Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 September 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९
सप्टेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
**
नवरात्रोत्सव आणि दसरा सण साधेपणानं साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारकडून
जारी
**
मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे वेगाने पंचनामे करून शेतकऱ्यांना
तत्काळ मदत द्यावी - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी
**
राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी फेटाळली
**
औरंगाबाद जिल्ह्यात आज दोन कोविड बाधितांचा मृत्यू
**
कोविड प्रतिबंधात्मक नियम मोडल्याप्रकरणी परभणीत तिघांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड
आणि
**
केंद्र शासनाने संमत केलेल्या कृषी सुधारणा विधेयकांच्या समर्थनात शेतकरी संघटनेचं
२ ऑक्टोबरला राज्यव्यापी संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन
****
कोरोना
विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव आणि दसरा सण साधेपणानं साजरा
करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं आज जारी केल्या. या मार्गदर्शक सूचनांनुसार,
देवीच्या मूर्तींची उंची, सार्वजनिक मंडळांसाठी चार फुटांपर्यंत तर घरगुती देवीच्या
मूर्तीची उंची दोन फुटांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक
कार्यक्रम आयोजित करू नयेत, त्या ऐवजी आरोग्य विषयक उपक्रम आणि शिबिरांना प्राधान्य
द्यावं अशा सूचना राज्य सरकारनं केल्या आहेत.
****
मराठवाड्यात
अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे वेगाने पंचनामे करून शेतकर्यांना तत्काळ
मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. सरकारचे प्रमुख म्हणून जागोजागी पंचनामे होत आहेत
की नाही, प्रत्यक्ष जमिनीवर काय स्थिती आहे, याकडे अधिक कटाक्षाने लक्ष देण्याची गरज त्यांनी
व्यक्त केली. विदर्भातल्या पूरग्रस्तांसोबत अन्याय केल्यानंतर आता मराठवाड्यातल्या
शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करत असल्याचं फडणवीस यांनी पत्रात
म्हटलं आहे.
****
अतिवृष्टीमुळे
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीसाठी ठोस निर्णय घेवून आर्थिक पॅकेज जाहीर
करण्याची मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. खासदार जलील यांनी
राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि संबंधित अधिकाऱ्यांसह आज
कन्नड तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. सरकारनं कायद्यात
रुपांतर केलेली कृषी विधेयकं शेतकर्यांच्या विरोधी असल्याचं ते म्हणाले.
****
छत्रपती
संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांची भारतीय जनता पक्षानं राज्यसभेवर खासदार म्हणून
नियुक्ती केली असून, दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा,
असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा़सदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज सोलापूर
इथं वार्ताहरांशी बोलत होते. खासदार संजय राऊत हे संपादक असून, त्यांनी प्रथम आपली
मुलाखत घेतली, त्याच वेळेस त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांची
मुलाखत घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं, त्यामुळे फडणवीस - राऊत भेटीला राजकीय अर्थ
नाही, असं सांगून पवार यांनी, काही झालं तरी हे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचं स्पष्ट
केलं. देशाचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी केंद्र सरकारने अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू
प्रकरणाचा तपास करण्यासाठी विविध संस्था लावल्या होत्या, मात्र त्यांचा तपास इतर दिशेने
सुरू असल्याचा आरोप पवार यांनी केला. केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांना सर्व
मिळून विरोध करणार असून, याचं नेतृत्व शेतकरीच करणार असल्याचं पवार यावेळी म्हणाले.
****
राज्यात
मध्यावधी निवडणुकांची शक्यता शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावली
आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ
पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात
केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
यांची नुकतीच घेतलेली भेट ही सामना दैनिकासाठी मुलाखतीचं वेळापत्रक निश्चित करण्यासंदर्भात
होती, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. बिहार निवडणुकीसंदर्भातही या बैठकीत काहीही चर्चा
झाली नाही, मात्र भाजपनं बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्रातल्या नेत्याकडे
सोपवली, याचा आपल्याला आनंद झाल्याचं राऊत यांनी नमूद केलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज दोन कोविड बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू
झालेल्या रुग्णांची संख्या आता ९२७ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित
रुग्णांची संख्या ३३ हजार १७४ झाली आहे. यापैकी २६ हजार ३५९ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन
घरी परतले आहेत.
