Tuesday, 1 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.09.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 September 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं काल दीर्घ आजारानं निधन.

·      राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पासची अट रद्द, खाजगी प्रवासी वाहनांनाही परवानगी. चित्रपटगृह, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, शाळा, महाविद्यालयं, इतर शैक्षणिक संस्था आणि खाजगी शिकवणी वर्ग ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार.

·      १४ सप्टेंबरपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन.

·      विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचा राज्य सरकारचा विचार.

·      मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी मराठवाडा महसूल विभागाचे अशोक डक.

·      दहा दिवसीय गणेशोत्सवाचा आज समारोप, मिरवणुका न काढताच विसर्जन.

·      राज्यात ११ हजार ८५२ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण, तर १८४ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.

आणि

·      मराठवाड्यात ४१ कोरोना बाधितांचा मृत्यू, तर नव्या एक हजार १७९ रुग्णांची नोंद. 

****

माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं, ते ८४ वर्षाचे होते. नवी दिल्लीतल्या लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. मेंदूत रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शस्त्रक्रियेनंतर ते कोमात गेले होते. तत्पूर्वी त्यांना कोरोना विषाणू संसर्गही झाला होता. मुखर्जी यांच्या निधनानं पाच दशकांच्या झंझावती राजकीय कारकिर्दीचा अस्त झाला आहे.

२०१२ ते २०१७ या कालावधीत देशाचं राष्ट्रपती पद भूषवलेल्या मुखर्जी यांनी देशाच्या राजकारणात एक आदर्श निर्माण केला आहे. अभ्यासू आणि मुत्सद्यी म्हणून राजकीय वर्तुळात ख्याती असलेले मुखर्जी राजकारणात अजातशत्रू होते. इतिहास, राज्यशास्त्र तसंच कायद्याचे अभ्यासक मुखर्जी यांनी १९६९ साली सक्रीय राजकारणात प्रवेश केला. काँग्रेस पक्षानं त्यांना सर्वप्रथम राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली. त्यानंतर २०१२ पर्यंत त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळात वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार, संरक्षण तसंच अर्थ मंत्रालयासारख्या महत्वाच्या खात्यांची मंत्रीपद भूषवली. पंतप्रधान नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं. अफ्रिकन विकास बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी, तसंच वर्ल्ड बँकच्या संचालक मंडळावरही त्यांनी भारताचं प्रतिनिधीत्व केलं. २००४ आणि २००९ मध्ये पश्चिम बंगालमधून ते लोकसभेवर निवडून आले होते. त्यापूर्वी पाचवेळा त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. २००८ मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर २०१२ मध्ये ते राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. गेल्या वर्षीचं त्यांना देशाच्या सर्वोच्च मानाच्या ‘भारतरत्न’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

मुखर्जी यांच्या निधानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. देशानं आज एक सुपूत्र गमावला असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. तर मुखर्जी यांनी देशाच्या विकासात आपला अमिट ठसा उमटवला तसंच ते एक विद्वान विचारवंत होते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.

मुखर्जी यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

****

केंद्र सरकारच्या अनलॉक-चारच्या नियमावलीनंतर काल राज्य सरकारनंही आपली नियमावली जारी केली. यानुसार राज्यातली टाळेबंदी ३० सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे. उद्या दोन सप्टेंबरपासून राज्यातली आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई पासची अटही काढून टाकण्यात आली आहे. त्याचबरोबर खाजगी प्रवासी वाहनांनाही परवानगी दिली आहे. ६५ वर्षावरील व्यक्ती आणि १० वर्षाखालील बालकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला असून, काही प्रमाणातल्या शारिरीक हालचालींना परवानगी दिली आहे. हॉटेल आणि लॉज पूर्ण क्षमतेनं चालवण्यास मान्यता देण्यात आली असून, सरकारी कार्यालयातल्या सर्व गट अ आणि ब अधिकाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे. इतर कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

या काळात सर्व प्रकारची दुकानं सुरू राहतील, मात्र मेट्रो सेवा, बार, चित्रपटगृह, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, शाळा, महाविद्यालयं, इतर शैक्षणिक संस्था आणि खाजगी शिकवणी वर्ग ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी कायम असून, लग्नकार्यासाठी ५० जणांची तर अंत्यंविधीसाठी २० व्यक्तींची अट कायम ठेवण्यात आली आहे. ही नियमावली ३० सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरला सुरु होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लोकसभेचं कामकाज १४ तारखेपासून सकाळी नऊ वाजता सुरु करण्याचे आदेश दिल्याचं लोकसभा सचिवालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. राज्यसभेचं कामकाज याच दिवशी सुरु होईल, मात्र वेळ वेगळी असेल. अधिवेशनादरम्यान कोविड 19 प्रतिबंधासाठी लागू असलेल्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्यात येणार आहे.

