Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 October 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००
****
**
‘खेड्याकडे चला’ या गांधीजींच्या संदेशाचं आत्मपरीक्षण आवश्यक - मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे
**
शेती सुधारणा तसंच कामगार कायद्यांच्या विरोधात काँग्रेसचा ‘किसान मजदूर बचाओ दिन’
**
मराठा आरक्षणाबाबत पार्थ पवार यांच्या भूमिकेशी राष्ट्रवादी काँग्रेस सहमत नाही- अजित
पवार
**
औरंगाबाद जिल्ह्यात आज दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
आणि
**
स्वातंत्र्यसैनिक अनंत भालेराव स्मृती पुरस्कार हिमरू नक्षीकामाचे आधुनिक प्रणेते अहमद
कुरेशी यांना जाहीर
****
महात्मा
गांधी एक विचार असून ‘खेड्याकडे चला’ या गांधीजींनी दिलेल्या संदेशाचे आज आत्मपरीक्षण
करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महात्मा गांधीजींच्या
जयंतीनिमित्ताने वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमातल्या विकासकामांचे मुख्यमंत्री ठाकरे
यांच्या हस्ते आज ई-लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. खेड्यातल्या माणसाला त्याचं
जीवन आनंदाने जगता यावं, यासाठी खेड्यांना विकासाच्या मार्गावर नेऊन ती सक्षम आणि स्वावलंबी
करणं महत्वाचं असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. स्मारकाच्या जपणुकीसाठी निधीची कमतरता
पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवारही
या समारंभात सहभागी झाले होते.
दरम्यान,
मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत मातोश्री या आपल्या निवासस्थानी राष्ट्रपिता महात्मा गांधी
आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या दोन्हीही महापुरुषांनी भारताला एक राष्ट्र म्हणून
ओळख मिळवून देण्यात आणि राष्ट्र उभारणीत दिलेलं योगदान अतुलनीय असल्याचं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले.
****
महात्मा
गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात
आलं. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी त्यांच्या
प्रतिमांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
उस्मानाबाद
इथंही भाजपच्या वतीनं महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात
आलं. तसंच स्वच्छता कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
नांदेड
इथं प्राध्यापक जगदीश कदम यांच्या "गांधी समजून घेतांना" या पुस्तकाचं खासदार
सुप्रिया सुळे यांच्या हस्ते दूर दृश्य संवाद प्रणालीद्वारे प्रकाशन करण्यात आलं.
जळगाव
इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
शेती
सुधारणा तसंच कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या
वतीनं आज राज्यभरात ‘किसान मजदूर बचाओ दिन’ पाळण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसंच
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं धरणे
आंदोलन करण्यात आलं. शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे तातडीने रद्द करावे या मागणीसाठी,
दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना
निवेदन देणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
जालना
जिल्ह्यातल्या आठही तालुक्यांमध्ये आज काँग्रेसच्यावतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं.
जालना इथं गांधीचमन चौकात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या
आंदोलनात, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशात झालेल्या धक्काबुक्कीचा
निषेध करण्यात आला. अंबड आणि परतूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून या धक्काबुक्कीचा निषेध केला.
****
उस्मानाबाद
जिल्हा काँग्रेसच्या वतीनंही आज जिल्ह्यात धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकरी
आणि कामगार विरोधी कायदे अन्यायकारक असून केंद्र सरकारने सदरील कायदे रद्द करण्याची
मागणी केली.
*****
हिंगोली
जिल्ह्यात काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि कामगार कायद्याच्या
विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या विरोधात
रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा यावेळी सातव यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांना सदर कायद्याच्या
विरोधात निवेदन सादर करण्यात आलं.
****
औरंगाबाद
जिल्हा शहर कॉंग्रेस समितीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे यांच्या नेतृत्वात
फुलंब्री इथं धरणे आंदोलन करण्यात आलं. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात
सहभागी झाले.
