▼

Tuesday, 20 October 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 20 OCTOBER 2020 TIME – 18.10.2020 18.00

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 October 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००

****

** कोरोना विषाणूचा धोका अद्यापही कायम असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं पंतप्रधानांचं आवाहन

** अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तत्काळ सरसकट पंचनामे करण्याची महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रशासनाला सूचना

** औरंगाबाद जिल्ह्यात तीन कोविडग्रस्तांचा मृत्यू

** परभणी जिल्ह्यात कोविडग्रस्तांच्या संख्येत समाधानकारक घट

आणि

** आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या पिता पुत्रांना औरंगाबाद इथं अटक

****

कोरोना विषाणूचा धोका अद्यापही कायम असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आगामी दसरा, दिवाळी, ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर ते आज देशवासियांना संबोधित करत होते. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या या संकटकाळात निष्काळजीपणा चालणार नाही, असं ते म्हणाले. इतर देशांच्या तुलनेत भारतात रुग्ण बरे होण्याचा दर अधिक असल्याचं त्यांनी नमूद केलं. देशात या विषाणूच्या संसर्गावर उपचारासाठी अनेक लसींवर संशोधन सुरू आहे, लस तयार होईपर्यंत नागरिकांना या विषाणू संसर्गापासून बचावासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. आगामी सणांच्या काळात नागरीकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, मास्क लावणं, हात धुणं आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणं, या नियमांचं पालन करावं, असं त्यांनी सांगितलं. प्रसार माध्यमांनी कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असंही पंतप्रधान म्हणाले

*****

महाविकास आघाडी सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा उघड झाल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष, खासदार राजकुमार चाहर यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे राज्यातली एक लाख हेक्टर शेती वाया गेल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीतही राज्य सरकारनं अद्याप कोणतीच मदत शेतकऱ्यांना जाहीर केली नाही, असं खासदार चाहर म्हणाले. शेतकरी मदतीबाबत राज्य सरकारनं अद्याप केंद्र सरकारला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. राज्यानं कर्ज काढून शेतकरी मदतीची घोषणा करायला हवी होती, असंही ते यावेळी म्हणाले.

****

पिकाच्या नुकसान भरपाईसोबत खरडून गेलेल्या शेतजमिनीची ही नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पीडित शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मदतीचे नियम काय आहेत, या पेक्षा शेतकऱ्याला मदत करण्यासाठी कोणत्या प्रकारचे नियम आणि अटी करता करता येतील, त्या करून तत्काळ मदत करणं आवश्यक असल्याचं फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, शेतकऱ्यांना बियाणे देण्यासाठी बियाणे महामंडळाची सोडत पद्धत अत्यंत चुकीची असल्याचं, फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज लातूर इथं पत्रकारांशी बोलत होते. सातबारा असेल त्या शेतकऱ्याला बियाणं दिलं पाहिजे, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

फडणवीस यांनी औसा तालुक्यात अतिवृष्टीने बाधित शेतीची आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन तीन ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधला. खासदार सुधाकर शृंगारे, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यावेळी उपस्थित होते.

****

अतिवृष्टीनं पिचलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. दरेकर यांनी आज सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी नुकसानग्रस्त बळीराजाला हेक्टरी २५ हजार ते ५० हजार रुपयांची मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची त्यांनी पूर्तता करावी, भाजपचीही हीच मागणी आहे, असंही दरेकर  म्हणाले. अन्नदात्यासाठी कर्ज काढून मदत करायला काय अडचण आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

****

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आठ दिवसात मदत न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात नुकसानाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. रबी पेरणीसाठी तातडीने पंचनामे न करता हेक्टरी पंचवीस हजार रुपये द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

****

तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांनी टाळाटाळ न करता नुकसानाचे तत्काळ सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत. आज उस्मानाबाद तालुक्याच्या जुनोनी परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकरी, तसंच ग्रामस्थांशी राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी संवाद साधत, राज्यशासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे, शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये, या शब्दांत दिलासा दिला. या भागात अतिवृष्टीमुळे पूर्णतः वाहून गेलेले रस्ते तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना सत्तार यांनी प्रशासनाला केल्या. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातले प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

