Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 September 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
**
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचं कामकाज आठवडाभर आधीच स्थगित
**
मुंबईत के.ई.एम आणि नायर रुग्णालयात "कोव्हिशिल्ड" लसीच्या चाचणीला सुरूवात
**
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश
**
औरंगाबाद जिल्ह्यात आज तीन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
**
अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी एनसीबीकडून दीपिका पदुकोणसह चार अभिनेत्रींना समन्स
आणि
**
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी विरोधात शेतकरी संघटनेनेची निदर्शनं
****
राज्यसभेचं
कामकाज आज अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी या अधिवेशन
काळात सदनानं शंभर टक्क्यांपेक्षा अधिक काम केल्याचं सांगितलं. सदनानं निर्धारित १८
बैठकांऐवजी १० बैठकांमध्ये २५ विधेयकं संमत केली, याशिवाय सहा विधेयकं सदनाच्या पटलावर
मांडली गेली आहेत. १४ सप्टेंबरपासून सुरू झालेलं हे अधिवेशन येत्या १ ऑक्टोबरपर्यंत
चालणार होतं, मात्र कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ते आठवडाभर आधीच स्थगित करण्यात
आलं. दरम्यान राज्यसभेनं आज विनियोग विधेयकं, कामगार कल्याण आणि सुरक्षा संबंधी तीन
विधेयकं, तसंच जम्मू काश्मीर अधिकृत भाषा विधेयकाला मंजुरी दिली.
लोकसभेचं
आजचं कामकाज आत्ता संध्याकाळी सुरू होत असून, लोकसभेचं कामकाजही आज अनिश्चित काळासाठी
स्थगित होण्याची शक्यता आहे.
****
संरक्षण
संशोधन आणि विकास परिषद - डीआरडीओनं रणगाडा भेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली
आहे. लेजर मार्गदर्शक तत्वानुसार कार्यरत या क्षेपणास्त्राची काल अहमदनगर इथं चाचणी
घेतल्याचं, डीआरडीओकडून सांगण्यात आलं. अर्जुन रणगाड्यावरून चाचणी घेतलेलं हे क्षेपणास्त्र
चार किलोमीटरवरच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे. चीन आणि पाकिस्तान सीमेवर
भारतीय रणगाड्यांची मारक क्षमता यामुळे अधिक सक्षम झाली आहे. डीआरडीओच्या या यशामुळे
भविष्यात संरक्षण साहित्याच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होईल, या शब्दात संरक्षण मंत्री
राजनाथसिंह यांनी डीआरडीओचं कौतुक केलं आहे.
****
मुंबईतील
महापालिकेच्या के.ई.एम रुग्णालय आणि नायर रुग्णालयात "कोव्हिशिल्ड" या लसीच्या
दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला आजपासून सुरूवात होत आहे. ऑक्सफर्ड
विद्यापीठ आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून या देशव्यापी चाचण्या करण्यात येत आहेत. आजपासून या चाचण्यांसाठी निवड प्रक्रिया सुरू होत
असून के.ई.एम. रुग्णालयात शंभर स्वयंसेवकांना ही लस देण्यात येणार आहे. ज्यांना आतापर्यंत
कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, अशांना ही लस दिली जाणार आहे. या चाचणीसाठी अत्यंत काटेकोरपणे
निवड प्रक्रिया राबवली जात असल्याचं के.ई.एमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितलं
****
कोविड
बाधित रुग्णांच्या उपचारासाठीच्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यांवर कडक
कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. या इंजेक्शनचा
निर्माण झालेला तुटवडा तात्पुरता असून, त्यासंदर्भात औषध उत्पादक कंपन्याशी चर्चा झाली
असल्याचं टोपे यांनी सांगितलं, ते म्हणाले…
रेमडेसिवीर हे जे अँटीव्हायरल इंजेक्शन आहे निर्मात्या कंपन्यांमध्ये
तात्पुरत्या स्वरुपाचा तुटवडा आहे.दोन दिवसांच्या आत या गोष्टी सुरळीत होतील.त्या कंपन्यांच्या
एमडींशी सुद्धा माझी चर्चा झालेली आहे. तुटवडा झाला म्हणून ब्लॅक मार्केटींग करावं
आणि पैसे त्यात कोणीतरी कमवावं ह्यातला भाग होवू नये म्हणून जे अधिकारी आहेत फुड ड्रगज
अथॉरिटीचे त्यांनाही सूचीत केलेलं आहे आम्ही की कुठल्याही परिस्थितीत ब्लॅक मार्केटींगवर कडक कारवाई करा आणि बाविशे रुपये
प्रती इंजेक्शन याच दराने विक्री या दृष्टीनं होण्याची आवश्यकता आहे.