****
कोविड
प्रतिबंधाचा नियम मोडल्याप्रकरणी परभणीचे मुख्य न्याय दंडाधिकारी महेश तिवारी यांनी
तीन जणांना प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मोटारसायकलद्वारे पुण्याहून
परभणी इथं परतलेल्या आणि कोरोना विषाणू बाधित निघालेल्या परभणी जिल्ह्यातल्या पहिल्या
कोविड बाधित युवकासह तिघांचा यात समावेश आहे. साथ रोग पसरेल अशी जाणीवपूर्वक कृती करून
जिल्हा बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. १६ एप्रिल रोजी टाळेबंदी
असताना हा युवक परभणीत आला होता.
****
केंद्र
शासनाने संमत केलेल्या कृषी सुधारणा विधेयकांच्या समर्थनात शेतकरी संघटना येत्या २
ऑक्टोबरला राज्यव्यापी संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन करणार आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष
अनिल घनवट यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. शेतकरी संघटनेच्या अनेक वर्षाच्या मागणीनुसार
या कायद्यामुळे शेतकऱ्यांसाठी बाजार पेठ खुली होत आहे मात्र आवश्यक वस्तू कायद्यातून
वगळलेल्या वस्तू, भाव वाढ झाल्यास पुन्हा आवश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेत घेण्याच्या
तरतुदीला शेतकरी संघटनेचा विरोध असल्याचं घनवट यांनी सांगितलं. या त्रुटी सुधारून शेतकऱ्यांना
संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावं, या मागणीसाठी २ ऑक्टोबरला राज्यव्यापी समर्थन आणि
संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन करणार असल्याची माहिती घनवट यांनी दिली. केंद्र सरकार योग्य
दिशेने वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जात
प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेची ३५ हजारच्या वर प्रकरणे प्रलंबित असून, ही सर्व
प्रकरणे एक महिन्याच्या आत निकाली काढण्याचे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष
सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या
अधिकाऱ्यांना दिले आहेत. वेब पोर्टलच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन पद्धतीनं
सुरू असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेच्या ६ महिन्यांच्या कामकाजाचा आढावा
आज मुंडे यांनी घेतला. प्रमाणपत्र देण्याच्या कामास गती देण्याच्या सूचना मुंडे यांनी
यावेळी केल्या.
****
२०२०-२१
या हंगामातील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने सोयाबीन खरेदी नोंदणीला परवा
१ ऑक्टोबर पासून तसंच प्रत्यक्ष खरेदीला १५ ऑक्टोबर पासून सुरूवात होणार आहे. शेतकऱ्यांनी
नोंदणीकरिता आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर आधारकार्डाची छायांकित प्रत आणि
पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा, असं आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील
यांनी केलं आहे. केंद्र शासनानं ३ हजार ८८० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे सोयाबीनचा
हमी भाव जाहीर केला आहे. दरम्यान, १५ सप्टेंबर पासून नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या
उडीद खरेदीला १ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
मराठा
आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या
वतीनं आज ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यात तसंच औंढा, वसमत, सेनगाव, कळमनुरी
इथल्या तहसील कार्यालयासमोरही आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यात बंदी असलेला गुटखा विक्रीसाठी आणणाऱ्या सय्यद इमरान सय्यद मजुमिया याला पोलिसांनी
बसस्थानकावर ताब्यात घेतले. गंगाखेडहून गुटखा घेऊन एक व्यक्ती येणार असल्याची माहिती
पोलिसांना मिळाली होती. त्याच्याकडून २८ हजार ८०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
न्यायालयानं त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
औरंगाबाद
व्यापारी संघानं शहरातल्या मुख्य रस्त्यांवरच्या हातगाडी चालकांविरूद्ध कारवाईची मागणी
केली आहे. या मागणीचं निवेदन व्यापाऱ्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात सादर केलं.
****
No comments:
Post a Comment