Saturday, 3 October 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 October 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 October 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००

****

*केंद्र सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजणार - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

*सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी तपास अहवाल केंद्रीय अन्वेषण विभागानं जाहीर करावा- गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी

*दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरचं चक्रवाढ व्याज माफ होणार

आणि

*औरंगाबादमधे कोरोना विषाणू संसर्गामुळे पाच रुग्णांचा मृत्यू

****

केंद्र सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या दृष्टीनं आवश्यक सर्व उपाय योजत असल्याची माहिती केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. या संदर्भातल्या स्वामीनाथन आयोगाच्या जास्तीत जास्त शिफारसी सरकारनं स्विकारल्या असल्याचंही त्यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा एक भाग म्हणून सरकारनं कृषी सुधारणा विधेयकांचं कायद्यात रुपांतर केलं असल्याचं ते यावेळी म्हणाले. शेती क्षेत्राला नव तंत्रज्ञानाची गरज म्हणून सरकारनं मृदा कार्ड, किसान क्रेडीट कार्ड, पीक विमा पद्धतीमध्ये बदल, सूक्ष्म सिंचन आणि ई-मंडीची सुरुवात केली असून शेती क्षेत्राला बळ देण्याचं काम सरकार गेल्या सहा वर्षांपासून करत असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री दानवे यावेळी म्हणाले.

****

राज्यशासनानं मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना फळबागांसाठी एकरी ५० हजार रुपये तर अन्य पिकांसाठी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ते आज जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. मराठवाड्यात प्रथमच सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्यानं खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला आहे. त्यामुळे प्रशासनानं नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करावे, नुकसान भरपाई रक्कम आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला. जालना जिल्हा दौऱ्यावर असलेले दरेकर यांनी आज बदनापूर तालुक्यातल्या रोषगाव आणि धोपटेश्वर इथल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. आमदार संतोष दानवे, नारायण कुचे यावेळी उपस्थित होते. 

****

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ती आत्महत्या होती की हत्या हे जनतेला माहिती व्हावं या करता केंद्रीय अन्वेषण विभागानं आपला चौकशीचा अहवाल लवकर जाहीर करावा, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. राज्य सरकार या चौकशी अहवालाची वाट पहात असल्याचं त्यांनी आज नागपूरमधे पत्रकारांना बोलताना सांगितलं. ती हत्या नव्हती, आत्महत्या होती अशा वृत्तांवर प्रतिक्रीया देताना ते म्हणाले की, या संदर्भात आपल्याला अधिकृत माहिती मिळालेली नसल्यानं अधिकृत अहवाल मिळेपर्यंत प्रतिक्रीया न देणंच योग्य ठरेल. अधिकृत माहिती मिळाल्यावर आपण यावर विधान करू, असंही त्यांनी नमुद केलं. आपण या प्रकरणात निश्कर्षापर्यंत पोहचलेलो नसून या संदर्भातल्या सर्व बाबींची चौकशी सुरू असल्याचं केंद्रीय अन्वेषण विभागानं या आठवड्याच्या प्रारंभी म्हटलं होतं.

****

अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणी केंद्र सरकारनं राज्याला बदनाम करण्याचा कट रचला असून हा कट रचणाऱ्यांना अटक करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथक नियुक्त करावं, अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे. सुशांतसिहला न्याय मिळावा अशी आपली मागणी असल्याचं नमुद करत भारतीय जनता पक्षानं मात्र हा आरोप फेटाळला आहे. सुशांतसिंहची हत्या झाली असल्याच्या शक्यतेला खोडून काढताना त्यानं फास घेऊन आत्महत्या केली असल्याचं अखील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं आज आपल्या अहवालात नमुद केलं असल्याच्या पार्श्र्वभूमीवर काँग्रेस पक्षानं ही प्रतिक्रीया नोंदवली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी योग्य तपास केला असल्याचं या अहवालामुळे स्पष्ट झालं असल्याचं काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या सहा महिन्यासाठीच्या कर्जफेड सवलतीच्या कालावधीत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाला चक्रवाढ व्याजातून सूट द्यायचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात मान्य केलं आहे. या अनुदानासाठी संसदेची अधिकृत परवानगी घेण्यात येईल, असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे. वैयक्तिक कर्जदार तसंच मध्यम आणि लघू उद्योजकांना यामुळे दिलासा मिळेल. दोन कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेतलेल्यांना याचा लाभ मिळणार नाही, असंही केंद्र सरकारनं या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात नमुद केलं आहे.