****
नागपूर
विभागात नागपूर, भंडारा, आणि गोंदिया जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण तसंच वैद्यकीय
उपचाराच्या उपलब्ध सुविधा याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख
आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हे शासकीय रुग्णालय तसंच कोविड रुग्णालयांना
भेट देवून पाहणी करणार आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज तीन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गानं
जिल्ह्यात आतापर्यंत ८८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची
संख्या ३१ हजार ४४३ झाली असून २४ हजार ५०६ जण आतापर्यंत उपचारानंतर घरी परतले आहे.
****
अंमली
पदार्थ व्यवहार प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीनं अभिनेत्री दीपिका पदुकोण,
सारा अली खान, दिया मिर्झा आणि श्रद्धा कपूर यांना समन्स बजावलं आहे. या चौघींना चौकशीसाठी
तीन दिवसात हजर राहण्याचे आदेश एनसीबीनं दिलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपुत मृत्यू
प्रकरणाशी संबंधित अंमली पदार्थ व्यवहारासंदर्भात एनसीबी करत असलेल्या तपासादरम्यान,
या अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. या प्रकरणी एनसीबीनं अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह
बाराहून अधिक जणांना यापूर्वीच ताब्यात घेतलं आहे.
****
मुंबई
शहर आणि उपनगरात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टीची नोंद झाली. मुंबई शहर परिसरात २६७
मिलीमीटर, पूर्व उपनगरात १७१ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात २५१ मिलिमीटर एवढ्या पावसाची
नोंद झाली. कुलाबा इथं १३८ मिलिमीटर तर सांताक्रुझ इथं १२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सखल भागात पाणी भरल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई
उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यालयातल्या आपत्ती व्यवस्थापन
विभागास भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान मुंबईत आग्रीपाडा इथं दोन सुरक्षा
रक्षकांचा पाण्यात अडकलेल्या लिफ्टमध्ये बुडून मृत्यू झाला.
****
अहमदनगर
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कांदा, टमाटा आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. संगमनेर
तालुक्यात अतिवृष्टीमुळे झाल्यानं अंभोरे धरण भरलं असून देवनदीला प्रचंड पूर आला. त्यामुऴे
अनेक गावांचा संपर्क तुटल्याचंही आमच्या वार्ताहरानं कऴवलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात पैठण इथल्या नाथसागर धरणातून सध्या ४७ हजार १६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. धरणात सध्या ५३ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी
दाखल होत आहे. धरणाची पाणी पातळी ९५ पूर्णांक ४९ टक्के असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे
विभागानं दिली आहे.
दरम्यान,
नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर मधमेश्वर धरणातून २० हजार ६०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
केंद्र
सरकारच्या कांदा निर्यातबंदी विरोधात आज शेतकरी संघटनेने औरंगाबाद इथं केंद्रीय मंत्री
रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर निदर्शनं केली. संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष
कैलास तवार यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी निर्यातबंदी
तत्काळ रद्द करावी अशी मागणी समोर ठेवत 'खासदारांनो बोलते व्हा आणि आमचे प्रश्न संसदेत
मांडा' अशा घोषणा दिल्या.
परभणी
इथंही शेतकरी संघटनेच्या वतीन कांद्यावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवण्यात यावी या
मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानासमोर कांद्याची रांगोळी काढून त्यात
निर्यातबंदी निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन
देशमुख, माधवराव शिंदे, गणेशराव पवार, आदीं पदाधिकारी उपस्थित होते.
धुळ्यात
शेतकरी संघटनेनं खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या निवासस्थानासमोर निदर्शनं केली.
****
बुलडाणा
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीनं पंचनामे करुन नुकसान भरपाई
देण्यात या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जमिनीत गळ्यापर्यंत
गाडून घेत आंदोलन केलं. मागण्या माण्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी
घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यातल्या मानवत इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातल्या सकल मराठा समाजाच्या
वतीनं आज सकाळी तहसील कार्यालयासमोर कपडेफाड आंदोलन करण्यात आलं. समाजाच्या मागण्या
मान्य होईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
****
जालना
तहसील कार्यालयातल्या एका खाजगी संगणक चालकाला दोन हजार ४०० रुपये लाच घेतांना लाचलुचपत
प्रतिबंधक विभागानं आज रंगेहाथ अटक केली. पवन दत्तात्रय राऊत, असं लाच स्वीकारणाऱ्या
संगणक चालकाचं नाव असून, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजूर १२ हजार ४०० रुपये
अनुदान बँक खात्यावर हस्तांतरित करण्यासाठी त्यानं लाभार्थ्याकडे या लाचेची मागणी केली
होती.
****
धुळे
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातल्या कनिष्ठ लिपिकास आज पाच हजार रुपयांची लाच घेताना
लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलं. चंद्रकांत महाले असं या लिपिकाचे नाव आहे.
****
No comments:
Post a Comment