▼

Tuesday, 4 August 2020

AIR NEWS TEXT BULLETIN, AURANGABAD DATE – 04 AUGUST 2020 TIME 18.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 August 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००

****

** अयोध्येत आज सायंकाळी शरयू घाटावर दीपोत्सव; राम मंदिराच्या भूमिपूजनाची सर्व तयारी पूर्ण 

** कोविड प्रतिबंधासाठी तयार होत असलेल्या सिरम कंपनीच्या लसीची चाचणी दुसऱ्या टप्प्यात

** औरंगाबाद इथं आज दोन कोविडग्रस्तांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या १५ हजाराच्या जवळ

** ज्येष्ठ रंगकर्मी इब्राहिम अल्काझी यांचं हृदय विकाराच्या धक्क्यानं निधन

आणि

** जिल्हा दूध उत्पादक संघांनी नफेखोरी कमी करुन दुधाला वाढीव दर द्यावा - माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांची मागणी

****

अयोध्येत उद्या होत असलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या अनुष्ठानाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सहा तासांचं विशेष अनुष्ठान केलं जात आहे. आज सायंकाळी दीपोत्सव साजरा केला जाणार असून शरयू नदीचे घाट सुशोभित करण्यात आले आहेत. संपूर्ण अयोध्येत भक्तीचं आणि श्रद्धेचं वातावरण असून ठिकठिकाणी भाविक भजनं गात आहेत. १३५ विशेष संतांना या सोहळ्यात निमंत्रित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दुपारी अभिजीत मुहूर्तावर राम मांदिराचं विधिवत भूमिपूजन होणार आहे. यासाठी १७५ जणांना निमंत्रित करण्यात आलं आहे.

****

कोविड प्रतिबंधासाठी तयार होत असलेल्या सिरम कंपनीच्या लसीची चाचणी दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय तसंच भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था आयसीएमआर कडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आज ही माहिती देण्यात आली. जगभरात कोविड प्रतिबंधासाठी १४१ लसींची चाचणी सुरू आहे, त्यापैकी २६ लसींची मानवावर चाचणी केली जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. देशात या संसर्गाने होणारा मृत्यू दर दोन पूर्णांक दहा दशांश टक्के झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मरण पावणारे ५० टक्के रुग्ण हे ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे तर ३७ टक्के रुग्ण ४५ ते ६० वर्ष वयादरम्यानचे असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.

****

औरंगाबाद इथं आज दोन कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला, यापैकी एक शिऊर इथल्या ६५ वर्षीय पुरुष तर दुसरा जाधववाडी इथल्या ६० वर्षीय पुरुष आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८९ जणांचा कोरोना विषाणू मुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज दिवसभरात १०० नव्या रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये ग्रामीण भागातल्या ६३ आणि महापालिका हद्दीतल्या ३७ रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ९९४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ११ हजार २२९ रुग्ण बरे झाल्यानं सध्या तीन हजार २७६ जणांवर उपचार सुरु असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.

****

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे सोलापूर महानगरपालिकेतल्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. या प्रार्श्वभूमीवर आता ई ऑफीस प्रणाली राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे.

****

जम्मू काश्मीरमध्ये शंभर टक्के घरांना विद्युत जोडणीचं लक्ष्य निर्धारित वेळेपूर्वी साध्य झालं आहे. या केंद्रशासित प्रदेशातल्या ३ कोटी ५७ लाख ४०५ घरांना विद्युत जोडणी देण्यात आली आहे. या उद्दीष्टपूर्ती साठी जम्मू काश्मीर ऊर्जाविकास विभागातल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचं बक्षीसही देण्यात आलं आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सुशासन प्रस्थापित करण्यासाठी अनेक प्रलंबित सुधारणा करण्यात आल्या आहेत. जमिनीच्या नोंदींची प्रक्रिया कार्यपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचं पुनर्गठन करण्यात आलं आहे, त्यासोबतच आर्थिक व्यवहार प्रक्रियेतही सुधारणा करण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीरचं दोन केंद्रशासित राज्यात विभाजन आणि कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे.

****

न्यायालयांत चालणाऱ्या दीर्घकाळ आणि प्रलंबित असलेल्या खटल्यांसंदर्भात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी चिंता व्यक्त केली आहे. न्यायप्रक्रिया जलद आणि सुलभ होण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला आहे. आंध्र विद्यापीठाच्या डॉक्टर बी. आर. आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या ७६ व्या स्थापना दिवसाच्या अनुषंगानं आज एका ऑनलाईन कार्यक्रमात त्यांनी ही बाब नमूद केली. लोकांन कमी वेळेत आणि कमी खर्चात न्याय मिळायला हवा असं ते म्हणाले. लोकांनी कायद्याचे वेगवेगळे अर्थ काढू नयेत यासाठी कायदे हे नेहमीच सरळ आणि सोपे असावेत असंही त्यांनी सांगितलं.

****

ज्येष्ठ रंगकर्मी इब्राहिम अल्काझी यांचं आज नवी दिल्लीत निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं, त्यांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे सर्वाधिक काळ संचालक राहिलेल्या अल्काझी यांनी प्रसिद्ध नाटककार गिरीश कर्नाड यांच्या तुघलक, धर्मवीर भारती यांच्या अंधा युग या सह अनेक नाटकांची निर्मिती केली. नसीरुद्दीन शहा, ओम पुरी या सारख्या कलाकारांच्या अनेक पिढ्या अल्काझींच्या मार्गदर्शनात तयार झाल्या आहेत.

