Saturday, 5 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.09.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 September 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणि राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारची आता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम.

·      पदवी आणि पदव्युत्तर विषयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात राज्यातल्या विद्यापीठांनी सात सप्टेंबरपर्यंत सविस्तर आराखडा सादर करण्याचे राज्य सरकारचे निर्देश.

·      महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहणं सुरक्षित वाटत नसेल त्यांना राज्यात राहण्याचा कोणताही अधिकार नाही - गृहमंत्री अनिल देशमुख.

·      अंमली पदार्थ विक्री प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतसिंगचा गृह व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडाला अटक.

·      राज्यात आणखी १९ हजार २१८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, तर ३७८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      मराठवाड्यात ३९ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या एक हजार ८०४ रुग्णांची नोंद.

आणि

·      लेखक बालाजी सुतार यांना यंदाचा बी. रघुनाथ स्मृती पुरस्कार जाहीर.

****

कोरोना विषाणू संसर्गावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी तसंच राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. कोविड १९ उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागानं नियुक्त केलेले स्वयंसेवक राज्यातल्या दोन कोटी २५ लाख कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन पातळी तपासणी, लोकांना आरोग्य शिक्षण आणि महत्त्वाचे आरोग्य संदेश देणं, संशयित कोरोना रुग्ण शोधणं आणि उपचारासाठी संदर्भ सेवा देणार आहेत. ही मोहीम पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान तर दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

****

नागपूर विभागातल्या पूरग्रस्तांना तातडीनं मदत देण्यासाठी १६ कोटी ४८ लाख २५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली. या निधीतून, पूर परिस्थितीमुळे बाधीत झालेल्या नागरिकांना तातडीनं सानुग्रह अनुदान, पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी मदत त्याचप्रमाणे मदत छावण्यांमध्ये आश्रयाला असणाऱ्या नागरिकांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय देखभाल या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

****

राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत ग्रामपातळीवरील महसुली लेखांकन पद्धत म्हणजेच सातबारामध्ये १२ बदल करण्यात आले आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. यात प्रत्येक गावासाठी संगणकीय सांकेतिक क्रमांक, प्रत्येक सात बारावर सांकेतिक चिन्हासह शासनाचा शिक्का आणि `क्यूआर कोड` हे सातबाराचं वैशिष्ट्य ठरणार असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे. यापुढे आता प्रत्येक गाव आणि खातेदाराला स्वतंत्र वैयक्तिक संगणकीय क्रमांक देण्यासोबत गाव नमुना क्रमांक सात अधिकार अभिलेख पत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सातबारा उताऱ्यात नव्या बदलामुळे राज्यातल्या जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन जमीन महसूलविषयक वाद कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

****

पदवी आणि पदव्युत्तर विषयाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यासंदर्भात राज्यातल्या विद्यापीठांनी सात सप्टेंबरपर्यंत आपला सविस्तर आराखडा सादर करावा, असे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. ३१ ऑक्टोबरला निकाल घोषित करायचा आहे, त्यादृष्टीने परीक्षेचे वेळापत्रक ठरवण्याचे विद्यापीठांना स्वातंत्र्य असल्याचं सामंत यांनी सांगितलं. विद्यापीठांचा अहवाल आल्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होईल, त्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात कशाप्रकारे परीक्षा घेता येईल, हे ठरवलं जाईल, असं सामंत यांनी सांगितलं. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयाकडून अस्थायी प्रमाणपत्र दिलं जाईल, काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी अशा प्रकारचं प्रमाणपत्र स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचंही सामंत यांनी सांगितलं.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १०वी आणि १२वीच्या येत्या २२ ते २९ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षा नियंत्रकांनी सूचना जारी केल्या आहेत.  परीक्षार्थींना मास्क वापरणं बंधनकारक आहे, सॅनिटायझर तसंच पिण्याच्या पाण्याची पारदर्शक बाटली सोबत बाळगणं आवश्यक आहे.

दरम्यान, मंडळानं या परीक्षा पुढे ढकलण्यास विरोध केला आहे. यासंबंधी दाखल याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान, विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेला पूर्ण प्राधान्य देण्यात येईल, असं सांगितलं.

****

माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आज शिक्षक दिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण करणार आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे. आकाशवाणीवरुन सकाळी ११ वाजेपासून या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाणार आहे.  

राज्यातल्या दोन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

****

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची - जेईई आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची - एनईईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी दुसरी याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. यावेळेस विरोधी पक्षांचं सरकार असलेल्या सहा राज्यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायालयानं आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं या याचिकेत म्हटलं होतं.