****

आता ऐकूया कोविड जनजागृतीबाबत परभणी महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी केलेलं आवाहन  

****

महिलांच्या तक्रारींप्रकरणात तातडीने लक्ष घालून सुनावणीसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक होणं आवश्यक असल्याचं मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी व्यक्त केलं आहे. त्या आज मुंबईत सह्याद्री अतिथिगृहावर पत्रकारांशी बोलत होत्या.             राज्यातील महिलांशी संबंधित प्रकरणांमध्ये सुनावणीसाठी शर्मा गेल्या दोन दिवसांपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. कोविड सेंटर मध्ये लैंगिक अत्याचार, विनयभंग, तसंच छेडछाडीची ११ प्रकरणं केंद्रीय महिला आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्याअनुषंगाने माहिती घेऊन, अशा घटना रोखण्यासाठी राज्याच्या प्रमाणित कार्यपद्धतीसोबतच अन्य उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी होणं, आवश्यक असल्याचं शर्मा यांनी नमूद केलं. महिलांवरील अत्याचार प्रकरणात मदत, समुपदेशन आदी सहाय्य करण्यासाठी सध्या कार्यरत असलेली वन स्टॉप सेंटर्स चांगल्या पद्धतीने काम करत असून राज्यातल्या उर्वरित १९ जिल्ह्यात वन स्टॉप सेंटर्स कार्यरत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, रेखा शर्मा यांनी आज राजभवनात भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केल्याचं वृत्त आहे.

****

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत राज्यातल्या सिंधुदुर्ग जिह्यातल्या १३ हजार गर्भवती स्त्रियांना पाच कोटी रूपयाचं वितरण करण्यात आलं आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या योजनेअंतर्गत १३ हजार ७०६ गर्भवती स्त्रियांना आतापर्यंत पाच कोटी ७६ लाख रूपये देण्यात आल्याचं सांगितलं.

****

दसरा-दिवाळी सणांच्या अनुषंगानं मिठाईच्या डब्यांवर मिठाई वापराची अंतिम मुदत दर्शनी भागावर स्पष्ट लिहिण्याचे निर्देश अन्न सुरक्षा मानके प्राधिकरणानं दिले आहेत. एक ऑक्टोबरपासून लागू झालेल्या या निर्देशानुसार औरंगाबाद जिल्ह्यातल्या जवळपास ५० मिठाई उत्पादकांची तपासणी करण्यात आली, यापैकी काही दुकानदारांना सुधारणेची नोटीस देण्यात आली असल्याचं, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सह-आयुक्त मिलिंद शहा यांनी सांगितलं. या उपरही दुकानदारांनी सुधारणा न केल्यास, अन्न मानके कायद्यानुसार कारवाईचा इशारा शहा यांनी दिला. यासंदर्भात तक्रार असल्यास ग्राहकांनी अन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयात लेखी तक्रार करावी किंवा 1800 222 365 या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर इथं आज ललित पंचमीनिमित्त श्री तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. त्याआधी काल रात्री श्री तुळजाभवानी देवीची नंदी वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली. उद्या देवीची मुरली अलंकार महापूजा बांधण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन कोविड बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या आता एक हजार ३९ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ३६ हजार ६८९ झाली असून एक हजार ८४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, औरंगाबाद इथल्या शासकीय रुग्णालय घाटीतल्या १९ जणांना आज उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. त्यामुळे या विषाणू संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३३ हजार ८०१ झाली आहे.

****

परभणी जिल्ह्यात कोविडग्रस्तांची संख्या समाधानकारकरित्या कमी होत आहे. जिल्ह्यातील नऊ कोविड केंद्रात सध्या एकही रुग्ण नसून, १५ रुग्णालयांमध्ये नऊपेक्षा कमी रुग्ण आहेत. सध्या जिल्ह्यात २६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिलेल्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या पिता पुत्रांना औरंगाबाद इथं अटक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त कार्यालयानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. नेमीचंद कासलीवाल आणि आकाश कासलीवाल अशी या दोघांची नावं असून, आरोपींकडून ७० ते ८० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याची कागदपत्रं आणि विविध कंपन्याचे मोबाईल जप्त करण्यात आले असल्याचं, या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

****

 

No comments:

Post a Comment