▼

Monday, 21 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.09.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

राज्यसभेत काल कृषी विधेयकांवरची चर्चा आणि मतदानावेळी गोंधळ घालणारे काँग्रेस पक्षाचे खासदार राजीव सातव यांच्यासह विरोधी पक्षाच्या आठ सदस्यांना सभापती एम.व्यंकय्या नायडू यांनी आज एक आठवड्यासाठी निलंबित केलं. संसदीय कामकाज राज्यमंत्री वी.मुरलीधरन यांनी या निलंबनाचा प्रस्ताव सादर केला होता. या कारवाईनंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सदनात गदारोळ सुरू केल्यानं, सदनाचं कामकाज आज सकाळपासून तीन वेळा स्थगित झालं आहे.

****

देशभरात गेल्या २४ तासांत कोविड संसर्ग झालेले नवे ८६ हजार नऊशे एकसष्ट रुग्ण सापडले. यामुळे देशभरात या संसर्गानं बाधित रुग्णांची संख्या ५४ लाख ८७ हजार ५८० झाली आहे. गेल्या २४ तासात या संसर्गाने १ हजार १३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ३० हजार ७६८ झाली आहे, यापैकी सुमारे २४ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, ८६६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या सुमारे ६ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

ठाणे जिल्ह्यात भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या दहा झाली असून, या इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत ११ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. भिवंडीतली ही तीन मजली इमारत आज सकाळी कोसळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

****

रेल्वे मंडळानं उद्यापासून प्रवाशांसाठी ४२ क्लोन रेल्वेगाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या या विशेष क्लोन रेल्वे गाड्या आहेत. यापैकी दोन गाड्या सांगली जिल्ह्यातल्या मिरज जंक्शन मार्गे धावणार आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वेसेवा बंद आहे.

****

सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पहाटे साडेपाच वाजता गाड्यांचे टायर पेटवून राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

****

जालना शहरात काल मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जुना जालन्यातल्या सराफनगर, माऊलीनगर, घायाळनगर, भाग्यनगर भागात रस्त्यांवर पाणी साचलं आहे. 

नांदेड जिल्ह्यातही सतत होत असलेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक भागात सोयाबीन आणि कापसाला मोड फुटले असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.

****

No comments:

Post a Comment