Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 August 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात कोविड19
च्या संक्रमणातून बरे होण्याचा दर ७४ पूर्णांक ३० शतांश टक्के झाला आहे. आतापर्यंत
जवळपास २१ लाख ५८ हजार ९४६ लोक या संक्रमणातून बरे झाले आहेत. मृत्यू दरातही घट झाली
असून तो एक पूर्णांक ८९ शतांश टक्क्यांवर आला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात
कोरोनाचे नवे ६८ हजार रूग्ण आढळले. या सोबतच देशात आता या संक्रमणानं प्रभावित लोकांची
एकूण संख्या २९ लाख ३६ हजार ९२६ झाली आहे. तर आतापर्यंत ५४ हजार ८४९ जणांचा मृत्यू
झाला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज सकाळी ११७ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. यात ग्रामीण भागातल्या ५२ आणि
महानगरपालिका हद्दीतल्या ६५ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची
एकूण संख्या १९ हजार ८५१ झाली आहे. त्यापैकी चौदा हजार ९२७ रुग्ण आतापर्यंत बरे झाले
आहेत. तर ६१७ जणांचा या विषाणूच्या संसंर्गानं मृत्यू झाला आहे. सध्या चार हजार ३०७
रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या
अत्यवस्थ रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याची व्यवस्था लातूरच्या
विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपलब्ध करण्यात आलेली आहे. औसा मतदार संघाचे
आमदार अभिमन्यू पवार, त्यांचे पुत्र परिक्षित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज प्लाझ्मा
दान केलं. यावेळी विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ मोहन डोईबोळे, जिल्हाधिकारी जी श्रीकांत
आदि उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची संख्या दिवेंसदिवस
वाढत असून जिल्ह्याचा मृत्यू दर हा राज्याच्या मृत्यू दरापेक्षा अधिक आहे. हा मृत्यू
दर कमी व्हावा, यासाठी यंत्रणा प्रयत्नरत आहे.
****
अहमदनगर
जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना कोरोना विषाणू संक्रमणातूनं बरे झाल्यानं रुग्णालयातून
सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार
६०९ इतकी झाली आहे.
****
वर्ध्याचे
आमदार डॉ. पंकज भोयर यांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून त्यांना सावंगीच्या रुग्णालयात
दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने आमदार भोयर घरी
विलगीकरणात होते. त्यांनी या कालावधीत जनसंपर्कही बंद केला होता. दरम्यान, त्यांची
प्रकृती उत्तम असून त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचेही नमुने तपासणीला पाठवण्यात आले
आहेत.
****
मुंबईत बोरीवली
इथं नाना पालकर स्मृती सामितीद्वारे नवीन डायलिसीस केंद्राचे लोकार्पण उत्तर मुंबई
मतदार संघाचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. या डायलिसीस केंद्रात
गरजू रुग्णांना ३५०रुपयांमध्ये डायलिसीस सेवा देण्यात येणार आहे.
****
अभिनेता
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयने तपासाला सुरुवात केली
आहे. काल सायंकाळी सीबीआयचं पथक मुंबईत दाखल झालं, आज सकाळी या पथकानं सुशांतसिंहच्या
स्वयंपाक्याची वायू दलाच्या विश्रामगृहावर चौकशी सुरू केली. सीबीआय पथक सुशांतसिंहच्या
आर्थिक व्यवहारांचीही पाहणी करणार असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रसिद्ध
अभिनेते दिलीपकुमार यांचे छोटे बंधू असलम खान यांचं आज मुंबईत कोविड संसर्गानं निधन
झालं, ते ८८ वर्षांचे होते. असलम खान आणि त्यांचे मोठे बंधू एहसान खान या दोघांना गेल्या
आठवड्यात कोविड संसर्गानंतर लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान ९७
वर्षीय दिलीपकुमार हे गेल्या मार्च महिन्यापासून पूर्णत: विलगीकरणात असल्याचं, त्यांच्या
पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी सांगितलं आहे.
****
पालघर जिल्ह्यात
समुद्रकिनारी छायाचित्रण करणाऱ्या तीन महिलांसह १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या
जलाशयं तसंच समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास मनाई केलेली आहे. मात्र या आदेशाचं उल्लंघन
करून, हे १७ जण केळवे समुद्र किनाऱ्यावर छायाचित्रण करत असल्याचं आढळलं होतं.
****
ईसापूर धरणातला
जलसाठा काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८२ टक्क्यांवर पोहोचला. सात वर्षांच्या खंडानंतर
धरणात प्रथमच समाधानकारक जलसाठा झाला असून, धरण पहिल्यांदाच ओसंडून वाहण्याच्या मार्गावर
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान,
येलदरी धरणातूनही सध्या सुमारे २० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
झालं आहे. नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, मदतीपासून
एकही शेतकरी वंचित राहू नये अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे.
****
No comments:
Post a Comment