****

न्यायालय अवमानना प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं ठोठावलेला एक रुपया दंड भरणार असून, पुनरावलोकन याचिका दाखल करण्याचा अधिकार राखून ठेवणार असल्याचं ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. न्यायव्यवस्थेबद्दल आपल्याला आदर आहे. सर्वोच्च न्यायालयाचा किंवा न्यायव्यवस्थेचा अनादर करण्याचा आपला हेतू नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

राज्यात पदवी आणि पदव्यूत्तर विषयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येतील, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लावला जाईल, आणि ही परीक्षा कमी गुणांची असेल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे करणार असल्याचं, ते म्हणाले. औरंगाबादचं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, तसंच नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासह बहुतांश विद्यापीठांनी परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत मागितल्याचं सामंत यांनी सांगितलं. ७ लाख ९२ हजारावर विद्यार्थी ही परीक्षा देतील, मात्र त्यांना घराबाहेर न पडता, घरीच बसून परीक्षा देता यावी, याबाबत विचार करण्यासाठी एक दिवसाचा वेळ विद्यापीठांनी मागितला असल्यानं, पुढच्या दोन दिवसांत आयोगाकडे याबाबत मागणी करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

****

दहा दिवसांत नियमावली तयार करून राज्यातली प्रार्थना स्थळं उघडण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. राज्यातली प्रार्थना स्थळं खुली करण्याच्या मागणीसाठी आंबेडकर यांनी काल पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदीर परिसरात आंदोलन केलं. यावेळी आंबेडकर यांच्यासह पंधरा जणांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते. दहा दिवसात मागणी मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या आंदोलनावेळी कोविड प्रतिबंधाबाबतचे कोणतेही नियम पाळले गेले नसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

शेतीमध्ये आता ‘विकेल तेच पिकेल’ हे ब्रीद वाक्य समोर ठेऊन राज्यातल्या कृषीविषयक स्टार्टअप्सना तसंच शेतकरी कंपन्या आणि गटांना कशा रीतीने प्रोत्साहन देता येईल याचा कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी, सहकार आणि पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. मुंबईत काल कृषी विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. कृषी अभ्यासक्रमात प्रामुख्याने कृषी व्यवस्थापन आणि विपणन विषयक अभ्यासावर भर देण्यात यावा, त्याचप्रमाणे प्रयोगशील आणि होतकरू, तरुण शेतकऱ्यांना या मोहिमेत सामावून घ्यावं, असं ते म्हणाले. कृषी विषयक उद्योगांना चालना देण्यासाठी कृषी विभागाच्या स्मार्ट, पोकरा, आत्मा यासारख्या अर्थ सहाय्य करणाऱ्या योजनांची सांगड घालण्यात येईल, जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

****

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी मराठवाडा महसूल विभागाचे अशोक डक यांची तर पुणे महसूल विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय वाडकर यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली. बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी काल निवडणूक घेण्यात आली. डक हे बीड जिल्ह्यातील माजलगाव बाजार समितीचे अध्यक्ष आहेत.

****

दहा दिवसीय गणेशोत्सवाचा आज अनंत चतुर्दशीला समारोप होत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींचं विसर्जन मिरवणुका न काढता सर्वत्र साधेपणाने करण्याचं आवाहन शासनानं केलं आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, तसंच शक्य असल्यास घरी बसवलेल्या गणेश मूर्तींचे घरीच विसर्जन करावं असं आवाहनही सर्व जिल्ह्यांच्या स्थानिक प्रशासनानं केलं आहे.

औरंगाबाद शहरात २५ ठिकाणी मूर्ती संकलन करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, तर अकरा ठिकाणी थेट विसर्जनाची व्यवस्था केली आहे.

नांदेड शहरात गणेश मूर्ती विसर्जनासाठी नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या वतीनं कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.

लातूर जिल्ह्यात गणेश मूर्ती संकलन केंद्र उभी करून त्या ठिकाणी मूर्ती जमा कराव्यात, त्यांचे विधीपूर्वक विसर्जन केले जाईल असं आवाहन लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे.

