▼

Sunday, 20 September 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 20 SEPTEMBER 2020 TIME – 18.00

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 September 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

**संसदेत विरोधकांच्या गदारोळात कृषी विधेयकं पारित

**कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

**औरंगाबादमधे कोरोना विषाणू संसर्गामुळे आठ रुग्णांचा मृत्यू

आणि

**परभणीमधल्या निम्न दुधना प्रकल्पाची चार तर नांदेडमधल्या विष्णूपुरी प्रकल्पाची दहा दारं उघडली

****

संसदेत आज दोन कृषी विधेयकं पारित झाली. `शेतकरी उत्पादनं - व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन आणि सुविधा विधेयक`, तसंच `शेतकरी हक्क आणि सुरक्षा दर हमी` ही विधेयकं आज राज्यसभेत विरोधी पक्ष सदस्यांच्या प्रचंड गदारोळात आवाजी मतदानानं पारित झाली. लोकसभेत यापूर्वीच ही विधेयकं संमत झाली आहेत. सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतकरी आणि राज्यांशी चर्चा करुन हे पाऊल उचललं असल्याचं कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. गेल्या सहा वर्षांत पिकाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ झाली असल्याचं ते म्हणाले. ही विधेयकं ऐतिहासिक असून, यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतीकारी बदल घडून येतील, असं तोमर यांनी नमूद केलं. शेतकरी त्यांचा शेतमाल देशभरात कुठेही मुक्तपणे विकू शकतील, असं ते म्हणाले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावरील चर्चेवेळी सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली, तसंच विधेयकाची प्रत हिसकावण्याचा प्रयत्नही यावेळी करण्यात आला. या गदारोळातच विधेयकं पारित करण्यात आली आणि त्यानंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.

****

ही कृषी विधेयकं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तसंच त्यांना अधिक समृद्ध करण्याच्या प्रयत्नांना प्रेरणा देतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यसभेनं आज कृषी विधेयकं पारित केल्यानंतर ते बोलत होते. शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना चांगल्या आयुष्याची खात्री देण्यासाठी आपण सरकारमधे असल्याचं ते म्हणाले. शासकीय खरेदी आणि हमी भाव कायम राहिल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. कृषी क्षेत्राला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अत्याधिक आवश्यकता असून त्याचा मार्ग आता सुकर होणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.   

दरम्यान, या विधेयकांच्या माध्यमातून केलेली कायद्याची तरतूद देशातल्या शेती व्यवसायाला स्वातंत्र्य, स्थैर्य आणि  उद्योगाचा  दर्जा मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल असा  विश्वास माजी कृषी आणि पणन मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे आज आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात या ससंर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ८६४ झाली आहे. औरंगाबादमधे कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या ३० हजार ४९१ झाली आहे.

****

ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली इथल्या एका १०६ वर्षे वयाच्या महिलेनं कोरोना विषाणू संसर्गावर यशस्वी मात केल्यानंतर तिला आज रुग्णालयातून शुभेच्छांसह निरोप देण्यात आला. या ज्येष्ठ महिलेला कोणतंही रुग्णालय प्रारंभी दाखल करून घेत नव्हतं. अखेर कल्याण डोंबीवली महापालिकेच्या कोरोना विषाणू रुग्णालयानं दाखल करून घेतल्यानंतर दहा दिवस उपचार घेऊन त्या आज घरी परतल्या.

****

कोरोना विषाणू संसर्ग परिस्थीतीमुळे गेल्या ६ महिन्यांचा संपत्ती कर माफ करावा अशी विनंती पश्चिम भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेनं राज्य सरकारला केली आहे. तीन महिन्यांचा संपत्ती कर माफ करण्याबाबतची घोषणा मुंबई महापालिकेनं केली होती. त्या पार्श्र्वभूमीवर ही मागणी करण्यात आली असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे.     

