Monday, 28 September 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 28 SEPTEMBER 2020 TIME – 18.00

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 September 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक –  २८ सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** उपाहारगृहं सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वं अंतिम झाल्यानंतर निर्णय घेणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

** अवैध गर्भपातांच्या चौकशीसाठी माजी पोलिस महासंचालक अजित पारसनीस यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन

** औरंगाबाद जिल्ह्यात आज चार कोविड बाधितांचा मृत्यू; जालना जिल्ह्यात संसर्गमुक्तीचं प्रमाण ७७ टक्क्यांवर

आणि

** अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी

****

राज्यातली उपाहारगृहं सुरु करण्यासंदर्भात शासनानं मार्गदर्शक तत्वं तयार केली असून ती अंतिम झाल्यानंतर उपाहारगृहं सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर इथल्या उपाहारगृह व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. माझं कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेत हॉटेल व्यावसायिकही समाविष्ट आहेतच, कर्मचारी आणि ग्राहक यांच्या प्रति हॉटेल चालकांची जबाबदारी आहे, त्यामुळे हा व्यवसाय पुन्हा सुरु करतांना अत्यंत काळजीपूर्वक पावलं उचलावी लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ही कार्यप्रणाली उपाहारगृहांसाठी त्रासदायक नसेल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

 यासंदर्भात पुन्हा एकदा हॉटेल व्यावसायिकांसमवेत बैठक घेऊन व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.

****

राज्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयांतील अवैध गर्भपातांची चौकशी आणि तपासणीसाठी माजी पोलिस महासंचालक अजित पारसनीस यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यात ज्या ठिकाणी अवैध गर्भपाताची घटना घडली आहे त्यांची चौकशी करुन, अशा घटनांसाठी कारणीभूत त्रुटी शोधणे तसंच त्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी करायच्या उपायोजना या समितीला सुचवायच्या आहेत. घटना घडल्यापासून एक महिन्याच्या आत समितीला आपला अहवाल सादर करणं बंधनकारक असणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानं याबाबतचा शासन निर्णय आज जारी केला आहे. माजी पोलिस महासंचालक पारसनीस यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत माजी आरोग्य सेवा संचालक सुभाष साळुंखे, जे.जे. रूग्णालयाच्या स्त्री रोग विभाग प्रमुखांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर, आरोग्य सेवा सहाय्यक संचालक या समितीचे सदस्य सचिव असतील.

****

’माझं कुटुंब,माझी जबाबदारी’या मोहिमेअंतर्गत क्षेत्रीय स्तरावरील समन्वय कार्यात दुर्लक्ष केल्याच्या कारणावरुन नाशिक जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजपत्रित वर्ग एक अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज चार कोविड बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं ९२० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात बाधितांच्या संख्येनं ३३ हजाराचा टप्पा गाठला आहे. यापैकी २६ हजार ११६ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या ५ हजार ९६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

परभणी जिल्ह्यात रुग्णांची संख्या ५ हजार १७८ इतकी झाली आहे. यापैकी ४ हजार ३१३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून आतापर्यंत २२१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६४४ जणांवर उपचार सुरु असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ७७ पूर्णांक ११ शतांश टक्के, तर मृत्यूदर २ पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दुप्पट होण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी लागत आहे. जिल्ह्यातल्या ८ हजार २२८ कोविड रुग्णांपैकी ६ हजार ३४५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात आज ८५६ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यासह जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३७ हजार ५३१ झाली आहे. जिल्ह्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९ पूर्णांक ३३ शतांश टक्के इतकं झालं आहे.

****

पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष भागवताचार्य वासुदेव नारायण उर्फ वा ना उत्पात यांचं आज पुण्यात कोविड संसर्गानं निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातल्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते़.

****

प्रसिद्ध गायिका भारतरत्न लता मंगेशकर आज वयाची ९१ वर्ष पूर्ण करून ब्याण्णवाव्या वर्षात पदार्पण केलं, त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही लता मंगेशकर यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या.

****

अभिनेता सुशांतसिंह राजपुत प्रकरणात अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नसल्याचं, केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं म्हटलं आहे. सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेनं सुरू आहे, याबाबत काहीही स्पष्ट होत नसल्याचं म्हटलं होतं, त्या पार्श्वभूमीवर सीबीआयकडून आज नवी दिल्लीत एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलं, या प्रकरणाच्या सर्व पैलूंचा तपास सुरू असून, आतापर्यंत एकही मुद्दा निकालात काढलेला नाही, असं या पत्रकात म्हटलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रशासनाला करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे, त्यातच अतिवृष्टीमुळे खरीपाची पिकं हातातून गेली आहेत, त्यामुळे पंचनामे करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपअधिक्षक यांना देण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यात गेल्या १५ दिवसातल्या सततच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी कॉंग्रेस समितीनं  जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राज्य सरकारनं कोणतेही निकष न लावता ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना पीक नोंदी पडताळून सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तालुका कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष पंजाब देशमुख, उपाध्यक्ष पवन निकम आणि इतर पदाधिकारी, सदस्यांनी केली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या  वैजापूर तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीचं निवेदन भारतीय जनता पक्ष आणि शेतकऱ्यांच्या वतीनं तहसीलदारांना देण्यात आलं.

****

जालना पोलीस दलात कार्यरत १३१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी बदल्या केल्या आहेत. एकाच ठाण्यात पाच वर्ष सेवा बजावणारे १६ सहायक पोलीस उपनिरीक्षक, ५२ पोलीस कॉन्स्टेबल आणि ६३ पोलीस नाईक यांचा बदली यादीत समावेश आहे.

****

औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचं  लेखणी बंद आंदोलन अद्याप सुरूच आहे. सातवा वेतन आयोग आणि अन्य मागण्यांसाठी हे आंदोलक योग्य शारिरीक अंतर ठेऊन मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन करत आहेत. पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला.

****

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं आज सकाळी दोघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, मृतांमध्ये एक महिला आणि तिच्या मुलाचा समावेश आहे, या महिलेचा अन्य एक मुलगा या धक्क्याने जखमी झाला. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.

****

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी आज औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या लोहगाव फाटा इथं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं. यामुळे औरंगाबाद पैठण मार्गावरील वाहतूक जवळपास एक तास खोळंबली होती. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आंदोलन ठिकाणी येऊन आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं.

****

 

No comments:

Post a Comment