Monday, 31 August 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 31 AUGUST 2020 TIME – 18.00

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 August 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००

****

** माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं निधन

** अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी राज्यसरकार यूजीसीकडे करणार

** कष्टकरी स्त्रियांना आर्थिक साक्षर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार - महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती 

** दहा दिवसात नियमावली तयार करून प्रार्थना स्थळं न उघडल्यास, पुन्हा आंदोलनाचा विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

आणि

** उद्या अनंत चतुर्दशी; नांदेड, परभणी तसंच लातूर इथं गणेश विसर्जनासाठी कृत्रीम तलावांसह विशेष व्यवस्था

****

देशाचे १३ वे राष्ट्रपती पद भूषवलेले भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं आज निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. त्यांचे पुत्र अभिजीत यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दीर्घकाळ सदस्य राहिलेल्या मुखर्जी यांनी केंद्र सरकारमध्ये अनेक पदं भूषवली. भारतीय राजकारणात अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ साली पद्मविभूषण या पुरस्कारानं तसंच आठ ऑगस्ट २०१९ रोजी भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मुखर्जी यांनी आपल्या ‘द कोलिएशन इयर्स: १९९६ टू २०१२’ या पुस्तकात आपल्या राजकीय कारकीर्दीबद्दल भाष्य केलं आहे.

****

विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी विद्यापीठ अनुदान आयोग -यूजीसीकडे करणार असल्याचं, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. औरंगाबादचं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, तसंच नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासह बहुतांश विद्यापीठांनी परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत मागितल्याचं सामंत यांनी सांगितलं. ७ लाख ९२ हजारावर विद्यार्थी ही परीक्षा देतील, मात्र त्यांना घराबाहेर न पडता, घरीच बसून परीक्षा देता यावी, याबाबत विचार करण्यासाठी एका दिवसाचा वेळ विद्यापीठांनी मागितला असल्यानं, पुढच्या दोन दिवसांत यूजीसीकडे याबाबत मागणी करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करण्यासाठी संपूर्ण सप्टेंबर महिना मिळेल, आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतल्या जातील, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लावला जाईल, आणि ही परीक्षा कमी गुणांची असेल, अशी माहितीही सामंत यांनी दिली.

****

न्यायालय अवमानना प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं ठोठावलेला एक रुपया दंड भरणार असून पुनरावलोकन याचिका दाखल करण्याचा अधिकार राखून ठेवणार असल्याचं ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. न्यायव्यवस्थेबद्दल आपल्याला आदर आहे. सर्वोच्च न्यायालयाचा किंवा न्यायव्यवस्थेचा अनादर करण्याचा आपला हेतू नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

कष्टकरी स्त्रियांना आर्थिक साक्षर करण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाकडून प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येईल, असं राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. घरकाम करणाऱ्या एका महिलेला हिशेब येत नसल्याची चित्रफित सामाजिक माध्यमांवर फिरत आहे. त्या अनुषंगानं बोलताना, ठाकूर यांनी, प्रामाणिकपणे कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या माता-भगिनींची थट्टा न करता त्यांना आर्थिक साक्षर करून सक्षम करणे, ही सर्वांची जबाबदारी असल्याचं सांगितलं. हिशेब न आल्यामुळे कष्टकरी स्त्रियांची कुणीही खिल्ली उडवू नये. त्यांच्या प्रामाणिक कष्टाची कदर आणि सन्मान केला पाहिजे, असं मतही ठाकूर यांनी व्यक्त केलं.

****

दहा दिवसात नियमावली तयार करून राज्यातली प्रार्थना स्थळं उघडण्याचं आश्वासन सरकारनं दिलं असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. राज्यातली प्रार्थना स्थळं खुली करण्याच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी आज पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदीर परिसरात आंदोलन केलं. यावेळी आंबेडकर यांच्यासह पंधरा जणांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते. दहा दिवसात मागणी मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान या आंदोलनावेळी कोविड प्रतिबंधाबाबतचे कोणतेही नियम पाळले गेले नसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं आज गोव्यातला हॉटेल व्यावसायिक गौरव आर्य याची चौकशी केली. सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचीही आज सलग चौथ्या दिवशी चौकशी करण्यात आली.

