Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 September 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
**गड-किल्ले,
जलदुर्ग, लेणी, गुहा, प्राचीन मंदिरं यांचं संवर्धन आवश्यक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
**शासन
शेतकऱ्यांच्या पाठीशी, समाजानंही शेतकऱ्यांना साथ द्यावी - कृषी मंत्री दादा भुसे यांचं
आवाहन
**औरंगाबादमधे
कोरोना विषाणू संसर्गामुळे चार रुग्णांचा मृत्यू
आणि
**शिवसेने
सोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याची भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची
माहिती
****
राज्यातले
विविध गड-किल्ले, जलदुर्ग, लेणी, गुहा, प्राचीन मंदिरं यांचं संवर्धन होणं आवश्यक असल्याचं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पर्यटन दिनाचं औचित्य साधून नाशिक शहरातल्या
गंगापूर धरणाजवळ बांधण्यात आलेल्या तारांकित रिसॉर्टचं `ऑनलाईन` पद्धतीनं उद्घाटन करताना
आज ते बोलत होते. पर्यटनाला चालना मिळेल अशा पद्धतीनं विविध प्रकारच्या सोयीसुविधा
राज्याच्या पर्यटन खात्याकडून भविष्यात उपलब्ध करून दिल्या जाव्या, याकरता सरकारनं
अंदाजपत्रकात देखील भरीव तरतूद केली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पर्यटन
विकास महामंडळानं नाशिकमधे सुमारे २५ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या रिसॉर्टचा फायदा
नाशिकच्या अर्थकारणाला होईल असं नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
****
शासन
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून समाजानंही शेतकरी बांधवांना मानसिक आधार देऊन
त्यांना साथ द्यावी, असं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. ते आज हिंगोली
इथं हिंगोली तसंच परभणी जिल्ह्यातला पाऊस, पीक परिस्थिती आणि कृषी योजना अंमलबजावणीबाबतच्या
आढावा बैठकीत बोलत होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात प्रतिकूल परिस्थितीमधे जनतेला
कोणत्याही प्रकारचं अन्नधान्य आणि दुधाची कमतरता भासली नाही, याचं श्रेय सर्व शेतकरी
बांधवांना द्यावं लागेल असंही ते यावेळी म्हणाले. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे
ज्या ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे त्या ठिकाणी पिकांचे जलदगतीनं पंचनामे करावेत.
यासाठी आवश्यकता भासल्यास ग्रामविकास तसंच महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी नियुक्त
करावेत, असे आदेशही भुसे यांनी या बैठकीत दिले. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं प्रायोगिक
तत्वावर ५०० रोपवाटीका तयार करण्याचं काम सुरु असून, या रोपवाटीकांमध्ये भाजीपाल्यांची
रोपं तयार करण्यात येणार आहेत. याचा जास्तीत-जास्त लाभ मराठवाडा आणि विदर्भाला देण्याचा
मानस असल्याचं कृषी मंत्री यावेळी म्हणाले. कृषीमंत्र्यांनी आज नांदेड जिल्ह्यातल्या
कासारखेडा या गावातल्या शिवारांचीही पाहणी केली. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान सर्वांच्या
डोळ्यासमोर असून या नुकसानीतून सावरण्यासाठी शासनस्तरावर आपण प्रयत्नशील असून ही सर्व
परिस्थिती केंद्र सरकारच्याही निदर्शनास आणून देत असल्याचं कृषी मंत्री भुसे यांनी
सांगितलं.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या म्हाळसगाव इथला एक शेतकरी आज सकाळी आठ वाजेच्या
सुमारास पुराच्या पाण्यात वाहून गेला. रामेश्वर लिंबाजी आखरे असं या ३५ वर्षीय शेतकऱ्याचं
नाव आहे. मधुमती नदी ओलांडून मेथा इथल्या शेतातून घरी परत येत असताना पूर आल्यानं ही
दूर्घटना घडली असून प्रशासन त्यांचा शोध घेत आहे.
****
नाथसागर
आ।णि माजलगाव प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असून परभणी
जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज सकाळी गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. गंगाखेड इथं
आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास गोदावरीच्या पात्रातला गोवर्धन घाट आणि गोपीनाथराव
मुंडे घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. शहरातल्या बरकत नगर, तारुमोहल्ला परिसरातल्या
नागरिकांना हलवण्याच्या हालचाली प्रशासनानं सुरू केल्या आहेत.
****
मराठवाड्यासह
अनेक भागात अतिवृष्टी आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालं
असून राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारनं आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी
अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे. हेक्टरी
जिरायती २५ हजार रुपये आणि बागायती ५० हजार रुपये द्यायला हवे असं म्हणणारे मुख्यमंत्री
उध्दव ठाकरे या आपल्या शब्दाला कधी जागणार, असा प्रश्र्नही त्यांनी यावेळी उपस्थित
केला.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज कोरोना विषाणू संसर्गामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत
९१३ रुग्ण या संसर्गामुळे दगावले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात काल या संसर्गाचे ३३९ नवे
रुग्ण आढळून आले आहेत.