****

कोरोना विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर कमी का होत नाही, याचं उत्तर शोधण्याचा सर्वानी मिळून प्रयत्न केला पाहिजे, असं जलसंपदा मंत्री तसंच सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. सांगली इथं नव्या `कोविंड` रुग्णालयाचं लोकार्पण करताना ते आज बोलत होते. या रुग्णालयात ४० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून सामान्य रुग्णांना अल्प मोबदल्यात सेवा दिली जाणार आहे. या संसर्गावर उपचारासाठी भरमसाट देयकं आकारली जात आहेत, ते परवडत नाही म्हणून रोग अंगावर काढला जातो आणि त्यामुळे मृत्यूदर वाढण्याच्या दुष्टचक्रात आपण अडकलो आहोत, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणुचे ९९ नवे रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या ३ हजार ३७ झाली आहे. जिल्ह्यात या संसर्गावर मात केलेल्या रुग्णांची एकूण संख्या १ हजार ९०० झाली आहे तर आतापर्यंत ६४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या  १ हजार ७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या निम्न दुधना प्रकल्पाची चार दारं आज सकाळी उघडण्यात आली. यातून दुधना नदी पात्रात सात हजार १९० घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असून नदी काठच्या गावांतल्या नागरिकांनी सावध राहावं, असं आवाहन निम्न दुधना धरण पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे.

****

नांदेड शहराजवळच्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशयाची दहा दारं आज उघडण्यात आली आहेत. यातून १ लाख ११ हजार घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, नांदेड शहरातल्या शनी मंदिर घाटावरून पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका महिलेला दोन धाडसी नागरिकांनी आज वाचवलं. नांदेड शहरात आज विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुमारे २ तास मुसळधार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात मागील आठ दहा दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे पिकाचं मोठं नुकसान झाल्याच्या पार्श्र्वभूमीवर भोकर तालुक्यातल्या काही गाव शिवारात जाऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पाहणी केली. जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यावेळी उपस्थित होते.

****

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या सोयगाव देवी इथं पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून गेलेल्या वडील आणि मुलीचा मृत्यू झाल्याची दूर्घटना आज पहाटे उघडकीस आली. सोयगाव इथले विलास सहाने आणि सात वर्षीय कल्याणी सहाने अशी मृतांची नावं आहेत. हे दोघं काल सायंकाळी किराणा सामान खरेदी करण्यासाठी शेतातून गावात आले होते. या भागात मुसळधार पाऊस झाल्यानं गावालगत वाहणाऱ्या नाल्याला मोठा पूर आला होता. नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघंही दुचाकीसह वाहून गेले. दोघांचे मृतदेह आज पहाटेच्या सुमारास नाल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आढळून आले.

****

जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातला बारसवाडा इथला गल्हाटी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला असून त्यामुळे या भागातला पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्र्न मिटला आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत, औंढा आणि कळमणुरी तालुक्यात आज संध्याकाळी साडे चार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे तर दुसऱ्या आठवड्यात अतीवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पीक विमा कंपनीच्या माध्यमातून झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवण्यासाठी वैयक्तिक पंचनामे होणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीच्या `ॲप` वर पंचनामे करून घेण्यासाठी `ऑनलाइन` अर्ज करावेत असं आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.

****

आपण इतर मागास वर्गीय समाजाचे नेते असलो तरी मराठा आरक्षणासह अन्य सर्व प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकमधे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चातर्फे दोन दिवसांपूर्वी भुजबळ यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. या मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली.

****

गरज पडल्यास केंद्र सरकारनं राष्ट्रीय कृषी सहकारी विपणण संस्था- `नाफेड` मार्फत खरेदी केलेला एक लाख क्विंटल कांदा बाजारात आणून किमती स्थिर कराव्यात मात्र कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीनं रद्द करावा अशी आग्रही मागणी अहमदनगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना केली आहे. त्यांनी याबाबत सकारात्मक विचार करून दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं असल्याचं डॉक्टर विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

****

शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी या आणि अन्य मागण्यांसाठी आज नाशिक इथं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचं वाहन अडवण्याचा प्रयत्न करत त्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दडपशाही करून कार्यकर्त्यांवर कारवाई केली असल्याचा आरोप संघटनेचे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी केला आहे. वरिष्ठांच्या नजरेत येण्यासाठी आणि पदं मिळावी यासाठी अखील भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते राज्यात सर्वत्र आपल्या दौऱ्यात अशी आंदोलनं करत असल्याचा आरोप मंत्री सामंत यांनी या प्रकरणी केला आहे.

****

No comments:

Post a Comment