Tuesday, 1 September 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 01 SEPTEMBER 2020 TIME – 18.00

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 September 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** दहा दिवस मनोभावे पूजन केलेल्या गणरायाला आज भक्तीभावानं निरोप

** धार्मिक स्थळं न उघडल्यास आंदोलनाचा खासदार इम्तियाज जलील यांचा इशारा

** माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

** औरंगाबाद इथं सहा कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू  

आणि

** वैद्यकीय प्रवेशासाठीचं ७०:३० सूत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी परभणीत स्वाक्षरी मोहीम सुरू

****

दहा दिवस मनोभावे पूजन केलेल्या गणरायाला आज भक्तीभावानं निरोप देण्यात येत आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे.

 

औरंगाबाद इथं आज दुपारपासूनच गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला. महापालिकेच्या वतीनं शहरात २२ ठिकाणी मूर्ती संकलन करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली, तर अकरा ठिकाणी थेट विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली. शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिरात बसवलेल्या गणेश मूर्तीचं मंदिरासमोरच व्यवस्था केलेल्या कृत्रीम कुंडात विसर्जन करण्यात आलं. ग्रामीण भागातही गणेश मूर्ती संकलनासाठी फिरत्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

जालना नगरपालिकेच्यावतीने शहरातल्या प्रत्येक प्रभागातून वाहनाद्वारे गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आलं, संकलित झालेल्या या मूर्तींचं तराफ्यांच्या सहाय्यानं मोती तलावात विसर्जन करण्यात येत आहे.

****

परभणी महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग निहाय गणपती एकत्रित करून विसर्जन करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. यासाठी प्रत्येक प्रभागात दोन ते तीन वाहनाद्वारे गणपती मूर्ती एकत्रित करण्यात आल्या. महापालिकेने राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून, या उपक्रमामुळे गणपती विसर्जनासाठी कुठेही गर्दी झाली नाही.

****

अकोल्यात गणपती विसर्जनासाठी कृत्रीम गणेश विसर्जन कुंड आणि फिरते गणेश विसर्जन कुंड तयार केले आहेत. त्याला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बुलडाणा जिल्हातही आज भावपूर्ण वातावरणात गणेशाला निरोप देण्यात आहे. खामगाव शहरातला मानाचा समजल्या जाणाऱ्या लाकडी गणपतीलाही भक्तीभावानं निरोप देण्यात आला.

रायगड जिल्हयात अलिबागसह सर्वत्र गणरायांना आज निरोप दिला जात आहे. विसर्जनासाठी समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या गणेश मूर्ती तसंच भक्ताचं स्वागत नगराध्यक्ष प्रशांत नाईक स्वतः करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आज कोणत्याही ठिकाणी विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या नाहीत. जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि दापोली इथं गणेश मूर्तींच्या संकलनाची केंद्रांवर भाविकांनी आपल्या घरच्या मूर्ती जमा केल्या. ग्रामीण भागात मात्र तलाव, नद्या आणि समुद्रावरच विसर्जन केलं जात असल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

शासनानं सर्व धार्मिक स्थळं उघडावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशारा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. ते आज शहरातल्या खडकेश्वर महादेव मंदिराच्या पुजारी यांना निवेदन देऊन मंदीर उघडण्याची विनंती करणार होते. मात्र, खासदार जलील येण्या अगोदरच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंदिरासमोर जमा होत जलील यांच्या आंदोलनाला विरोध केला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दरम्यान, आज गणपती विसर्जनासाठी पोलिस दलावर ताण असल्यानं, हे आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलिसांनी केली, त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घेत असल्याचं जलील यांनी सांगितलं. मात्र उद्या शहागंज इथल्या मशिदीत दुपारी नमाज अदा करुन आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले.

****

अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई परीक्षा तसंच वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेसाठी परीक्षार्थ्यांना मोफत बस सुविधा देण्यात यावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. अनेक विद्यार्थ्यांना शंभर ते तीनशे किलोमीटर प्रवास करून या परीक्षांसाठीचं प्रवेश केंद्र गाठावं लागणार आहे, त्यामुळे विद्यार्थी तसंच पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये, यासाठी या विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवासाची सुविधा द्यावी, असं आमदार चव्हाण यांनी म्हटलं आहे. या मागणीचं निवेदन चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. मध्यप्रदेश तसंच छत्तीसगड सरकारने अशी सेवा उपलब्ध करून दिल्याचं चव्हाण यांनी या पत्रात म्हटलं आहे. आजपासून सुरू झालेली जेईई परीक्षा येत्या ६ तारखेपर्यंत तर एनईईटी येत्या १३ सप्टेंबरला होणार आहे.

