▼

Monday, 21 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.09.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 September 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      विरोधकांच्या प्रचंड गदारोळात राज्यसभेत शेतीविषयक दोन विधेयकं आवाजी मतदानानं मंजूर.

·      कृषी मालाची शासकीय खरेदी आणि हमी भाव कायम राहील, पंतप्रधानांचा पुनरुच्चार.

·      बारा विरोधी पक्षांची राज्यसभेच्या उपसभापतींविरूद्ध अविश्वास ठरावाची नोटीस तर सभागृहात गैरवर्तन करणाऱ्या सदस्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठीचा ठराव आणण्याचा भारतीय जनता पक्षाचा विचार.

·      राज्यात आणखी २० हजार ५९८ नवे रुग्ण तर ४५५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      मराठवाड्यात ४९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू, तर नव्या एक हजार ३४८ रुग्णांची नोंद.

·      भिवंडीत इमारत कोसळून आठ जण ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता.

आणि

·      आयपीएल टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचा किंग्ज ईलेव्हन पंजाब संघावर सुपर ओव्हरमध्ये विजय.

****

राज्यसभेत काल शेतकरी उत्पादनं व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन आणि सुविधा विधेयक, तसंच शेतकरी हक्क आणि सुरक्षा दर हमी ही दोन विधेयकं विरोधकांच्या प्रचंड गदारोळात आवाजी मतानं पारित झाली. लोकसभेत यापूर्वीच ही विधेयकं संमत झाली आहेत.

सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतकरी आणि राज्यांशी चर्चा करुन हे पाऊल उचललं असल्याचं कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. गेल्या सहा वर्षात पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ झाली असल्याचं ते म्हणाले. ही विधेयकं ऐतिहासिक असून, यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडून येतील, असं तोमर यांनी नमूद केलं. शेतकरी त्यांचा शेतमाल देशभरात कुठेही मुक्तपणे विकू शकतील, असं ते म्हणाले.

दरम्यान, विधेयकं मांडल्यानंतर विरोधकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. अनेक सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली, त्यासोबतच विधेयकाची प्रत हिसकावण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या गदारोळात विधेयकं पारित झाली आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.

****

ही कृषी विधेयकं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तसंच त्यांना अधिक समृद्ध करण्याच्या प्रयत्नांना प्रेरणा देतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यसभेनं काल कृषी विधेयकं पारित केल्यानंतर ते बोलत होते. शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना चांगल्या आयुष्याची खात्री देण्यासाठी आपण सरकारमध्ये असल्याचं ते म्हणाले. शासकीय खरेदी आणि हमी भाव कायम राहिल, याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. कृषी क्षेत्राला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सर्वाधिक आवश्यकता असून त्याचा मार्ग आता सुकर होणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.   

दरम्यान, वार्ताहरांशी बोलताना केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी, या विधेयकांमुळे बाजार समित्या आणि हमी भाव संपुष्टात येणार नसल्याचं स्पष्ट केलं. हा निर्णय ऐतिहासिक असून, यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल, असं ते म्हणाले. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यसभेत जे काही घडलं ते अत्यंत दुर्देवी असून, उपसभापतींसोबतही गैरवर्तन करण्यात आलं. संसदेच्या प्रतिष्ठेला न शोभणारी ही बाब असल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले.

राज्यसभेत काल झालेल्या गोंधळानंतर बारा विरोधी पक्षांनी उपसभापती हरीवंश यांच्याविरूद्ध अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षही सभागृहात गैरवर्तन करणाऱ्या सदस्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठीचा ठराव आणण्याबाबत विचार करत आहे. 

****

कृषि संबंधित विधेयकांवरून कांग्रेसनं सरकारवर टीका केली आहे. ही विधेयकं कृषी विरोधी असून किमान हमी भाव देण्याच्या कायदेशीर जबाबदारीपासून सरकार पळ काढत आहे, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या नसतील तर शेतकऱ्याला किमान हमी भाव कसा मिळणार, असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे.

****

दरम्यान, या विधेयकांच्या माध्यमातून केलेली कायद्याची तरतूद देशातल्या शेती व्यवसायाला स्वातंत्र्य, स्थैर्य आणि उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास राज्याचे माजी कृषी आणि पणन मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केंद्र सरकारच्या या कृषिविषयक सुधारणांनी शेतकऱ्यांना बंधमुक्त केलं आहे असं सांगून यामुळे कृषी क्षेत्रात खाजगी भांडवल गुंतवणुकीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. यामुळे आता गोदामं, शीतगृहे, रस्ते आणि इतर आनुषंगिक पायाभूत संरचना उभ्या होण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचं ते म्हणाले.

