Monday, 31 August 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2020 रोजीचे दुपारी 13.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 August 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.

****

न्यायालय अवमानना प्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयानं एक रुपया दंड ठोठावला आहे. हा दंड भरण्यास त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. भूषण यांनी निर्धारित मुदतीत एक रुपया दंड भरला नाही, तर त्यांना वकिली करण्यास तीन वर्षांची बंदी तसंच तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे. 

****

पूर्व लडाख मधल्या पँगोग त्सो तलावाजवळ भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गेल्या दोन दिवसांत झटापट झाली आहे. चिनी सैन्यानं काल मध्यरात्री लष्करी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हालचाली केल्या, त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय सैन्यानं हालचाल केल्याचं लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितलं आहे. दरम्यान, भारत आणि चीन सैन्याच्या अधिकाऱ्यांमध्ये लडाख इथंच ब्रिगेड कमांडर स्तरावर सध्या चर्चा सुरू आहे. चिनी सैन्यानं नव्यानं केलेल्या झटापटीतून यापूर्वी झालेल्या बैठकीतल्या निर्णयाचं उल्लंघन केलं असल्याचं, सैन्य दलानं म्हटलं आहे.

****

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर झाली आहे. मेंदूत गुठळी झाल्यानं, मुखर्जी यांच्यावर दिल्लीतल्या सैन्य रुग्णालयात गेल्या दहा ऑगस्टला शस्त्रक्रिया करण्यात आली, तेव्हापासून ते कोमात असून, त्यांना कृत्रीम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्या फुफ्फुसांतला संसर्ग वाढला असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. मुखर्जी यांना कोविडचा संसर्गही झालेला आहे.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती सुधारल्यानं, त्यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शाह यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे १८ ऑगस्ट रोजी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

****

देशात कोवीड-19 या आजारानं बरे होण्याचा दर ७६ पूर्णांक ६२ शतांश टक्के एवढा झाला आहे. कोविड संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २७ लाख ७४ हजार आठशे एक झाली असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. तपासण्यांचं वाढतं प्रमाण तसंच योग्य उपाययोजना, यामुळे या आजारानं होणाऱ्या मृत्यूचा दर कमी झाला असून, सध्या तो १ पूर्णांक ७८ टक्के इतका झाला आहे. देशात काल ७८ हजार ५१२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले असून देशात या आजारानं बाधित होणाऱ्या रुग्णांचा आकडा ३६ लाख २१ हजार २४५ झाला आहे. सध्या देशात ७ लाख ८१ हजार ९७५ रुग्णांवर उपचार सुरू आहे

आतापर्यंत देशात ४ कोटी २३ लाख तपासण्या झाल्या असून सध्या १ हजार चार सरकारी आणि ५८३ खाजगी प्रयोगशाळांमध्ये या तपासण्या करण्यात येत आहेत.

****

१ जानेवारी २०२० नंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे व्यवहार केलेल्या नागरिकांकडून वसूल केलेलं शुल्क त्वरित परत करण्याचे निर्देश केंद्रीय अर्थमंत्रालयानं बँकांना दिले आहेत. यापुढे इलेक्ट्रानिक माध्यमातून रुपे कार्ड, भीम-यूपीआई, यूपीआई क्यू आर कोड आणि भीम-यूपीआई क्यू आर कोडच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना बँकांनी कोणतेही शुल्क आकारू नये असं या अधिसूचनेत म्हटलं आहे. यासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं गेल्या वर्षी ३० डिसेंबरला अधिसूचनाही जारी केलेली आहे.

****

पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले गावात १६ एप्रिल रोजी झालेल्या दोन साधू आणि एक चालक अशा तिहेरी हत्याकांड प्रकरणात कासा पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंद काळे, उपनिरीक्षक रवी साळुंखे आणि हवालदार नरेश धोडी यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. यापूर्वी पाच पोलिसांना बडतर्फ करण्यात आलं असून एका पोलीस अधीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तर कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या ३५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत. 

****

पंढरपूर इथलं श्री विठ्ठल मंदीर उघडण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आज पंढरपुरात मंदिरासमोर आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी मंदीर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदीर परिसरात आंदोलक मोठ्या संख्येनं जमले असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यात अकोला आणि यवतमाळ हे दोन जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे १७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अकोला आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यातच सरासरीच्या २५ टक्के कमी पाऊस झाला आहे. दरम्यान, उद्या सकाळपर्यंत कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

No comments:

Post a Comment