****

माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर आज नवी दिल्लीत शासकीय इतमामात कोविड प्रतिबंधासंबंधीचे नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्यदलाच्या वतीनं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून दिवंगत राष्ट्रपतींना मानवंदना देण्यात आली. यापूर्वी आज सकाळी मुखर्जी यांच्या निवासस्थानी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नवी आझाद, लोकसभेतले काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, यांच्यासह अनेक नेत्यांनी मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पायदल, वायूदल, तसंच नौदल या तीनही संरक्षण दलाच्या प्रमुखांनी मुखर्जी यांना मानवंदला दिली. १० ऑगस्टला मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्यापासून कोमात असलेले मुखर्जी यांचं काल सायंकाळी दिल्लीतल्या सैन्य रुग्णालयात निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते.

****

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरच्या वीरमठ संस्थानचे मठाधिपती राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचं आज नांदेड इथं निधन झालं, ते १०४ वर्षांचे होते. त्यांच्यावर नांदेड इथल्या नारायणा रुग्णालयात उपचार सुरु होते. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे लिंगायत समाजाचे धर्मगुरु होते. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेशात त्यांचा मोठा भक्त वर्ग आहे.

****

औरंगाबाद इथं आज सहा कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ७०५ जणांचा कोविड १९ नं मृत्यू झाला आहे.

****

परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून आज पहाटे फरार तिघा अट्टल गुन्हेगारांविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीनही गुन्हेगारांना कोरोना विषाणू लागण झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सकाळी सहा वाजता वैद्यकीय कर्मचारी औषधं देण्यासाठी गेले असता, हे तिघे फरार झाल्याचे समोर आलं.

****

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना कोविड-19 ची बाधा झाल्यानं जिल्हा रुग्णालयाच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच यावर यशस्वी मात करून पुन्हा जोमाने काम सुरू करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात दहा हजाराहून अधिक रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट्यं असलेल्या कौडगाव औद्योगिक क्षेत्राच्या विकासाकडे दुर्लक्ष्य का केलं जात आहे, असा सवाल आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना केला आहे. याबाबत पाटील यांनी देसाई यांना पत्र लिहून या औद्योगिक क्षेत्राच्या विकासासंदर्भात सौर प्रकल्प, टेक्सटाईल पार्क, आदी मुद्यांकडे लक्ष वेधलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन, इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं आणि अर्थकारणाला चालना मिळावी यासाठी व्यक्तिशः लक्ष देण्याची विनंती पाटील यांनी उद्योगमंत्र्यांना केली आहे.

****

नांदेड शहरात ख्रिश्चन दफन भूमीसाठी दहा एकर जमीन आरक्षित करण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. सध्या अस्तित्वात असलेली दफन भूमी अपूरी आणि गैरसोयीची आहे, असं जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

परभणी जिल्हयात वैद्यकीय प्रवेशासाठीचे ७०:३० सुत्र रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज पासून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. शिवाजी चौक इथून या स्वाक्षरी मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, आमदार राहुल पाटील, महापौर अनिता सोनकांबळे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

****

अहमदनगर जिल्हयाच्या अकोले तालुक्यातील कोतुळ नदीतुन मोठा विसर्ग सुरू असल्यानं नगरला पाणीपुरवठा करणारे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे नगरकरांची पाण्याची समस्या दूर झाली आहे. धरणाचे अकरा दरवाजे उघडून दोन हजार क्यूसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणात सध्या १८ हजार ९११ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. येत्या काही दिवसांत पाणी पातळी ९५ टक्क्यांच्यावर जाण्याची शक्यता आहे, धरणात ९५ पूर्णांक ९९ शतांश टक्क्यांपर्यंत पाणी साठवण्याची परवानगी असून, त्यानंतरही आवक सुरू राहिल्यास, धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 

No comments:

Post a Comment