****

लोकसभेत काल शून्य प्रहरात जळगावचे खासदार उन्मेश पाटील, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, परभणीचे खासदार संजय जाधव, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर या सर्वांनी केंद्र सरकारने मराठा आरक्षण प्रकरणात लक्ष घालून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. 

अहमदनगर चे खासदार सुजय विखे पाटील यांनी कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी केली.

 

रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी केळी उत्पादकांच्या समस्येकडे लक्ष वेधलं, तर नाशिकच्या खासदार भारती पवार यांनी आदिवासी विकास निधीच्या वितरणाचे निर्देश केंद्र सरकारनं राज्य सरकारला द्यावे अशी मागणी केली. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाकडे लक्ष वेधून रस्ते दुरुस्तीसह अन्य कामं पूर्ण करण्याची मागणी केली. सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी वस्त्रोद्योगाच्या कर्जावरचं कोरोना काळातलं व्याज माफ करण्याची मागणी केली. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात कोविड उपचारांच्या समन्वयासाठी केंद्रीय पथक पाठवण्याची मागणी केली.

 

औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांनी रस्त्यांच्या खराब दर्जाकडे लक्ष वेधत, रस्त्यांची निकृष्ट कामं करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली.

****

मराठवाड्यातल्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी परभणी इथून मोठ्या बाजारपेठेसाठी विशेष किसान रेल्वे सुरु करण्याची मागणी खासदार संजय जाधव यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अमरावतीहून नाशिकमार्गे किसान रेल्वे सुरु केल्याच्या धर्तीवर मराठवाड्यातून एक रेल्वे मोठ्या शहरांकडे सुरु करावी, अशी मागणी परभणी जिल्ह्यातून वाढत आहे. ही रेल्वे सेवा सुरु केल्यास शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळून नुकसान कमी होईल, असं जाधव यांनी निवेदनात म्हटलं आहे.

****

राज्यात काल कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळलेल्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. काल दिवसभरात २६ हजार ४०८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत आठ लाख ८४ हजार ३४१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.

दरम्यान, काल राज्यात आणखी २० हजार ५९८ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १२ लाख आठ हजार ६४२ झाली आहे. काल ४५५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ३२ हजार ६७१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या दोन लाख ९१ हजार २३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.      

****

मराठवाड्यात काल ४९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार ३४८ रुग्णांची नोंद झाली.

लातूर जिल्ह्यात १२ बाधितांचा मृत्यू झाला, तर आणखी ३३० रुग्ण आढळून आले. औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी दहा रुग्णांचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात नव्या २७७, तर उस्मानाबाद जिल्ह्यात १८२ रुग्णांची भर पडली. नांदेड जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २४० रुग्णांची नोंद झाली. बीड जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला तर १५९ नवे रुग्ण आढळले. जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी दोन बाधितांचा मृत्यू झाला, जालना आणखी १००, तर परभणी जिल्ह्यात ३६ रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर नव्या २४ रुग्णांची नोंद झाली. 

****

मुंबईत दोन हजार २०९ नवे रुग्ण आणि ४४ मृत्यूंची नोंद झाली. पुण्यात तीन हजार ६६७ नवे रुग्ण आढळले तर ६९ जणांचा मृत्यू झाला. यापैकी एक हजार ७०० रुग्ण पुणे महानगरपालिका भागातले तर ७४९ रुग्ण पिंपरी चिंचवड क्षेत्रातले आहेत. नाशिक जिल्ह्यात एक हजार ४९५ रुग्ण आढळले तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला. सांगलीत ८११ नवे रुग्ण आढळले तर ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यात ७३२ रुग्ण आढळले तर ३८ रुग्णांचा मृत्यू झाला. अहमदनगर ७३९, सिंधुदुर्ग ९९, पालघर ४०३, भंडारा १३६, गडचिरोली ३३, रत्नागिरी ९४, वाशिम १५०, गोंदिया २१५, आणि अमरावतीत ३७० नवे रुग्ण आढळले. 