****

केंद्रीय लोकसेवा आयोगानं, नागरी सेवा परीक्षा २०१९ चे अंतिम निकाल आज जाहीर केले. या निकालात मुलांमधे प्रदीप सिंग यानं, तर मुलींमधे प्रतिभा वर्मा हीनं पहिला क्रमांक पटकावला आहे. नांदेड जिल्ह्याच्या नायगांव तालुक्याच्या शेळगांव गौरी इथले योगेश अशोक बावणे यांनी या परीक्षेत ६३ वा रँक मिळवला आहे. तर अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातल्या मोहरी इथले महेश बाळासाहेब गीते यांनी इतर मागास प्रवर्गामधून ३९९ वा रँक मिळवला आहे. नागरी सेवांच्या एकूण ९२७ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. निकालानंतर भारतीय प्रशासकीय, परराष्ट्र व्यवहार, आणि भारतीय पोलीस सेवेतल्या विविध पदांसाठी एकूण ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

****

पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली करण्यात आली आहे. चार वर्षांसाठी त्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती झाल्याचा आदेश आज जारी करण्यात आला आहे.

****

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी केला आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. सुशांतच्या मृत्यूपूर्वी त्याच्या घरी झालेल्या पार्ट्यांना कोण कोण हजर होतं, त्याचा तपास करावा, गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रिया चक्रवर्तीचा तपास करून चौकशी करावी, असं आवाहन राणे यांनी केलं.

 

दरम्यान, बिहार सरकारने सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयमार्फत तपासणीची शिफारस केली आहे. या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी केला आहे. बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी, या मागणीचं स्वागत केलं आहे. या प्रकरणात आता सत्य समोर येईल, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला आहे.

 

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. आरोप करून प्रतिमा खंडन करण्याचं तंत्र नवीन नाही, हेच तंत्र वापरून युवा नेते आदित्य ठाकरे यांची प्रतिमा मलीन केली जात असल्याचा आरोप, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला. या संदर्भात ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी ते समोर घेऊन यावं, असं आवाहन परब यांनी केलं.

 

दरम्यान, गौरी गणपतींसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीचे दर नियमितच असतील, कोकणात जाणाऱ्या सर्वांना केंद्र सरकारच्या नियमानुसार दहा दिवस विलगीकरणात राहावं लागेल, असं परब यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं थकलेलं वेतन लवकरच दिलं जाईल अशी माहिती परिवहन मंत्री परब यांनी ट्विटरवरून दिली. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मे महिन्यात फक्त पन्नास टक्के वेतन दिलं होतं, तसंच जून महिन्याचं वेतन अजूनही मिळालेलं नाही. यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५५० कोटी रुपये निधीला मान्यता मिळाल्याची माहिती परब यांनी दिली आहे.

****

जिल्हा दूध उत्पादक संघांनी नफेखोरी कमी करुन दुधाला वाढीव भाव देण्याची मागणी काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. ते आज या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हा दूध उत्पादक संघ शेतकऱ्यांच्या दुधाला २० रुपये प्रतिलिटर भाव देतो आणि तेच दूध ४० रुपये प्रतीलिटर दराने विकण्यात येतं. औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दूध दरवाढीसाठी आंदोलन न करता भाव वाढवून द्यावा, असं काळे यांनी म्हटलं. देशात पाच वर्ष पुरेल एवढी दूध भुकटी असतांनाही केंद्र सरकारनं दुधाचे भाव पाडण्यासाठी न्यूझीलंडहून १० हजार मेट्रीक टन दूधभुकटी खरेदी केल्याचा आरोप काळे यांनी केला.

****

जालना जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आजपर्यंत एक लाख चार हजार १३७ शेतकऱ्यांना ५३२ कोटी २१ लाख रुपयांच्या पीक कर्जाचं वाटप करण्यात आलं आहे. जिल्ह्याचं खरीप पीककर्ज वाटपाचं एकूण उद्दिष्ट १ हजार ११५ कोटी ३१ लाख ९० हजार रुपये असून, उद्दिष्टाच्या ४८ टक्के पीककर्जाचे वाटप पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली आहे.

****

कोविड १९ प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लागू असलेल्या टाळेबंदी काळात लातूर शहरातल्या निवृत्ती वेतन धारकांना तसंच शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना आता बँकेकडून घरपोहोच सेवा मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार निवृत्ती वेतनधारक आणि संजय गांधी निराधार योजना तसंच इतर शासकीय योजनेतल्या लाभधारकांना घरपोच सेवा देण्याचं राष्ट्रीयकृत बँकांनी मान्य केलं आहे. त्यासाठी बँकांकडून शहराच्या निरनिराळ्या भागात विविध संस्थांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. लाभधारकांनी या प्रतिनिधींशी संपर्क केल्यास त्यांना हवी ती रक्कम घरपोच मिळणार आहे.

****

सोलापूर इथले जुन्या पिढीतले ज्येष्ठ संगीततज्ञ, संगीत शिक्षक भालचंद्र पंचवाडकर यांचं आज पुण्यात वार्धक्यानं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. एक तळमळीचे संगीत शिक्षक म्हणून ते परिचित होते.

**** 

 


No comments:

Post a Comment