Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 05 August 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५
ऑगस्ट
२०२० सकाळी ७.१० मि.
****
·
अयोध्येत श्रीराम मंदीराचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन; सोहळ्यासाठी १७५ जणांना निमंत्रण.
·
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं पुण्यात निधन.
·
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मराठवाड्यातले १४ जण उत्तीर्ण.
·
राज्यात काल आणखी सात हजार ७६० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, ३०० जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू.
·
औरंगाबादमध्ये सहा, नांदेड आणि परभणीत प्रत्येकी तीन, जालन्यात दोन तर उस्मानाबादमध्ये
एका रूग्णाचं निधन तर लातूरमध्ये १५३, बीड ७४ आणि हिंगोलीत दोन नवे रुग्ण.
आणि
·
राज्यात मुंबई, ठाणे, रायगड, कोकणसह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस.
****
अयोध्येत श्रीराम मंदीराचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज
अभिजीत मुहूर्तावर होणार आहे. भूमिपूजनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दुपारी साडे
बारा वाजता भूमिपुजनाला सुरुवात होईल. सुरवातीला पंतप्रधान हनुमान गढीमध्ये येऊन पूजा
करतील, त्यानंतर रामलल्लाचं दर्शन आणि पूजा करतील. भूमिपुजनाच्या पार्श्वभूमीवर सुरू
असलेल्या अनुष्ठानाच्या कालच्या दुसऱ्या दिवशी सहा तासांचं विशेष अनुष्ठान करण्यात
आलं. काल सायंकाळी शरयू नदीच्या घाटावर दीपोत्सव साजरा झाला. संपूर्ण अयोध्येत भक्तीचं
आणि श्रद्धेचं वातावरण असून ठिकठिकाणी भाविक भजनं गात आहेत. अयोध्या नगरी सजली असून,
नागरिकांनी घरासमोर सजावट केली आहे. या सोहळ्यासाठी १७५ जणांना निमंत्रित करण्यात आलं
आहे. त्यात १३५ विशेष संतांना समावेश आहे. अयोध्येमध्ये कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात
आला आहे. जगभरातल्या राम भक्तांनी कोरोना विषाणू संबंधी नियमांचं पालन करुन आपापल्या
गावात, शहरात भजन, किर्तन आणि प्रसाद वाटप करावं, असं आवाहन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र
विश्वस्त मंडळ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
या भूमीपूजन सोहळ्याचं सकाळी अकरा वाजून ४० मिनिटांपासून आकाशवाणीच्या एफ एम
गोल्ड आणि अतिरिक्त ध्वनीलहरींवरून प्रत्यक्ष वर्णन प्रसारीत केलं जाणार आहे. दूरदर्शन
वाहिनीवरूनही या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष प्रक्षेपण केलं जाणार आहे.
राम मंदीर शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण राष्ट्राच्या रुपात भारताचं प्रतिनिधित्व
करेल, असं भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं आहे. राम
मंदीर आंदोलनात सुदैवानं आपल्याला सोमनाथ ते अयोध्येपर्यंत रथयात्रेची संधी मिळाली,
याचा आनंद वाटतो, असं अडवाणी यांनी काल सामाजिक माध्यमावर म्हटलं आहे.
****
दरम्यान, राम मंदीरासाठी पुण्याच्या माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीनं
२१ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे
कोषाध्यक्ष आचार्य श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी काल अयोध्येत पत्रकार परिषदेत
ही घोषणा केली.
****
दरम्यान, राम मंदीर भूमिपुजनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात पोलिस बंदोबस्त
तैनात करण्यात आला आहे. कोणत्याही मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात
आली नसल्याचं पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे.
****
राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं मध्यरात्री पुण्यात
निधन झाल्याचं त्यांचे नातू आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी
सांगितलं. ते ९१ वर्षांचे होते. निलंगेकर यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर
पुणे इथं उपचार सुरु होते. त्यातून दोनच दिवसांपूर्वी ते विषाणूमुक्त होऊन घरी परतले
होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निलंगेकर प्रदीर्घ काळ राजकारणात
होते. १९६२च्या विधानसभा निवडणुकीत ते निलंगा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून
निवडून आले. १९९० ते १९९१ या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसंच राज्य मंत्रिमंडळात
विविध मंत्रीपद त्यांनी भूषविली. त्यानंतर तीन जून १९८५ ते सहा मार्च १९८६ या कालावधीत
राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. सुशिलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात
महसूल मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
निलंगा इथं आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
**
केंद्रीय लोकसेवा आयोगानं, नागरी सेवा परीक्षा २०१९ चे अंतिम निकाल काल जाहीर
केले. नागरी सेवांच्या एकूण ९२७ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या निकालात
मुलांमधे हरियाणा मधले प्रदीप सिंगनं, तर मुलींमधे उत्तर प्रदेशच्या प्रतिभा वर्मा
हीनं पहिला क्रमांक पटकावला आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातल्या मोहरी
इथले महेश बाळासाहेब गीते यांनी इतर मागास प्रवर्गामधून ३९९वा क्रमांक पटकावला.