****

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक पुष्पा भावे यांच्या पार्थीव देहावर आज मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीतल्या विद्युतदाहिनीत कोणत्याही धार्मिक विधींशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. पुष्पा भावे यांचं  निधन ही महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची, सुधारणावादी विचारांची, दुर्बल-वंचित-उपेक्षित घटकांच्या हक्काच्या लढ्याची, महिला सक्षमीकरणाच्या चळवळीची मोठी हानी आहे. व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारा, सर्वसामान्यांवरच्या अन्यायाविरुद्ध उठणारा हक्काचा आवाज आज शांत झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणू संसर्गामुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ९५२ झाली आहे. जिल्ह्यात या संसर्गाच्या रुग्णांची  संख्या ३४ हजार दहा झाली असून चार हजार ८१५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातल्या नवजात शिशु विभागात कोरोना विषाणूग्रस्त शिशुंसाठी दहा लाख रुपयांची यंत्रसामुग्री आज देण्यात आली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या आमदार निधीतून ही भेट देण्यात आली आहे. आमदार चव्हाण तसंच महविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या उपस्थितीमधे ही यंत्रसामुग्री या विभागाच्या सुपूर्द करण्यात आली.

****

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेल्या ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी’ अभियानात आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या २६ लाख २४ हजार ५७५ नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली. असल्याची  माहिती जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं दोन हजार ५३२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

धुळे जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून कोरोना विषाणुच्या नव्या रुग्णांपेक्षा  या संसर्गातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात हा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार  ४२३ असून यातले ११ हजार ४२३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत.

****

जालना-अंबड मार्गावर गोलापांगरी इथं शिवबा संघटनेतर्फे आज मराठा आरक्षणाबाबत सरकानं स्पष्ट भूमिका मांडावी, तसंच आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत कुठलीही नोकर भरती करू नये आदी मागण्यांसाठी `रस्ता बंद` आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती.

******

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं वाशिम जिल्ह्यातल्या राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर आज ढोल वाजवून आंदोलन करण्यात आलं. शिवसेना खासदार भावना गवळी, काँग्रेस पक्षाचं जिल्हा कार्यालय आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं.

****

उत्तर प्रदेशातल्या हाथरस आणि बलरामपूरमध्ये दलित तरुणींवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी `आज अहमदनगरमधे `रस्ता बंद` आंदोलन करणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या दोन्ही प्रकरणांमधे केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली.

****

उत्तर प्रदेश मधल्या हाथरस इथल्या दलित मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या आणि उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर वाशीममधे आज खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. उत्तर प्रदेश मधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या विरोधात यावेळी घोषणा देऊन निषेध नोंदवण्यात आला. शेकडो महिला कार्यकर्त्या यात सहभागी झाल्या.

****

एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे की नाही अथवा होऊन गेला आहे का, याबाबतच्या शंकेचं समाधान करणं आता जळगाव इथं शक्य होणार आहे. जळगाव इथं यासाठीच्या `अँटीबॉडी` तपासणी केंद्राचं लोकार्पण जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते आज करण्यात आल. हे राज्यातलं असं पहिलं केंद्र असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

`मास्क` न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेनं कठोर कारवाई करत साठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे. रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरोधात कारवाई करत एक लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. कांदिवली परिसरात सर्वाधिक दंडात्मक कारवाई केल्याचं महापालिका अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

****

कोरोना विषाणूमुक्त झालेल्या दहा ते बारा टक्के रुग्णांना मानसिक आरोग्याच्या समस्या भेडसावत असल्यामुळे अशा रुग्णांच्या समुपदेशनासाठी पुणे इथं समुपदेशन केंद्र सुरू करण्याचं प्रशासनानं ठरवलं आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड इथं यासाठी पाच केंद्र सुरू केली जाणार आहेत. या केंद्रात तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे. ****

 

 

 

No comments:

Post a Comment