बीड जिल्ह्यात पोलीस यंत्रणेकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात विसर्जनाकरता २१५ संकलन केंद्र आणि १५५ ट्रॅक्टरची सोय करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातही गणेश मूर्तींच्या संकलन आणि विसर्जनासाठी ४० वाहनांची महानगरपालिका प्रशासनाने व्यवस्था केली असून ती वाहनं सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन गणेश मूर्ती आणि निर्माल्याचं संकलन करणार आहेत. संकलित मूर्तींसह निर्माल्याचे विसर्जन वसमत रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात केलं जाणार असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे. दरम्यान, परभणी शहरात काल नानलपेठ पोलिस, नवामोंढा आणि कोतवाली पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पथसंचलन केलं.

उस्मानाबाद नगरपालिकेने शहरात सर्व भागात गणेश मूर्ती संकलनासाठी पर्यावरण पूरक रथ तयार केले असून नागरिकांनी या रथात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचं आवाहन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केल आहे. कळंब नगरपालिकेनही मूर्ती संकलनासाठी वाहन व्यवस्था केली असून घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीचे सामूहिक विसर्जन केलं जाणार असल्याचं नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी सांगितलं. तर तुळजापूर शहरातही नगरपालिका सात ठिकाणी गणेश मूर्ती संकलन करणार असल्याचं मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यासाठीचा कोविड-19 साठीचा ४० कोटी रुपयांचा निधी लवकरच देण्याचं आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या समर्पित कोविड-19 रुग्णालयाचं काल टोपे यांच्या हस्ते दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. आरोग्याच्या बाबतीत जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या मागण्या अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. एक हजार खाटांचे स्वतंत्र रूग्णालय हे जिल्हा वासियांना खुले करून देण्यात येत असल्याचं टोपे म्हणाले.

****

राज्यात काल ११ हजार ८५२ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले तर १८४ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या सात लाख ९२ हजार ५४१ इतकी झाली आहे. आतापर्यंत एकूण पाच लाख ७३ हजार ५५९ बाधित रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर राज्यातल्या विविध रुग्णालयांत एकूण १ लाख ९४ हजार ५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत ४१ लाख ३८ हजार ९२९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील एकूण बाधित मृतांचा आकडा २४ हजार ५८३ इतका झाला आहे.

****

मराठवाड्यात काल ४१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार १७९ रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात काल दहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ३१० रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यातही दहा जणांचा मृत्यू झाला, तर नव्या २९० रुग्णांची भर पडली. लातूर जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाला, तर नव्या १७४ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी १३४ रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ६५ रुग्णांची भर पडली. परभणी जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ११२ रुग्णांची नोंद झाली. जालना जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर आणखी ६७ जण बाधित आढळले. तर हिंगोली जिल्ह्यात काल आणखी २७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. 

****

मुंबईत काल एक हजार १७९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ३२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात काल एक हजार ९३३ नवे रुग्ण, तर ७३ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात आणखी ८९६ रुग्ण आढळले, तरदहा जणांचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात ९९८, सातारा ६६१, अहमदनगर ४२१, पालघर २५१, अमरावती १५८, गडचिरोली ६२, वाशिम ३१, सिंधुदुर्ग २२, तर धुळे जिल्ह्यात काल आणखी २० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. 

****

वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी असलेला ७०-३० चा नियम मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून तो तत्काळ रद्द करावा, अशी मागणी खासदार सुधाकर श्रृंगारे आणि माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात प्लाझ्मा थेरपी पद्धतीने उपचार करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. याबाबतचं पत्र काल प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.

****

जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था-वाल्मीला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सर्वांनी अधिक सक्रियतेनं काम करण्याचे निर्देश मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेताना ते बोलत होते. वाल्मीमध्ये शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, चर्चासत्रं आणि संशोधन उपक्रमात भरीव प्रमाणात वाढ होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. संस्थेनं येत्या वर्षभराचा प्रशिक्षण आराखडा विभागनिहाय सादर करण्याची सूचनाही गडाख यांनी यावेळी संबंधितांना दिली.

****

परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील रामेटाकळी इथला तलाठी राजकुमार उत्तमचंद शर्मा याला एक हजार रुपयांची लाच घेतांना काल रंगेहाथ पकडण्यात आलं. सातबारा उताऱ्यावरील बोजा कमी करून देण्याकरता त्याने दिड हजार रुपयांची लाच मागितली होती.

****

No comments:

Post a Comment