या परीक्षेत मराठवाड्यातल्या १४ जणांनी बाजी मारली. बीड इथल्या मंदार पत्की
यांनी २२ वा, नांदेड जिल्ह्याच्या नायगांव तालुक्याच्या शेळगांव गौरी इथले योगेश अशोक
बावणे यांनी ६३ वा, बीड इथल्या जयंत मंकले यांनी १४३ वा, परभणी इथल्या कुणाल चव्हाण
यांनी २११ वा, औरंगाबाद इथल्या सुमित महाजन यांनी २१४, बीडच्या श्रेणीक लोढा यांनी
२२१ वा, औरंगाबादच्या नेहा किर्दकनं ३८३ वा, बीडच्या डॉ.प्रसन्न लोध यांनी ५२४ वा,
औरंगाबादच्या अंकिता वाकेकरनं ५४७ वा, उस्मानाबादच्या आतिश कांबळे यांनी ६५१वा, जालना
जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातल्या अक्षय भोसले यांनी सातशे चारावा, उस्मानाबाद इथल्या
निलेश गायकवाड यांनी सातशे बावन्नावा, बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई इथल्या वैभव वाघमारे यांनी सातशे एकाहात्तरावा, तसंच जालना जिल्ह्यातल्या
जाफराबाद तालुक्यातल्या वरुड या गावातला अभिजीत जिनचंद्र वायकोस यानं या परीक्षेत ५९०
वा रँक मिळवला आहे.
****
राज्यात काल आणखी सात हजार ७६० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे
राज्यातली एकूण रुग्णसंख्या चार लाख ५७ हजार ९५६ झाली आहे. काल ३०० रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत १६ हजार १४२ जणांचा मृत्यू झाला
आहे. तर काल १२ हजार ३२६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
राज्यात आतापर्यंत दोन लाख ९९ हजार ३५६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या
एक लाख ४२ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
***
औरंगाबाद जिल्ह्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात
या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ४९३ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येनं
१५ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. काल आणखी २५६ रुग्णांची नोंद झाल्यानं जिल्ह्यातली एकूण
रुग्णसंख्या १५ हजार १५० झाली आहे. तर काल १३९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून
सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार ३६८ रुग्ण बरे झाले असून, सध्या तीन
हजार २८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात
या आजारानं आतापर्यंत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी १३७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत ७२, तर अँटिजेन चाचणीत ६५ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या दोन हजार ४९६ झाली आहे. तर काल ३७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी
सोडण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ७५ रुग्ण बरे झाले असून, सध्या एक
हजार ३२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
परभणी जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात
या आजारानं आतापर्यंत ४२ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी १७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे
जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ७३७ झाली आहे. तर काल चार रुग्ण बरे झाल्यानं त्यांना
घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत ३९९ रुग्ण बरे झाले असून, सध्या २९६ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
दरम्यान, कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर खासगी दवाखान्यात करण्यात येत असलेल्या
औषधोपचार दरम्यान आकारलेल्या बिल तपासणीबाबत जिल्हा प्रशासनानं एक चौकशी समिती गठित
केली आहे.
वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या व्यापारी, दुकानदार,
विक्रेत्यांनी नऊ ऑगस्टपर्यंत अॅन्टीजन चाचणी करून घ्यावी आणि प्रमाणपत्र हस्तगत करावं,
असं आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात
या आजारानं आतापर्यंत ७५ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी ६८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये
अँटीजेन चाचणीत ४१ जण बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार
४४५ झाली आहे. तर काल ३० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जालना जिल्ह्यात
आतापर्यंत एक हजार ५९७ रुग्ण बरे झाले असून, सध्या ७७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, जालना जिल्हा कारागृहातले नऊ कैदी अँटीजेन चाचणीमध्ये बाधित आढळून
आले आहेत. या कैद्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातल्या ५५ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये
ठेवण्यात आलं आहे. हा वार्ड कैद्यांसाठी राखीव ठेवण्यात आला असून याठिकाणी पोलीस बंदोबस्त
लावण्यात आला आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात
आतापर्यंत या विषाणू संसर्गानं ५९ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी ४५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.
