Thursday, 3 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.09.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०३ सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

देशात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणू लागण झालेले नवे ८३ हजार ८८३ रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात आढळलेल्या रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे. यामुळे देशातली कोविड बाधितांची एकूण संख्या ३८ लाखाच्यावर पोहोचली आहे.

****

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे धाकटे बंधू एहसान खान यांचं आज मुंबईत कोरोना विषाणू संसर्गामुळे निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. दिलीप कुमार यांचे सर्वात लहान बंधू असलम खान यांचंही २१ ऑगस्टला कोविड संसर्गामुळे निधन झालं. या दोघांनाही गेल्या १५ ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या २४ हजार १४ झाली आहे. आजपर्यंत एकूण ७१६ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ४ हजार ५२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत १८ हजार ७७५ कोविड बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

****

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पकडलेल्या त्रेचाळीस कोटी रुपयांच्या सोने तस्करी संदर्भात सीमाशुल्क आणि केंद्रीय जीएसटी पथकानं सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात छापे घातले. विविध ठिकाणी केलेल्या या कारवाईत महत्त्वाची अनेक कागदपत्रं जप्त केल्याचं वृत्त आहे. या प्रकरणी अटक केलेले आठही जण हे सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातले आहेत.

****

उस्मानाबाद इथले निवृत्त प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांना केंद्रीय हिंदी निदेशालयचा पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. प्राचार्य वेदालंकार यांनी पु.ल.देशपांडे यांच्या दोन पुस्तकांचा हिंदीतून भाषांतर केलं होतं, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून नदीपात्रात आज पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं पुराचा इशारा दिला आहे. काल रात्री धरणाची पाणी पातळी ही ९५ टक्क्याहून अधिक झाली, धरणात सध्या पाण्याची मोठी आवक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी ९६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर धरणातून पाणी सोडलं जाणार आहे.

****

No comments:

Post a Comment