Tuesday, 25 August 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 25 AUGUST 2020 TIME – 13.00

 

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 August 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.

****

देशात कोविड -१९ च्या संक्रमणातून बरे होण्याचा दर ७६ टक्के झाला आहे. आतापर्यंत जवळपास २४ लाख लोक या संक्रमणातून बरे झाले आहेत. मृत्यू दरातही घट झाली असून तो एक पूर्णांक ८४ शतांश टक्यांवर आला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात ६६ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर नवीन ६० हजार रुग्ण आढळले. या सोबतच देशात आता या विषाणूनं संक्रमित लोकांची एकूण संख्या ३१ लाख ६७ हजार ३५४ झाली आहे. तर आतापर्यंत ५८ हजार ३९० जणांचा मृत्यू झाला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी नवीन १०० कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले. यात ग्रामीण भागातल्या ३९ आणि महानगरपालिका हद्दीतल्या ६१ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १७१ झाली आहे. त्यापैकी सोळा हजार १५३ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर ६३८ जणांचा या विषाणूच्या संसंर्गानं मृत्यू झाला आहे. सध्या चार हजार ३८० रूग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

अमरावती जिल्ह्यात आणखी ११३ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ४ हजार ६८७ झाली आहे. आतापर्यंत ३ हजार ४०१ रुग्ण बरे झाले असून, ११२ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार १७४ जणांवर उपचार सुरु आहेत.

****

इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात संपूर्ण टाळेबंदी उठवण्याची घाई करणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल ठाण्यात बोलत होते. आपण ज्या गोष्टी सुरु केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेतली असून शहरी भाग आणि ग्रामीण भागात महत्वाच्या गोष्टी उघडायला परवानगी दिली आहे. मात्र, एखादी गोष्ट सुरु करायची असेल तर त्याची पूर्ण खातरजमा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी खाजगी वाहनांना ई-पास बंधनकारक राहणार आहे, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत जारी असलेली नियमावली पुढील सूचना जाहीर होईपर्यंत कायम असेल, असंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

****

रायगड जिल्ह्यात महाड इमारत दुर्घटना प्रकरणी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. नायडू यांनी एका ट्विटमध्ये या दुर्घटनेतल्या जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक, वास्तुविषारद आदी पाच जणांविरोधात महाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एक जण फरार झाला आहे.

****

ज्येष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मी पूजनाच्या सणाला आजपासून प्रारंभ होत आहे. आज दुपारनंतर घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होऊन, प्रतिष्ठापना केली जाईल. उद्या गौरी पूजनाच्या पार्श्वभूमीवर आज बाजारात भाज्या तसंच विविध पूजा साहित्य खरेदीसाठी महिलांची वर्दळ दिसत आहे. नागरिकांनी कोविड प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करून, उत्सव साजरे करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

****

सांगली जिल्ह्यातल्या विड्याच्या पानाचे दर घसरले असून पान उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सातत्याने बाजारपेठा बंद असल्यामुळे नागवेलीच्या पानांची मागणी प्रचंड कमी झाली, त्यामुळे व्यापाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पानाच्या दरात ८० टक्क्यांनी दरात घसरण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

*****

व्हिडिओकॉन उद्योग समूहातल्या कामगारांच्या मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेनं पुकारलेल्या साखळी उपोषणाला आज एक वर्ष पूर्ण झालं. मात्र कामगारांच्या मागण्या अद्यापही मान्य झालेल्या नाहीत. या कामगारांनी आज औरंगाबाद शहरातल्या अनेक चौकात हातात फलक घेऊन याचा निषेध केला. दरम्यान, संघटनेच्या नेत्यांची आज दुपारी मुंबईत यासंदर्भात कामगार राज्य मंत्री बच्चु कडू यांच्यासोबत बैठक होणार असल्याचं संघटनेकडून कळवण्यात आलं आहे.

****

ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सोलापूर इथल्या एका शाळेनं अनोखा उपक्रम राबवला आहे. या शाळेनं गावातल्या इमारतींच्या ३०० दर्शनी भिंतींवर पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमांमधले काही धडे रंगवले आहेत. परिसरातल्या सुमारे १७०० विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी ८० पूर्णांक ६७ शतांश टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. सध्या धरणात १७ हजार २०९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे.

****

 

No comments:

Post a Comment