त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हजार ६२० झाली आहे. त्यापैकी ५२२ रुग्ण बरे
झाले असून, सध्या एक हजार ४० जणांवर उपचार सुरु आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात
आतापर्यंत या आजारानं १०७ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात काल आणखी १५३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
झाली. यामध्ये ११३ रुग्ण अँटिजेन चाचणीत बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या
दोन हजार ६९८ झाली आहे. त्यापैकी एक हजार ४९८ रुग्ण बरे झाले असून, सध्या एक हजार ७३
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
**
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येनं एक हजाराचा टप्पा पार
केला आहे. काल आणखी ७५ रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हजार ३५ झाली
आहे. त्यापैकी ४२८ रुगण बरे झाले असून, आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात
सध्या ५८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे
जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ७१८ झाली आहे. त्यापैकी ५३९ रुग्ण बरे झाले असून, सध्या
जिल्ह्यात १७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
पुणे जिल्ह्यात काल दोन हजार ९८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले तर ५६
मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ४६८ रुग्ण आढळले, तर १२ जणांचा मृत्यू झाला.
ठाणे जिल्ह्यात ९४७, पालघर ३४४, रायगड २१२, सोलापूर २५१, सातारा २२०, अमरावती १३५,
बुलडाणा ५३, सिंधुदुर्ग १५, तर गडचिरोली जिल्ह्यात काल आणखी १३ रुग्णांची नोंद झाली.
****
राज्यात काल मुंबई, ठाणे, रायगड, कोकणसह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही
काल पाऊस झाला. मुंबईत गेले दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं
आहे. सखल भागात पाणी भरल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडली असून हिंदमाता, दादर, कुर्ला,
माटुंगा, गव्हाणपाडा, चेंबूर, अंधेरी अग्निशमन केंद्र, वर्सोवा, दहिसर, बोरिवली, कांदिवली,
धारावी, वरळी, या ठिकाणी पाणी भरलं आहे.
पुराच्या पाण्यात अनेक गाड्या बंद पडल्या असून मंत्रालयासह शासकीय कार्यालयांना
काल सुट्टी देण्यात आली होती. मिठी आणि पोयसर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे
नदी लगतच्या वस्त्यातल्या नागरिकांचं सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. सध्या पाऊस थांबला
असला तरीही ढगाळ वातावरण आहे.
दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात आजही मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे
अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.
दरम्यान, आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईत पुन्हा पावसाला सुरूवात झाली
आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळित
झालं आहे. सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
आहे. खेड, चिपळूण आणि राजापूर शहरांना पुराचा वेढा बसला. रत्नागिरी शहरात मुसळधार पावसाचा
वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. वादळात अंगावर झाड कोसळल्यानं राजापूर तालुक्यातल्या प्रिंदावण
इथं एका महिलेचा मृत्यू झाला.
गेले दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जनजीवनही
विस्कळीत झालं आहे. विजयदुर्ग खाडीने धोक्याची पातळी गाठली असून यामुळे खारेपाटण सुख
नदीला पूर आला आहे. पुढचे दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान
विभागानं वर्तवला आहे.
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर, पालम, सेलू तालुक्यात काल रात्री जोरदार पाऊस झाला.
औरंगाबादमध्येही काल पाऊस झाला.
****
जिल्हा दूध उत्पादक संघांनी नफेखोरी कमी करुन दुधाला वाढीव भाव देण्याची मागणी
काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांनी केली आहे.
ते काल या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हा दूध उत्पादक संघ शेतकऱ्यांच्या
दुधाला २० रुपये प्रतिलिटर भाव देतो आणि तेच दूध ४० रुपये प्रतीलिटर दराने विकण्यात
येतं. औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दूध दरवाढीसाठी
आंदोलन न करता भाव वाढवून द्यावा, असं काळे यांनी म्हटलं. देशात पाच वर्ष पुरेल एवढी
दूध भुकटी असतांनाही केंद्र सरकारनं दुधाचे भाव पाडण्यासाठी न्यूझीलंडहून १० हजार मेट्रीक
टन दूधभुकटी खरेदी केल्याचा आरोप काळे यांनी केला.
****
गौरी गणपतीकरता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य परीवहन महामंडळाचे दर
नियमितच असतील, कोकणात जाणाऱ्या सर्वांना केंद्र सरकारच्या नियमानुसार दहा दिवस विलगीकरणात
रहावं लागेल, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळाच्या
कर्मचाऱ्यांचं थकलेलं वेतन लवकरच दिलं जाईल अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली. यासंदर्भात
काल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५५० कोटी रुपये निधी देण्याला मान्यता मिळाल्याचंही
परब यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आजपर्यंत एक लाख चार हजार १३७ शेतकऱ्यांना
५३२ कोटी २१ लाख रुपयांच्या पीक कर्जाचं वाटप करण्यात आलं आहे. जिल्ह्याचं खरीप पीक
कर्ज वाटपाचं एकूण उद्दिष्ट १ हजार ११५ कोटी ३१ लाख ९० हजार रुपये इतकं आहे.
****
No comments:
Post a Comment