आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२० ऑगस्ट २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधा झालेले नवीन ९१ रुग्ण आढळले. यामध्ये
ग्रामीण भागात ५६ तर महानगरपालिका हद्दीत ३५ रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणू बधित
रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ४९८ एवढी झाली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेली
१४ दिवसांची टाळेबंदी काल संपली. या काळात नागरीकांनी योग्य सहकार्य केलं असून, कुठेही
बळाचा वापर करावा लागला नाही, असं सांगून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नागरिकांचे
आभार मानले.
****
राज्यातल्या आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून
सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात
आला.
****
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं ११ ऑक्टोबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम
सेवा पूर्व परीक्षेसाठी ग्रामीण भागातल्या उमेदवारांना सोयीचं जिल्हा केंद्र निवडण्याची
संधी दिली आहे. २१ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्र बदलता येईल.
२० सप्टेंबरच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडलेल्या दुसऱ्या विभागातल्या
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात गणेशोत्सव आणि गौरी सणानिमित्त सर्व नागरिकांनी
कोविड-१९च्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे
यांनी केलं आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. सर्व
गणेश मंडळांनी यावर्षी सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करावा, असं त्या म्हणाल्या.
****
नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यात रात्री झालेल्या पावसामुळे अनेक
ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. सततच्या पावसामुळे पिकांच नुकसान होत असल्याचं आमच्य
वार्ताहरानं कळवंल आहे
****
औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकाहून आज सकाळी आंतरजिल्हा बससेवेला प्रारंभ
झाला. एका बसमध्ये ५० टक्के प्रवासी बसवण्यात येत असून प्रवाशांना मास्क घालणं बंधनकारक
आहे. औरंगाबादहून सध्या विविध मार्गावर २०९ फेऱ्यांचं नियोजन आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० तारखेला आकाशवाणीच्या मन की बात या
कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ६८ वा भाग असेल.
****
No comments:
Post a Comment