****
भारतीय
जनता पक्षाची शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्ष
नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. फडणवीस आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात
काल मुंबईत भेट झाली. या भेटीवरून वेगवेगळे तर्कवितर्क सुरू झाले होते. त्यावर फडणवीस
यांनी आज आपली बाजू स्पष्ट केली. राऊत यांच्यासह सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा
कालच्या बैठकीत केली नसल्याचं ते म्हणाले. सरकारच्या कामावर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश
असून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पटत नसल्यामुळे हे सरकार आपल्या कृतीनं कोसळेल,
असं भाकित फडणवीस यांनी यावेळी वर्तवलं. ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी आपण बघू,
सरकार बनवण्याची कोणतीही घाई आपल्या पक्षाला झालेली नाही, असं त्यांनी नमुद केलं. शिवसेनेचं
मुखपत्र 'सामना' या दैनिकासाठी मुलाखत घेण्याची
संजय राऊत यांची इच्छा असून याच मुलाखती संदर्भात ही बैठक झाली असल्याचंही फडणवीस यांनी
सांगितलं.
****
ऊसतोड
मजुरांना कुशल कामगारांचा दर्जा द्यावा, अशी मागणी आमदार सुरेस धस यांनी केली आहे.
जालना जिल्ह्यातल्या राजूर इथं भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र राज्य श्रमिक ऊसतोडणी
मजूर, मुकादम संघटनेच्या वतीनं घेण्यात आलेल्या एका चर्चासत्रात आज ते बोलत होते. ऊसतोड
मजुरांच्या सर्व मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत कुणीही या हंगामातल्या ऊसतोडीसाठी
जाऊ नये, असं आवाहन आमदार धस यांनी यावेळी केलं. ऊसतोड मजुरांच्या हक्काच्या या लढ्यात
संघटनेच्या सोबत असल्याचं आमदार संतोष दानवे आणि आमदार नारायण कुचे यावेळी म्हणाले.
****
साखर
कारखान्यांनी साखरेचं अतिरिक्त उत्पादन टाळण्यासाठी उत्पादन घटवून इथेनॉल निर्मीतीवर
लक्ष केंद्रित करावं, असं राज्य सहकारी साखर कारखाना महासंघानं म्हटलं आहे. साखर कारखान्यांना
तोटा टाळण्यासाठीही त्याचा उपयोग होईल, असं महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर
यांनी सांगितलं. देशात दरवर्षी २५० लाख टन साखरेची आवश्यकता असताना ३१० लाख टन साखरेची
निर्मीती होते तसंच तीन ते चार महिन्यांचा अतिरिक्त साठा उपलब्ध असतो, असंही त्यांनी
म्हटलं आहे. निर्याती नंतरही साखरेचा अतिरिक्त साठा शिल्लक रहातो त्यामुळे उत्पादन
घटवल्यानंतरही तुटवडा भासणार नाही तसंच दरांमधेही बदल होणार नाही, असं त्यांनी यावेळी
सांगितलं. राज्यामधे दर वर्षी ९० ते १०० टन साखर निर्मीती होते. यात दरवर्षी दहा लाख
टनांची कपात करण्याचं आपण ठरवत असून इथनॉल निर्मीती करून त्याचा पेट्रोल उत्पादक कंपन्यांना
पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती दांडेगावकर यांनी यावेळी दिली.
****
वैज्ञानिक
क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्यासाठी केंद्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘शांती स्वरूप
भटनागर पुरस्कार २०२०’ साठी सात श्रेणींमध्ये १४ वैज्ञानिकांना पुरस्कार जाहीर झाले
आहेत. अभियांत्रिकी विज्ञान श्रेणीमध्ये पुण्यातल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या
रासायनिक अभियांत्रिकी आणि प्रक्रिया विकास विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी
आणि मुंबईतल्या भाभा अणू संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. किंशुक दासगुप्ता यांना तर
मुंबईतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. सुर्येंदू
दत्ता यांना पृथ्वी, वातावरण, समुद्री आणि ग्रह विज्ञान श्रेणीमध्ये तर गणित विभागाचे
शास्त्रज्ञ डॉ. यु. के. आनंदवर्धन यांना गणिती विज्ञान श्रेणीतला पुरस्कार जाहीर झाला
आहे.
****
मराठा
क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमधे आरक्षणाच्या
मागणीसाठी पुणे जिल्ह्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता
पक्षाच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली.
****
No comments:
Post a Comment