Wednesday, 21 October 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 21 OCTOBER 2020 TIME – 18.00

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 October 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००

****

** अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी आगामी दिवाळीपूर्वी भरघोस मदतीची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

** सरकार मदत न करता टोलवा-टोलवी करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका

** एकनाथ खडसे यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा; शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

** केंद्र सरकारकडून अराजपत्रित कर्मचाऱ्यांना उत्पादकतेवर आधारित बोनस जाहीर

आणि

** औरंगाबाद जिल्ह्यात आज एका कोविडग्रस्ताचा मृत्यू; जिल्ह्यातली रुग्णसंख्या ३६ हजार ८४५

****

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे जवळपास झाले आहेत, त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत नुकसान भरपाईबाबत घोषणा करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते आज उस्मानाबाद इथं नुकसान पाहणीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. आगामी दिवाळी-दसऱ्या पूर्वी भरघोस मदतीचं वाटप केलं जाईल, फक्त टाळ्या मिळाव्यात म्हणून आपण मदतीची घोषणा करणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. आपण इकडे पाहणी दौरे करत असताना, नुकसान भरपाईबाबत मंत्रालयात विचार विनिमय सुरू आहे, विमा कंपन्यांशी देखील बोलणं सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्राकडून वस्तू आणि सेवा कराची थकबाकी येणं बाकी आहे, ही रक्कम वेळेवर मिळाली असती, तर नुकसानग्रस्तांना लगेच मदत जाहीर करता आली असती, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं, ते म्हणाले....

 

केंद्राकडून मोठी रक्कम येण जी बाकी आहे केंद्र कधी उभारणार ती आणखी काय करणार, आपल्या हक्काचे पैसे जर आपल्या खिशात असते आता तर तेलंगनाच्या प्रमाणे आपण सुध्दा ताबडतोब मदत केली असती तर ही केंद्राकडून जी रक्कम येणी आहे ती आपल्या हक्काची पैसे आहे.  

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सकाळी तुळजापूर तालुक्यातल्या अपसिंगा, कामठा आणि कात्री  परिसरातल्या अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्राची पाहणी केली. कात्री इथं गावाच्या शेजारुन वाहणाऱ्या नदीला पाणी आल्यामुळे नुकसान झालेल्या शेतीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त महिलांना मदतीचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी वितरित करण्यात आले

****

अतिवृष्टीमुळे शेती तसंच शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असताना, सरकार मात्र मदत न करता टोलवा-टोलवी करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर ते आज बोलत होते.

बोलघेवडेपणा करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करण्यावर सरकारनं लक्ष द्यावं असं, फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांना मदत देणं तर दूर उलट बँका वसुलीसाठी तगादा लावत आहेत. सरकारनं किमान वसुली तरी थांबवावी, तसंच कर्ज वसुलीचा तगादा लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्याची मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.

दरम्यान, फडणवीस यांनी आज जालना जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे बाधित भागाला भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांना मदतीसाठी रस्त्यावर उतरून संघर्षाचा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला

****

गेल्या वर्षी कोल्हापूर इथं झालेल्या नुकसानापोटी हेक्टरी सत्तर हजार रुपये नुकसान भरपाई राज्य सरकारनं दिली होती, त्याच धर्तीवर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचं महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. अब्दुल सत्तार यांनी आज लातूर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त औसा तालुक्याचा दौरा करुन नुकसानाची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. लातूर जिल्ह्यातल्या नुकसानाचे ६५ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, शिल्लक ३५ टक्के पंचनामे येत्या चार ते पाच दिवसात पूर्ण केले जाणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलं. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ११८ टक्के पाऊस झाला असून सोयाबीन, तूर आणि ऊसाचं मोठं नुकसान झालं असल्याचं ते म्हणाले.

****

आता ऐकूया कोविड जनजागृतीबाबत महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेलं आवाहन  

****

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रदेश भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सादर केला. आपला पक्षाच्या नेत्यांवर  तसंच पक्षावर जराही राग नाही. आपण पक्षनेतृत्वावर कधीही टीका केली नाही, असं सांगताना खडसे यांनी आपण फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं सांगितलं. आपल्यासोबत एकही आमदार किंवा एकही खासदार नाही. आपल्या स्नुषा खासदार रक्षा खडसे या भाजप सोडणार नाहीत, त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत, असं खडसे यांनी सांगितल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

दरम्यान, खडसे यांच्या या निर्णयानंतर जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. परवा शुक्रवारी दुपारी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. खडसे यांचं आपण पक्षात स्वागत करतो, त्यांचे अनेक समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत, त्यांनाही काही दिवसात पक्षात प्रवेश दिला जाईल, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

****

भाजपनं खडसेंना अनेक महत्त्वाची खाती आणि पदं दिली, मात्र राजकारणात असमाधानी असणारे सतत नाराज राहतात. कोणताच पक्ष त्यांना शंभर टक्के समाधानी ठेवू शकत नाही असं मत, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. सांगलीतल्या आटपाडी इथं प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. मनासारखी एक गोष्ट न झाल्यामुळे असा निर्णय घेणं योग्य नाही अशी टीका ही त्यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रवेशाबद्दल व्यक्त केली.

****

केंद्र सरकारने अराजपत्रित कर्मचाऱ्यांना उत्पादकतेवर आधारित बोनस जाहीर केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. हा बोनस सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वी एकाच हप्त्यात दिला जाईल, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. तीस लाख कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या बोनससाठी सरकारी तिजोरीवर तीन हजार ७३७ कोटी रुपये भार पडणार आहे.

****

भारतीय स्टेट बँकेनं गृहकर्जावर पाव टक्का सूट जाहीर केली आहे. सिबील आधारावर ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक गृह कर्ज घेणाऱ्या कर्जदारांनाही सवलत मिळेल. बँकेने ३० लाख ते दोन कोटी रुपयांपर्यंत क्रेडिट आधारित गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी शून्य पूर्णांक वीस शतांश टक्के सूट जाहीर केली आहे, पूर्वी ही सूट शून्य पूर्णांक दहा शतांश टक्के एवढीच होती.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला. कन्नड तालुक्यातल्या कनदगाव इथल्या या ६६ वर्षीय पुरुष रुग्णावर, औरंगाबाद इथं घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार ४३ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या ३६ हजार ८४५ झाली असून, सध्या एक हजार ८०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

पुणे-यवतमाळ खाजगी बसला आज यवतमाळच्या खंडाळा-येलदरी घाटात अपघात होऊन २ जण ठार झाले, तर १९ प्रवासी जखमी झाले. घाटातल्या एका वळणावर चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पुसद वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला सुरुवात केली. जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

****

No comments:

Post a Comment