****
उत्तर
प्रदेशातील हाथरस घटनेच्या निषेधार्थ आज नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
*****
अत्यावश्यक
वस्तू कायद्याबाबतच्या त्रुटीमध्ये सुधारणा करुन शेतकऱ्यांना संपूर्ण स्वातंत्र्य देण्याची
विनंती शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या संबंधीचं निवेदन औरंगाबाद जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांच्यामार्फत आज प्रशासनाला सादर करण्यात आलं. अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या
कक्षेतून वगळलेल्या शेतमालाचे दर पुन्हा ठराविक पातळीपेक्षा जास्त वाढल्यास, ती पिके
पुन्हा या कायद्याच्या कक्षेत घेण्याबाबत केलेली तरतूद ही, सुधारणा विधेयकांच्या हेतूशी
विसंगत आहे. शेतीमाल व्यापारात अशी अनिश्चितता असल्यास शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक
होण्याची शक्यता नाही आणि शेतकऱ्यांच्या मालाला कधीच किफायतशीर दर मिळण्याची शक्यता
राहणार नाही, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
****
मराठा
आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते पार्थ पवार यांच्या भूमिकेशी पक्ष सहमत
नसल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात बोलत होते. बीडमधील
एका विद्यार्थ्यानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार
यांनी काल ट्वीट करत, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप
याचिका दाखल करण्याचे संकेत दिले होते, याबाबतच्या प्रश्नावर अजित पवार बोलत होते.
मराठा, धनगर किंवा अन्य समाजाला त्यांच्या न्याय्य हक्कानुसार आरक्षण मिळालं पाहिजे,
अशी आपल्या पक्षाची भूमिका आहे, असं पवार यांनी नमूद केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं
आहे.
*****
माजी
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर मराठा आरक्षणाची जबाबदारी टाकून महाविकास आघाडीतल्या
इतर दोन पक्षांनी त्यांना अपेक्षित सहकार्य केलं नाही, असा आरोप केंद्रीय अन्न आणि
नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ते आज जालना इथं बोलत होते.
राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू योग्य पध्दतीनं न मांडल्यामुळे
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, असं दानवे म्हणाले. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन न्यायालयात
मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडायला हवी होती, असं मत दानवे यांनी व्यक्त केलं.
*****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत
९४३ जणांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातल्या कोरोना बाधितांची संख्या
३३ हजार ८४१ झाली असून पाच हजार ८४ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत.
****
धुळे
जिल्ह्यात आज दिवसभरात ६९ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले तर एका रुग्णांचा
मृत्यू झाला. आज ८६ रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
*****
औरंगबाद
इथले हिमरू नक्षीकामाचे आधुनिक प्रणेते अहमद कुरेशी यांना यंदाचा स्वातंत्र्यसैनिक
अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. २६ ऑक्टोबर रोजी अनंतरावांच्या पुण्यतिथीला
छोटेखानी कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अनंत भालेराव
स्मृती प्रतिष्ठानच्या कार्यवाह डॉ. सविता पानट यांनी दिली. ५० हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह
असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ७८ वर्षांचे अहमद कुरेशी यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासूनच
हिमरू विणकाम क्षेत्रात काम करायला सुरवात केली. अजिंठा लेण्यांतील कमळचित्रांना त्यांनी
पहिल्यांदा हिमरू शैलीत आणून ही कलात्मक शैली लोकप्रिय केली आहे.
****
परभणी
इथल्या उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर यांची नांदेडच्या बिलोली उपविभागात उपविभागीय
अधिकारी म्हणून तर परभणीच्या उपविभागीय अधिकारी सुचेता शिंदे यांची लातूरच्या उप जिल्हा
निवडणूक अधिकारी पदावर बदली करण्यात आली. परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी महेश
वडदकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जालन्याचे निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड
हे परभणीत उप जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत.
****
औरंगाबाद
शहर बससेवा या महिन्यात टप्याटप्यानं सुरु केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासक
आस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे. दिवाळी - दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर टप्प्या टप्प्याने
शहर बस सेवा सुरु करण्याचे नियोजन आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी बस मधून प्रवास
करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवर निर्बंध घातले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
****
No comments:
Post a Comment