****

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे वांद्रे-कुर्ला संकुलात वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी सार्वजनिक सायकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए राजीव यांच्या हस्ते या सार्वजनिक सायकल सेवेला सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक सायकल सेवेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि युलू संस्थेसोबत सामंजस्य करार झाला आहे. ‘वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्थानकातून वांद्रे-कुर्ला संकुलात दररोज किमान तीन लाख नागरिक प्रवास करून येतात, ते या सार्वजनिक सायकल सेवेचा लाभ घेऊ शकतात.

****

दहा दिवसीय गणेशोत्सवाचा उद्या अनंत चतुर्दशीला समारोप होत आहे, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तींचं विसर्जन सर्वत्र साधेपणाने करण्याचं आवाहन शासनानं केलं आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, तसंच शक्य असल्यास घरी बसवलेल्या गणेश मूर्तींचे घरीच विसर्जन करावं असं आवाहनही सर्व जिल्ह्यांच्या स्थानिक प्रशासनानं केलं आहे.

नांदेड शहरात गणेश मूर्ती विसर्जनासाठी नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.

लातूर जिल्ह्यात गणेश मूर्ती संकलन केंद्र उभी करून त्या ठिकाणी मूर्ती जमा कराव्यात, त्यांचे विधीपूर्वक विसर्जन केले जाईल असं आवाहन लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे.

परभणी जिल्ह्यातही गणेश मूर्तींच्या संकलन आणि विसर्जनासाठी ४० वाहनांची महानगरपालिका प्रशासनाने व्यवस्था केली असून ती वाहनं सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत नागरीकांच्या घरापर्यंत जाऊन गणेश मूर्ती आणि निर्माल्याचे संकलन करणार आहेत. संकलित मूर्तींसह निर्माल्याचे विसर्जन वसमत रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात तयार करण्यात आलेल्या कृत्रीम तलावात केलं जाणार असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे. 

****

धुळे जिल्ह्यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या कोरोना विलगीकरण कक्षात रुग्णसेवा देणाऱ्या २८ वर्षीय अधिपरिचारीकेचा काल कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या परिचारिकेसह तीन डॉक्टरांचा या आजारानं मृत्यू झाला आहे. दरम्यान, धुळे जिल्ह्यात आज २० जण कोरोना विषाणू बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली रुग्णसंख्या ८ हजार ४६१ झाली आहे.

****

चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार किशोर जोरगेवार यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. जोरगेवार यांची काल जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. आपल्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात रिक्षातून प्रवास करताना कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये यासाठी श्री औसा हनुमान गणेश मंडळाच्या वतीनं ऑटोरिक्षात चालक आणि प्रवासी यांच्या मधील जागेत प्लास्टिकचा पडदा लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला. शहरातील किमान दोन हजार ऑटोरिक्षात प्लास्टिकचे पडदे बसवण्याचा संकल्प या गणेश मंडळानं केला आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात ७०० कोरोना विषाणू बाधित रुग्णांना उपचारानंतर प्रकृती सुधारल्यामुळे आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामुळे जिल्ह्यात आता बरे झालेल्यांची संख्या १७ हजार ८७६ इतकी झाली आहे. तर ३ हजार ९१ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार २५७ जणांना या विषाणूची लागण झाली आहे. 

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या २३ हजार १५० झाली आहे. यापैकी सुमारे १८ हजार रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ६८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या साडे चार हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी असलेला ७०-३० चा नियम मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून तो तत्काळ रद्द करावा, अशी मागणी खासदार सुधाकर श्रृंगारे आणि माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलं आहे.

****

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी मराठवाडा महसूल विभागाचे अशोक डक यांची तर पुणे महसूल विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय वाडकर यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली. बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली.

****

 

No comments:

Post a Comment