू देऊ नका आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण सुजाण आहात जागृती ही आपल्या आलेली आहे या सर्वांचे पालन करून आपण हा उत्सव साजरा कराल आणि मला खात्री आहे ,आत्मविश्वास आहे.

मुंबईत सव्वा लाख घरगुती आणि दहा हजार सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना झाली. संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांनी साध्या पद्धतीनं उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून उत्सवावर नजर ठेवली जाणार असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवी मुंबईत फक्त ८४ गणेश मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा १९३ होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाटे ३ वाजेपासून घरोघरी गणपती बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. धुळे तसंच सातारा जिल्ह्यातही ढोल-ताशाच्या गजरात गणरायाचं आगमन झालं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात घरोघरी भक्तीभावानं श्रीगणेशाचं स्वागत झालं, यंदा गणेशोत्सवाच्या उत्साहावर कोविड प्रादुर्भावाचं सावट दिसून आलं, मात्र बाजारपेठेत भाविकांनी गणेशमूर्ती तसंच इतर पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. सकाळच्या सुमारास घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर दुपारनंतर सार्वजनिक गणपतींची स्थापना झाली.

बीड जिल्ह्यात काल टाळेबंदी उठवण्यात आल्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. जिल्ह्यात गणरायाचं स्वागत नेहमीप्रमाणे मिरवणुकांनी, वाजत गाजत झालं नसलं तरी नागरिकांमधे उत्साह दिसून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

परभणी जिल्ह्यात गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाचं स्वागत केलं.  महानगरपालिका प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे कुठेही एका ठिकाणी मोठी गर्दी दिसून आली नाही.

जालना जिल्ह्यात गणरायाचं स्वागत साधेपणानं करण्यात आलं. राजूर इथल्या श्री राजुरेश्वर गणपतीचा पालखी सोहळा यंदा रद्द करण्यात आला आहे.

****

लातूर जिल्ह्यात यंदा गणेशोत्सवाला अत्यंत साधेपणानं सुरुवात झाली. सार्वजनिक गणेश मंडळाच्या संख्येत मोठी घट झाली असून, मुर्तींच्या विक्रीवरही मोठा परिणाम झाला आहे. सार्वजनिक मंडळानी रस्त्यावर मांडव टाकून उत्सव साजरा करु नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं असून, जनतेनं या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम तालुक्यात एक तालुका एक गणपती उपक्रम राबवण्यात येत आहे. भूम शहरासह ५२ गावच्या गणेश मंडळांचा आणि भूम पोलीस स्थानकाचा हा उपक्रम आहे. उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या हस्ते काल भूम पोलीस स्थानकासमोर श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाली. गणेशोत्सवादरम्यान याठिकाणी सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

****

नांदेड शहरात गणेशाची प्रतिष्ठापना अत्यंत साधेपणाने करण्यात आली. सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा प्रथमच ढोल, ताशा, संगीत, नृत्याविना गणेशाचं महोत्सव मंडपात शारीरिक अंतराचा नियम पाळत स्वागत केलं. यंदा लहान मूर्तींना प्राधान्य दिल्याचं दिसून आलं.

****

नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस सुरु असताना गणरायाचं घरोघऱी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. जिल्ह्यात कुठंही मिरवणुका काढण्यात आल्या नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाला अत्यंत शांततेत प्रारंभ झाला. जिल्ह्यात १०८ सार्वजनिक गणेश मडळं असून अनेक मंडळांनी मूर्तीऐवजी प्रतिमापूजन केलं आहे. वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लहान मूर्तींच्या स्थापनेला प्राधान्य दिल्याचं दिसून आलं.

****

राज्यात काल १४ हजार ४९२ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या सहा लाख ७१ हजार ९४२ झाली आहे. काल २९७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत २१ हजार ९९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत चार लाख ८० हजार ११४ रुग्ण कोरोना विषाणू संसर्ग मुक्त झाले असून, सध्या एक लाख ६९ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३० कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवे एक हजार १२९ रुग्ण आढळले.  

नांदेड जिल्ह्यात नऊ रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १२२ रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात सात रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३९५ रुग्णांची नोंद झाली. लातूर जिल्ह्यातही सात रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी १६९ रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवे ९४ रुग्णांची भर पडली. जालना जिल्ह्यत दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ५८ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातही दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणि २०० रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात ८२, तर हिंगोली जिल्ह्यात काल आणखी नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.

