▼

Tuesday, 4 August 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.08.2020 रोजीचे दुपारी 01.30 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 August 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.

****

देशात आतापर्यंत कोरोना विषाणू संक्रमणातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ लाख ३० हजार ५०९ झाली आहे. ही संख्या सध्या कोरोना विषाणू संक्रमणावर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा दुप्पट आहे. सध्या देशात पाच लाख ८६ हजार २९८ रूग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, देशात गेल्या २४ तासात देशात कोविड १९ चे एकूण ५२ हजार ५० नवे रूग्ण आढळले तर ४४ हजार ३०६ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशात सध्या या विषाणूने बाधित रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ५५ हजार ७४५ झाली आहे.

दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत कोविड १९ च्या सहा लाख ६१ हजार ८९२ नमून्यांची चाचणी घेण्यात आली. ही संख्या आतापर्यंत केलेल्या चाचण्यांच्या संख्येपैकी सर्वात जास्त आहे. आतापर्यंत देशात कोविड-१९ च्या दोन कोटी आठ लाख ६४ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या देशात या चाचण्यांसाठी एक हजार ३५६ प्रयोगशाळा असून यापैकी ९१७ प्रयोगशाळा सरकारी तर ४३९ प्रयोगशाळा खाजगी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ९८ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. यात महानगतरपालिका हद्दीतल्या ३६ तर ग्रामीण भागातल्या ६२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या चौदा हजार ९९२ झाली आहे. यापैकी अकरा हजार २२९ रुग्ण बरे झाले आहेत तर ४८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या तीन हजार २७६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत कोरोना विषाणूच्या बाधित रुग्ण संख्येत २२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ९२५ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ३४० रुग्णांना प्रकृती सुधारल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ३६५ इतकी झाली आहे.

****

मुंबईत काल रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळं जनजीवन विस्कळित झालं आहे. सखल भागात पाणी भरल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडली असून हिंदमाता, दादर, कुर्ला, माटुंगा, गव्हाणपाडा, चेंबूर, अंधेरी अग्निशमन केंद्र, वर्सोवा, दहिसर, बोरिवली, कांदिवली, धारावी, वरळी या ठिकाणी पाणी भरलं आहे. पुराच्या पाण्यात अनेक गाड्या बंद पडल्या असून मंत्रालयासह शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मिठी आणि पोयसर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदी लगतच्या वस्त्यातल्या नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात आजही मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.

****

रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या काजळी नदीला आलेल्या पुरामुळे चांदेराई बाजारपेठेत पाणी भरलं‌, त्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्हातल्या खेड इथल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातही पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कालपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळं पडझडीच्या अनेक घटना घडल्या असून. सखल भागात पाणी साचलं आहे. झाडं पडून काही ठिकाणचा वीज पुरवठा आणि वाहतुक ठप्प झाली आहे.

****

रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी जिल्ह्यातल्या सावित्री, आंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सावित्री आणि कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. सावित्री नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा दिला आहे. पुढील ४८ तासात रायगडसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पुण्यातल्या ३०० प्रमुख गणेश मंडळांनी नागरिकांकडून वर्गणी मागायची नाही असा निर्णय घेतला आहे. शहर आणि परिसरातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं या मंडळांकडून सांगण्यात आलं आहे.

****

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्या कोणालाही अधिकृत पासशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे. जिल्ह्यात आल्यानंतर कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी चौदा दिवस विलगीकरणात राहावं लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्ताननं आज शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. नियंत्रण रेषेलगतच्या कृष्णा खोऱ्यात आज सकाळी सात वाजेच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करण्यात आला. याला भारतीय सैनिकांनी चोख उत्तर दिलं.

****

No comments:

Post a Comment