Saturday, 1 August 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.08.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 August 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.

****

दुधाला प्रति लिटर ३० रुपये भाव द्यावा, दूध उत्पादकांना प्रति लिटर मागे दहा रुपये अनुदान द्यावं, दूध पावडरला पन्नास रुपये अनुदान द्यावं या मागण्यांसाठी राज्यात विविध संघटना, पक्षातर्फे आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्यात वाळूज इथं भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं, काही आंदोलकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. वैजापूर तालुक्यातल्या लाडगाव इथंही आंदोलन करण्यात आलं. बीड जिल्ह्यात कडा इथं माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आलं. बीड इथं शिवसंग्राम संघटनेनं आज महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत गरजुंना दुधाचं वाटप केलं. दूध दराबाबत शासनानं आपली भूमिका बदलली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसंग्राम संघटनेतर्फे देण्यात आला आहे. उस्मानाबाद इथं भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झालं. नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा इथं भाजपनं रस्ता बंद आंदोलन केलं. नाशिक इथं मुंबई आग्रा महामार्गावरही रस्ता बंद आंदोलन झालं. आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले यांनी याचं नेतृत्त्व केलं. अहमदनगर जिल्ह्यात दूध उत्पादक संघर्ष समितीनं आंदोलन केलं. पुणतांबा इथं किसान क्रांती मोर्चाच्या वतीनं बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून आंदोलन करण्यात आलं.

****

कोरोना विषाणूचे रुग्ण बरे होण्याचं देशातलं प्रमाण ६४ पूर्णांक ५३ टक्के आहे. देशात १६ लाख ९५ हजार ९८८ रुग्ण आढळले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या दहा लाख ९४ हजार ३७४ आहे. पाच लाख ६५ हजार १०३ रुग्ण सध्या उपचार घेत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, या संसर्गाचे आतापर्यंत सर्वाधिक ५७ हजार ११८ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोना विषाणुमुळे ७६४ रुग्णांचा गेल्या चोवीस तासांमधे मृत्यू झाला असून हे प्रमाण दोन पूर्णांक पंधरा शतांश टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे. या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ३६ हजार ५११ झाली आहे. या प्रादुर्भावासंबंधी एक कोटी ९३ लाख ५८ हजार ६५९ नमुने कालपर्यंत तपासण्यात आले असून यात काल पाच लाख २५ हजार ६८९ नमुने तपासण्यात आले आहेत.

****

पाकिस्तानच्या सैन्यानं आज जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामधे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ केलेल्या गोळीबारामधे एक सैनिक हुतात्मा झाला. हिमाचल प्रदेशचे रोहीन कुमार या गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना ते हुतात्मा झाल्याची माहिती सैन्याच्या प्रवक्त्यानं दिली आहे. पाकिस्तानकडून सुमारे महिनाभरापासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील विविध भागामधे दिवसात एक ते दोन वेळा गोळीबार केला जात आहे. शत्रू सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आज केलेल्या गोळीबाराला सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचंही या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचे नवे ६९ रुग्ण आढळले असून यात महापालिका हद्दीतील ४३ आणि ग्रामीण भागातल्या २६ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या १४ हजार १९२ झाली असून दहा हजार १९२ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. जिल्ह्यात तीन हजार ५२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर जिल्ह्यात आतापर्यंत ४७५ रुग्ण या विषाणू मुळे मरण पावले आहेत.

****

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित २७९ रुग्णांना बरे झाल्यानंतर आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार सहाशे एकोणचाळीस  रुग्णांना यशस्वी उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे.

****

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी मुंबईतल्या मातोश्री निवासस्थानी अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत सुमन नगर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातल्या अण्णाभाऊंच्या पुर्णाकृती पुतळ्याला विविध राजकीय, सामाजिक संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं. फुलंब्री इथं नगर पंचायतच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं तसंच लोकमान्य टिळकांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड मधील शिवना टाकळी धरणाचे दोन दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले. धरणातून ७२० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणात सध्या ९८ टक्के पाणीसाठा असून कन्नड आणि परिसरात काल जोरदार पाऊस झाल्यानं धरणात पाण्याची आवक सुरुच असल्याची माहिती विभाग अभियंता पुरुषोत्तम कडवे यांनी दिली आहे.

****

No comments:

Post a Comment