****

मुंबईत काल एक हजार १३४ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ३२ जणांचा उपारादरम्यान मृत्यू झाला. पुणे जिल्यात तीन हजार २८० नवे रुग्ण आणि ६९ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ९१२ रुग्ण आढळले, तर दहा जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात ८६९, जळगाव ६१६, अहमदनगर ६०६, रायगड ३८७, पालघर ३४७, सातारा ३४५, सांगली २८९, सिंधुदुर्ग १३०, अमरावती ८८, यवतमाळ ५५, भंडारा २६, तर गडचिरोली जिल्ह्यात काल आणखी १७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.    

****

परभणी शहरातल्या पत्रकारांची अँटिजेन चाचणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे. उद्या २४ तारखेला ही चाचणी करण्यात येणार असल्याचं आयुक्त देविदास पवार यांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माहूर इथं तहसिलदारांकडून खंडणी वसूल करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन तालुका अध्यक्षांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. यात काही पत्रकारांचाही समावेश आहे. तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्याकडून आरोपींनी वाळूच्या एका प्रकरणात आधीच ५० हजार रुपयांची खंडणी उकळल्यानंतर पुन्हा एक लाख रुपयांची मागणी केली. तहसिलदारांनी याबाबत पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी खंडणी स्वीकारताना आरोपींना अटक केली.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथल्या नागेश्वर ऑईल इंडस्ट्री इथं अन्न आणि औषध प्रशासन विभागानं केलेल्या तपासणीत विविध त्रुटी आणि मुदतबाह्य खाद्यतेल विक्रीचा प्रकार उघडकीस आला. या कंपनीतून १० लाख ८९ हजार रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला.

****

वैद्यकीय प्रवेशासाठीची ७०:३० ची पद्धत मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असून, ती रद्द करण्याची मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. संपूर्ण राज्यातली वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सरसकट गुणवत्ता यादी आधारे करावी, असं त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

राज्यातल्या सर्व परिवहन महामंडळाच्या बसस्थानकावरील वाहनतळ धारकांचं परवाना शुल्क माफ करण्याची मागणी आमदार अंबादास दानवे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे. टाळेबंदी काळातलं परवाना शुल्क माफ करण्यात यावं आणि प्रवासी वाहतुक पूर्ववत झाल्यानंतर दुचाकी वाहनतळ धारकांकडून २५ टक्के परवाना शुल्क आकारण्यात यावं, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. याबाबत लवकरात लवकर बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिलं असल्याचं आमदार दानवे यांनी कळवलं आहे.

****

मराठवाड्यातले चांदीचे प्रसिध्द व्यापारी शेखर लक्ष्मीकांत ताथोडे यांचं काल सोलापूर इथं अल्पशा आजाराने निधन झालं. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल सोलापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातल्या कानसूर वस्ती इथं वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी गावातल्या लहान मुलांना शैक्षणिक तसंच सामाजिक ज्ञान देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. सध्या राज्यभरात ऑनलाईन शिक्षण सुरु आहे, मात्र ग्रामीण भागातल्या गोरगरीब जनतेच्या मुलाबाळापर्यंत सरकारी ऑनलाइन शिक्षण न परवडणारे आणि न पोहचणारे आहे, यामुळे हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

****

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय- घाटीतल्या निवासी डॉक्टरांनी दोन महिन्यांपासून प्रलंबित विद्यावेतनासाठी काल संप केला. सकाळी आठ वाजेच्या सुमारास सुरू केलेला संप विद्या वेतन मिळाल्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास आंदोलकांनी मागं घेतल्याची माहिती `मार्ड` संघटनेचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब तिडके यांनी दिली. या काळात आंदोलकांनी कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांव्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार बंद ठेवले होते.

****

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्यानं, गंगापूर धरण ९३ टक्के भरले आहे. धरणातून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता लक्षात घेता, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे ३६ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून धरणातून एक लाख सोळा हजार एकशेबत्तीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याच्या विसर्ग तापीनदी मध्ये केला जात आहे. तापी नदी काठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

अमरावती शहरातल्या शेगाव नाका परिसरात नियोजित `कोविड उपचार केंद्राला` विरोध करणाऱ्या ३७ कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शेगाव नाका परिसरात दोन मंगल कार्यालयांत हे उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याविरुद्ध कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं.

****

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यात महाराष्ट्रातल्या दोघांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातल्या गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलराम तसंच मुंबईतल्या भाभा अणुशक्ती केंद्राच्या शाळेतल्या शिक्षिका संगीता सोहनी या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या  आहेत. देशभरातून ४७ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असल्याचं मंत्रालयानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

 

 

No comments:

Post a Comment