****

ज्यांना महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहणं सुरक्षित वाटत नसेल त्यांना राज्यात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. अभिनेत्री कंगना रानौत हिनं मुंबईची पाकव्याप्त काश्मिर सोबत तुलना केली होती आणि इथल्या पोलिसांबद्दल अविश्वासार्ह वक्तव्य केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुंबई आणि पोलिसांबद्दल कंगनाचं विधान हास्यास्पद असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

कंगना रानौत हिच्या विधानावरुन काल अनेकांनी टीका केली. कंगनानं जनतेची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे. मुंबई पोलिस, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. मुंबई पोलिसांविरुद्ध वक्तव्य करणाऱ्यांवर राज्य सरकारनं कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

कंगनाने काल आणखी ट्विट करत ९ तारखेला आपण मुंबईत येत असल्याचं सांगत, रोखून दाखवण्याचं आव्हान दिलं आहे. त्याचबरोबर आपल्याला दत्तक घेतलेल्या मुंबईला आपण कायमचं आई यशोदा म्हणून संबोधत असल्याचं म्हटलं आहे.    

दरम्यान, कंगना रानौत हिच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काल परभणी आणि औरंगाबाद इथं शिवसेनेनं निदर्शनं केली.

****

अंमली पदार्थ विक्री प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं काल अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतसिंगचा गृह व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा यांना अटक केली. त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं काल या दोघांच्या घरावर छापे टाकून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. 

दरम्यान, अंमली पदार्थांची विक्री करणारा अन्य एकजण आब्देल बासित परिहार याला स्थानिक न्यायालयानं नऊ सप्टेंबरपर्यंत अंमली पदार्थ नियंत्रण विभागाची कोठडी सुनावली आहे. आपण शौविक चक्रवर्ती याच्या सांगण्यावरुन अंमली पदार्थ पुरवत असल्याची कबुली परिहार याने दिल्याचं विभागानं न्यायालयात सांगितलं.

****

राज्यात काल आणखी १९ हजार २१८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या आठ लाख ६३ हजार ६२ झाली आहे. काल ३७८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत २५ हजार ९६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १३ हजार २८९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत सहा लाख २५ हजार ७७३ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख दहा हजार ९७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३९ रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार ८०४ रुग्णांची नोंद झाली.

लातूर जिल्ह्यात काल नऊ रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ४१४ रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात सात रुग्णांचा मृत्यू झाला, नव्या १२८ रुग्णांची भर पडली. औरंगाबाद नांदेड आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी सहा बाधितांचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात आणखी ४०९, नांदेड जिल्ह्यात ३६२, तर परभणी जिल्ह्यात आणखी १२४ रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर आणखी १७६ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात काल नव्या १६४, तर हिंगोली जिल्ह्यात २७ रुग्णांची नोंद झाली.  

****

मुंबईत काल आणखी एक हजार ९२९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३५ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात तीन हजार ४४७ नवे रुग्ण आणि ८३ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात एक हजार ११२ नवे रुग्ण आढळले, तर ११ जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात एक हजार ९६६, जळगाव एक हजार ६३, सांगली एक हजार ३७, सातारा ८७५, पालघर ४८३, यवतमाळ १९७, रत्नागिरी १५७, गोंदिया १५३, सिंधुदुर्ग १४१, तर वाशिम जिल्ह्यात काल आणखी ११२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.  

****

उस्मानाबाद शहरात कोविड १९चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक यांनी एकत्र येऊन आठ वेगवेगळ्या भागात गेल्या महिनाभरापासून मोहल्ला क्लिनिक सुरू केलं आहे. या मोहल्ला क्लिनिकमध्ये होत असलेल्या मोफत उपचारामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –

या मोहल्ला क्लिनिकसाठी लागणारी सर्व औषधं उस्मानाबाद नगर पालिकेनं पुरवली आहेत. नागरिकांच्या शरीरातील तापमान मोजणी, ऑक्सिजन तपासणी यासह विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टर्स मोफत आरोग्य तपासणी करत आहेत. प्रत्येक मोहल्ला क्लिनिकमध्ये दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच कोविड संशयित आढळलेल्या रुग्णांची अँटीजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी या डॉक्टरांकडून शिफारस केली जात आहे. त्यामुळे उस्मानाबाद शहरात कोविड रुग्ण बाधीतांची संख्या आणि त्यामुळे होणारा मृत्यूदर कमी होण्यास मदत होत आहे.

देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.

