Thursday, 24 September 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 24 SEPTEMBER 2020 TIME – 18.00

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 September 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक –  २४ सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींनी व्यायाम हा जीवनशैलीचा भाग बनवावा- पंतप्रधानांचं आवाहन

** कोविड प्रतिबंधाच्या उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतली पन्नास टक्के रक्कम वापरण्यास केंद्राची राज्य सरकारांना परवानगी

** कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थना स्थळं न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

** सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

** औरंगाबाद जिल्ह्यात आज तीन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

आणि

** परभणी जिल्ह्यात २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान जनता संचारबंदी

****

प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींनी व्यायाम हा जीवनशैलीचा भाग बनवावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. फिट इंडिया मोहिमेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी आज व्यायामप्रेमी जनतेशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी आजच्या वातावरणात आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं सांगत, शारीरिक तंदुरुस्तीला वयाचं बंधन नसतं, याकडे लक्ष वेधलं. क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेता मिलिंद सोमण यांच्यासह सात प्रसिद्ध व्यायामप्रेमींशी संवाद साधून पंतप्रधानांनी त्यांचे अनुभव जाणून घेतले. ‘फिटनेस की डोस-आधा घंटा रोज’ हा मंत्रही पंतप्रधानांनी यावेळी दिला.

****

कोविड प्रतिबंधाच्या उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतली पन्नास टक्के रक्कम वापरण्यास केंद्र सरकारनं राज्य सरकारांना परवानगी दिली आहे. या निधीतून विलगीकरण सुविधा, चाचणी प्रयोगशाळा, प्राणवायू कार्यान्वयन प्रकल्प, व्हँटिलेटर्स तसंच पीपीई संच खरेदी आदी कामं करता येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून याबाबत सविस्तर निर्देश दिले आहेत. कोविड रुग्णालयं, कोविड सुश्रुषा केंद्र, तसंच सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका सुविधा आणि प्रतिबंधित क्षेत्र उभारण्यासाठीचा खर्चही यामध्ये समाविष्ट असेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थना स्थळं न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. यासंदर्भात दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान, मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या पीठानं या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं सांगितलं. कोविडग्रस्तांच्या संख्येत दररोज होणारी वाढ, ही धोक्याची घंटी असल्याचं, निरीक्षण मुख्य न्यायाधीशांनी नोंदवलं.

****

अभिनेत्री कंगना रानौतच्या बंगल्यातल्या पाडापाडीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर न्यायालयानं शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना उत्तर देण्यास सांगितलं आहे. न्यायालयानं या प्रकरणात बृहन्मुंबई महापालिकेचे अधिकारी भाग्यवंत लाटे यांच्यासह राऊत यांनाही प्रतिवादी केलं आहे. लाटे तसंच राऊत यांना या प्रकरणी उत्तर देण्यासाठी मुदतवाढ नाकारत न्यायालयानं, या प्रकरणावर उद्या शुक्रवारपासून सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं आहे.

****

विरोधी पक्ष दिशाहीन झाल्याची टीका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. संसदेत महत्त्वाची विधेयकं सादर होत असताना, विरोधकांनी सभात्याग केला, या विधेयकांवरच्या मतदानात सहभागी होण्याच्या सभापतींच्या सूचनांचंही विरोधकांनी पालन केलं नाही, असं जावडेकर म्हणाले. संसदेचं कामकाज ७० ते ८० दिवस चालतं, त्यात सहभागी होऊन आपली मतं मांडणं आवश्यक असतं, धरणं आणि निदर्शनांसाठी वर्षातले इतर दिवस उपलब्ध असतात, असंही जावडेकर यांनी नमूद केलं. कृषी सुधारणा विधेयकांवरून विरोधकांनी संसदेच्या कामकाजावर टाकलेल्या बहिष्काराच्या अनुषंगानं जावडेकर बोलत होते

****

सातवा वेतन आयोग आणि कालबद्ध पदोन्नती यासह विविध मागण्यांसाठी अकृषी विद्यापीठांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनात, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील तसंच संलग्नित सर्व महाविद्यालयातील कर्मचारी आजपासून सहभागी झाले आहेत. सुमारे दोन हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती कृती समितीचे समन्वयक डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिली. राज्यातील १४ अकृषी विद्यापीठं आणि महाविद्यालयातील कर्मचारी आजपासून ३० सप्टेंबर पर्यंत हे आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यशासन केवळ तोंडी आश्वासन देऊन कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

या आंदोलनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटना, सोलापूर युनिव्हर्सिटी ऑफिसर फोरम, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना या संघटनांनीही सहभाग घेतला आहे. सातवा वेतन आयोग, आश्वासित प्रगती योजना आणि इतर न्याय मागण्यासाठी आजपासून लेखणी बंद आणि ठिय्या आंदोलन सुरु करत असल्याचं या संघटनांकडून सांगण्यात आलं आहे.

****

राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज तीन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ८९३ जणांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोविड बाधितांची संख्या आता ३१ हजार ७७२ झाली असून २४ हजार ६९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

****

परभणी जिल्ह्यात परवा २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान जनता संचारबंदी लावण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनता संचारबंदी ही संकल्पना शंभर टक्के अंमलात आणून ती यशस्वी करणं गरजेचं आहे, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. या कालावधीत सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी जनता संचारबंदी शंभर टक्के यशस्वी करावी, असं आवाहन  जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तहसील कार्यालयासमोर घेराव आंदोलन केलं. आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाजी करत मराठा आरक्षण कायम करण्याची मागणी केली. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

दरम्यान, काही आक्रमक कार्यकर्त्यांनी जालना-औरंगाबाद महामार्गावर गेवराई फाटा परिसरात आरक्षणाच्या मागणीसाठी टायर पेटवून दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

इतर मागास वर्ग - ओबीसीच्या प्रचलित आरक्षणाला कोणताही धक्का न लावता, ओबीसी आरक्षणाचे सर्व फायदे मराठा समाजाला देण्यात यावेत, अशी भूमिका राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी मांडली आहे. ओबीसी समाजानं कायमचं मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिल्याचं मुंडे म्हणाले. दरम्यान, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाचं धोरण ठरवण्यासाठी पुढील आठवड्यात व्यापक बैठक घेतली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे अर्थात एसटी प्रवर्गाचं आरक्षण मिळावं आणि अनुसूचित जमातीच्या सर्व योजना धनगर समाजाला लागू कराव्यात या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा निर्णय धनगर समाजाच्या वतीनं घेण्यात आला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाओ सरकार जगाओ हे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी धनगर समाजाचं प्रतिक असणारे पारंपारिक गजी ढोल वाजवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

****

औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातल्या उप आयुक्त वर्षा ठाकूर यांची आज नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. ठाकूर यांची पदोन्नतीनं ही नियुक्ती करण्यात आल्याचं पत्र अपर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी जारी केलं आहे.

****

जालन्याचे नूतन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख हे आज कार्यालयात रूजू झाले. त्यांनी मावळते पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी देशमुख यांचं स्वागत केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या नाथसागर धरणातला पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. आज दुपारी धरणाची १८ दारं दीड फुटावर एक फूट उंचीपर्यंत खाली आणली गेली. आता धरणातून २२ हजार ४०१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदी पात्रात सोडण्यात येत असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे विभागानं दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर शहरालगत असलेला नारंगी सारंगी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे.

****

 

No comments:

Post a Comment