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर शहरात कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २३ ते ३० सप्टेंबर दरम्यान जनता संचारबंदी पाळण्यात येणार आहे. नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहतील. फक्त रुग्णालयाजवळची औषधी दुकानं सुरु राहतील, दूध विक्रेत्यांना सकाळी सात ते नऊ या वेळेत दूध विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.

****

गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे मराठवाड्यातल्या जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण झाला आहे. पैठणच्या नाथसागर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे विभागातली सर्वात मोठी नदी असलेल्या गोदावरी नदीला पूर आला आहे.

नांदेड शहराजवळच्या डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशयाचे नऊ दरवाजे काल उघडण्यात आले असून, एक लाख ११५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

लोहा तालुक्यातल्या लिंबोटी धरणातही पाण्याची आवक वाढत असून, काल धरणाचं वक्रद्वार उघडण्यात आलं असून, अतिरिक्त पाणी मानार नदीत सोडण्यात आलं आहे.

 

परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या निम्न दुधना प्रकल्पाचे चार दरवाजे काल सायंकाळी उघडण्यात आले असून, त्यातून सात हजार १९० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे. 

 

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या बारसवाडा इथला गल्हाटी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला असून, पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहत आहे. त्यामुळे गल्हाटी धरण क्षेत्रातल्या गावांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

 

नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर-मधमेश्वर धरणातून १२ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

****

नांदेड शहरातल्या जुना मोंढा नवीन पूल शनि मंदिर घाटावरून एक महिला गोदावरी नदीच्या पुरात वाहून जात असताना स्थानिक नागरीकांनी तिला वाचवलं.

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या सोयगाव देवी इथं गावालगतच्या मोठ्या नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून गेलेल्या वडील आणि मुलीचा मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह काल नाल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आढळून आले.

****

नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यात विविध गावात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं असून, पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काल या भागाची पाहणी केली. प्रत्येक ठिकाणचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. झालेल्या नुकसानाची पीक विमा कंपनीच्या माध्यमातून भरपाई मिळवण्यासाठी वैयक्तिक पंचनामे होणं आवश्यक असून, शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीच्या ‘ॲप’ वर पंचनामे करून घेण्यासाठी ‘ऑनलाइन’ अर्ज करावेत असं आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.

****

दरम्यान, मराठवाड्यातल्या अनेक भागात कालही जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात वसमत, औंढा, कळमनुरी तालुक्यात काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. नांदेड शहरातही काल दुपारी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. नांदेड, जालना तसंच औरंगाबादमध्ये रात्रीही पाऊस झाला.

येत्या दोन दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यातल्या मानवत रोड ते वालूर आणि सेलू ते वालूर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दूधना नदीच्या पूलावरून पाणी वाहत असल्यानं हा रस्ता बंद करण्यात आला. हदगाव ते केदार वाकडी रस्ताही बंद झाला आहे.

****

नांदेड - मालेगाव मार्गावर पासदगावनजीक आसना नदीवरच्या पुलावरुन एक मोटार खाली कोसळून झालेल्या अपघातात मोटारीमधील दोघे जण ठार झाले. परवा रात्री उशीरा ही घटना घडल्याची शक्यता असून काल पहाटे स्थानिकांना झालेला प्रकार लक्षात आला. मालेगावहून नांदेडला ही मोटार जात होती. मृतात एका महिलेचाही समावेश आहे. 

****

ठाणे जिल्ह्यात भिवंडीमधील तीन मजली इमारत आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास कोसळून झालेल्या अपघातात आठ जण ठार तर नऊ जण जखमी झाले आहेत. पटेल कम्पाउंड परिसरात असलेल्या या ४० वर्ष जुन्या इमारतीत जवळपास २१ कुटुंब राहत होती. जिलानी इमारत असं या इमारतीचं नाव असून आतापर्यंत ११ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिस, अग्निशमन दल आणि महापालिकेचे बचाव पथक आणि अन्य मदतनीस घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत.

****

औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक इथं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. हे कार्यकर्ते मराठा आरक्षण तसंच नोकर भरतीला स्थगितीच्या मागणीसाठी उपोषण करण्याच्या तयारीत होते.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राबवण्यात येत असलेल्या सेवा सप्ताहाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष मीनाताई सोमाजी यांनी या साहित्याचं वाटप केलं.

****

No comments:

Post a Comment