****

जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी विधान परिषदेचे सदस्य आमदार सुरेश धस यांच्यासह जवळपास ७० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात शिरुर शहरात एका मंगल कार्यालयामध्ये उसतोड मजुरांच्या प्रश्नी धस यांनी चार सप्टेंबर रोजी मेळावा घेतला होता. या मेळाव्यास नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अंमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बैठक घेतल्यानं तिथे देखील आमदार धस यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या नाथसागर धरणाच्या जलविद्युत केंद्रामधून एक हजार ५८९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी काल नदीपात्रात सोडण्यात आलं. त्याचबरोबर धरणाच्या डाव्या कालव्यातून काल १०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे. तर उजव्या कालव्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून आता ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानीच्या नियमांनुसार २५ टक्के रक्कम आगाऊ देण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा आमदार अभिमन्यू पवार यांनी दिला आहे. जिल्ह्यातल्या खरीप पिकांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली.

दरम्यान, लातूर तालुक्यातल्या येळी ढोकी, भिसे वाघोली, शिराळा या परिसरात पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे प्रशासनानं तातडीनं पंचनामे करावेत, असं आमदार धीरज देशमुख यांनी म्हटलं आहे.  

****

जालना तालुक्यातल्या पानशेंद्रा इथं काल दुपारी जुन्या वादातून २५ ते ३० जणांच्या जमावाने तिघा भावांना रस्त्यात अडवून जबर मारहाण केली. यात दोघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात तीस संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

****

परभणीच्या शासकीय रुग्णालयातल्या कोरोना विषाणू कक्षातून पळून गेलेल्या तिसऱ्या कैद्याला पोलिसांनी काल अटक केली. गेल्या मंगळवारी या कक्षात उपचार घेत असलेले तीन कैदी पळून गेले होते. त्यातल्या दोघांना यापूर्वी अटक करण्यात आली होती.

****

लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग तपासणीच्या तात्काळ चाचण्यांसाठी लागणाऱ्या साधन सामुग्रीचा तुटवडा नसल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय ढगे यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातल्या महापालिका औषधी भंडारात १४ हजार ७०० तर जिल्हा शल्य चिकीत्सक भंडारात १० हजार ९०० ‘किट’ उपलब्ध असल्याचं त्यांनी एका निवेदनाद्वारे कळवलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या औशाचे माजी नगराध्यक्ष मुजिबोद्दीन पटेल यांचं काल निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. ते नुकतेच कोरोना विषाणू संसर्गातून बरे झाले होते. मुजिबोद्दीन पटेल हे ३५ वर्ष नगरसेवक आणि १७ वर्ष नगराध्यक्ष होते. निष्ठावंत कार्यकर्त्याला कॉंग्रेस पक्ष मुकला असल्याची भावना माजी आमदार दिलीप देशमुख यांनी व्यक्त केली.

****

नांदेड जिल्ह्याच्या नायगांव तालुक्यातल्या बरबडा इथले काँग्रेसचे जेष्ठ नेते गणेशराव धर्माधिकारी बरबडेकर यांच काल निधन झाले, ते ८० वर्षाचे होते. बरबडेकर हे नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य होते.

****

नाथ समूह आणि परिवर्तन यांच्यावतीनं देण्यात येणारा यंदाचा बी.रघुनाथ स्मृती पुरस्कार लेखक बालाजी सुतार यांच्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे. सध्या ओैरंगाबाद इथं राहणारे बालाजी सुतार हे मूळचे अंबाजोगाईचे आहेत. त्यांच्या ‘गावकथा’ या नाटकाचे प्रयोग राज्यभर सादर झाले असून, विविध वाङ्मयीन नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. हा पुरस्कार सुतार यांना नाथ समुहाच्या कार्यालयात ७ सप्टेंबरला साधेपणानं प्रदान करण्यात येणार आहे.

****

न्यायालयीन कामकाज पुर्ववत सुरु करा अन्यथा सर्व वकिलांना पंधरा हजार रुपये दरमहा मानधन द्या यासह अन्य मागण्याचं निवेदन वकिलांची संघटना इंडियन असोसिएशन ऑफ लॉयर्सनं काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. वकील हा न्यायदानासाठी महत्वाचा घटक असल्यानं सर्वांना कोविड योद्ध्याचा दर्जा देऊन ५० लाख रूपयाचं विमा संरक्षण पूर्वलक्षी प्रभावानं द्यावं अन्यथा ५० लाख रूपयाचं सानुग्रह अनुदान तातडीनं द्यावं, दोन सत्रातील कामकाज बंद करुन सर्व न्यायालयाचे नियमित पुर्णवेळ पूर्ववत कामकाज सुरु करावे यासह अन्य मागण्या विधीज्ञ अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं दिलेल्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

इन्डियन असोसिएशन आँफ लॉयर्सच्या लातूर शाखेनंही अशाच प्रकारची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे केली आहे.

****

No comments:

Post a Comment