Thursday, 1 October 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 October 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 October 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक –  01  ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००

****

*काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात, राहुल गांधींना पोलिसांची धक्काबुक्की

*वन्यजिवांप्रती सजगता जपण्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांचं आवाहन

*शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनानंतर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगीत 

आणि

*औरंगाबादमधे कोरोना विषाणू संसर्गामुळे एका रुग्णाचा मृत्यू

****

उत्तर प्रदेशातल्या हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं. याआधी उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. राहुल आणि प्रियंका गांधी यांची गाडी पोलिसांनी रोखल्यानंतर ते चालत निघाले होते. पोलिसांनी आपल्याला अडवलं, आणि लाठीमार करुन आपल्याला खाली पाडलं असं राहुल गांधी यांनी या संदर्भात म्हटलं आहे. काँग्रेसपक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं. 

****

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इतर राज्यांमधल्या स्थितीवर प्रतिक्रीया नोंदवण्याऐवजी त्यांच्या राज्यातलं `जंगलराज` संपवण्यावर लक्ष केंद्रित करावं, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. उत्तरप्रदेशमधील हाथरस आणि बलरामपूर इथल्या बलात्कार पिडीतांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्र्वभूमीवर देशमुख यांनी सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे ही प्रतिक्रीया नोंदवली आहे. योगींनी त्यांच्या राज्यामध्ये कडक उपाय योजन्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****       

उत्तर प्रदेश मधल्या हाथरस इथं झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशी दिली पाहिजे, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. त्यांनी एक निवेदन प्रसिद्धीस देऊन ही मागणी केली आहे. मानवतेला कलंक लावणारी ही घटना असून कायदा सुव्यवस्था राखण्या यंत्रणा अपुरी पडत असल्याची खंत अण्णा हजारे यांनी यात व्यक्त केली आहे.

****

वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाप्रती येणारी सजगता, ही केवळ सप्ताह साजरा करण्यापुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभरासाठी जपूया असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. राज्यात आजपासून येत्या सात तारखेपर्यंत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. मुख्यमंत्र्यांनी त्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याला विपूल जैवविविधता लाभली असून ७२० किलोमीटरच्या समुद्र किनारी भागातली जीवसृष्टी जपायलाही शासनाचं प्राधान्य असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

****

राज्य सरकार चित्रपटगृह तसंच नाट्यगृह उघडण्याबाबत सकारात्मक आहे मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर नागरिकांना सुरक्षेची खात्री देण्याला सरकारचं प्राधान्य असल्याची माहिती सांस्कृतिक कल्याण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. ते आज चित्रपट गृह मालकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना बोलत होते. आपण या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करणार आहोत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. या संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं येत्या पंधरा ऑक्टोबरपासून प्रतिबंधित परिसराबाहेरच्या चित्रपटगृह, मल्टीप्लेक्सेसना पन्नास टक्के क्षमतेपर्यंत उघडण्याची परवानगी दिली आहे.   

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळानं सामायिक प्रवेश परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आजपासून येत्या नऊ तारखेपर्यंत दीड हजार बस गाड्या सुरू केल्या आहेत. या अतिरिक्त बसगाड्या सोडण्यासंदर्भात राज्य भरातल्या कार्यालयाना निर्देश देण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्य सरकारतर्फे अभियांत्रिकी आणि अन्य तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी या सामायिक प्रवेश परिक्षा घेण्यात येत आहेत. जिल्हावार विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार या अतिरिक्त बस सोडण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

****

राज्यातल्या १४ विद्यापीठातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन आज स्थगित करण्यात आलं. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासह आंदोलन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची आज दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं विद्यापीठ कर्मचारी कृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी म्हटलं आहे. येत्या पंधरा दिवसात सातवा वेतन आयोग लागू करण्याचं आश्वासन दिल्यानंतर संप तुर्तास स्थगित करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या लहूगड नांद्रा इथल्या ६७ वर्षीय पुरुषाचा आज कोरोना विषाणू संसर्गाच्या उपचारांदरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ९३८ जणांचा या विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ३३ हजार ६४८ झाली असून पाच हजार २१० रुग्णांवर सध्या उपचार सुरु असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात रोहिलागड चौफुलीवर आज अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षण कायम होत नाही तोपर्यंत शासनान नोकर भरती करू नये, अशी मागणी करत आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी केली.

***

परभणी जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं आज मूक आंदोलन करण्यात आलं. बीड जिल्ह्यातल्या विवेक रहाडे या युवकानं या प्रकरणी दडपणाखाली येऊन आत्महत्या केली. त्यान मराठा आरक्षणसाठी दिलेल बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असंही आंदोलनकर्त्यांनी यावेळी नमुद केलं. तोंडाला काळी पट्टी बांधन आंदोलकांनी यावेळी शासनाचा निषेध केला.

****

बीड मधल्या एका मराठा युवकाच्या आत्महत्येला दुःखद संबोधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. विवेक रहाडे याच्या दुःखद मृत्यूबद्दल ऐकून आपण उद्ध्वस्त झालो आहोत. मराठा समाजाच्या नेत्यांनी अशा दुर्दैवी घटनेवर साखळी प्रतिक्रिया उमटण्यापुर्वी जागं व्हावं, असं आवाहन पार्थ पवार यांनी सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे केलं आहे.

****

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय `घाटी` इथं घनकचरा विल्हेवाट यंत्राचं आज बजाज ऑटो कंपनीचे उपाध्यक्ष अभय पत्की आणि अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. बजाज ऑटो कामगार आणि कर्मचारी बंधूंच्या न्यू शिवशक्ती गणेश मित्र मंडळानं यावर्षी गणेशोत्सव अत्यंत साधेपणानं साजरा करत कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईसाठी हे यंत्र भेट दिलं आहे. मंडळातर्फे औरंगाबाद महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रासाठी आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांच्याकडे ३० रोगाणूरोधक वितरण यंत्रं भेट स्वरुपात देण्यात आली. 

****

पुण्याच्या कामगार साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा राज्यस्तरीय गदिमा काव्य प्रतिभा पुरस्कार नांदेडचे कवी जगदीश कदम यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग.दि.माडगुळकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं दरवर्षी पुरस्कार दिले जातात. `गदिमा काव्य पुरस्कार` कवी अशोक थोरात, श्रीनिवास मस्के, साहेबराव टोणगे, देवा झिंजाड या कवींना जाहीर झाले आहेत. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पहार असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात वाशिम ते नांदेडमार्गे जाणाऱ्या एका मालवाहू गाडीतून २२ लाख ४४ हजार रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी आज जप्त केला. वाशिम- हिंगोली रोडवरील कलगाव शिवारात हिंगोली जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली.

***

परभणी महापालिका हद्दीतल्या रस्त्यांच्या कामांची विभागीय आयुक्तांनी गुणवत्ता नियंत्रण कार्यालयामार्फत तातडीन चौकशी करावी, संबंधित कंत्राटदाराविरूध्द गुन्हे दाखल करावेत, या मागणीकरिता रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज औरंगाबाद इथं विभागीय महसूल अधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली.  

****

लातूर जिल्ह्यात जलसंपदा खात्याच्या मंडळ कार्यालयाचं आज उद्घाटन करण्यात आलं. जलसंपदा विभागाच्या इमारतीत अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांच्या हस्ते या कार्यालयाची सुरूवात करण्यात आली. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्व पाटबंधारे प्रकल्पांच्या सिंचन व्यवस्थापनाचं काम या मंडळामार्फत केले जाणार आहे.

****

 

No comments:

Post a Comment