Sunday, 4 October 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 October 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 October 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ ऑक्टोबर २०२० दुपारी १.०० वा.

****

कृषी सुधारणा कायद्यासंदर्भात विरोधी पक्षांकडून संभ्रम निर्माण केला जात असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात पणजी इथं पत्रकारांशी बोलत होते. या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होऊन सरकार हमीभावानं शेतमाल खरेदी बंद करेल, असं विरोधी पक्षांकडून सांगितलं जात आहे, मात्र हे सगळं खोटं असल्याचं, जावडेकर यांनी नमूद केलं. देशातली ६० टक्के जनता शेती करते, मात्र सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा फक्त १५ टक्के आहे, शेतमालाचं उत्पादन वाढवण्यासोबतच शेतमालासाठी देशाबाहेरही बाजारपेठ उपलब्ध करून देणं, आवश्यक असल्याचं जावडेकर यांनी नमूद केलं. शेतकऱ्याला त्याच्या शेतमालातून उत्पन्न कमी मिळतं, ग्राहकांना मात्र शेतमाल चढ्या दरानं विकत घ्यावा लागतो, याकडे लक्ष वेधत, विरोधी पक्षांचं या कायद्याविरोधातलं आंदोलन हे फक्त दलालांच्या हितासाठी असल्याचं जावडेकर यांनी नमूद केलं. पंजाबात या कायद्याविरोधात होत असलेलं आंदोलन हे राजकीय असल्याची टीकाही जावडेकर यांनी केली.

****

देशातलं कोविड संसर्ग मुक्तीचं प्रमाण ८४ पूर्णांक एक दशांश टक्के एवढं झालं आहे. गेल्या २४ तासांत कोविड बाधितांच्या संख्येत ७५ हजार ८२९ ने वाढ झाल्यानं देशातली बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ४९ हजार ३७३ झाली आहे. यापैकी ५५ लाख ९ हजार ९६६ रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत ९४० रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाल्यानं मृतांचा एकूण आकडा एक लाख एक हजार ७८२ झाला आहे. मात्र संसर्गातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याने मृत्यूदर आता एक पूर्णांक पाच दशांश टक्के एवढा कमी झाला आहे. संपूर्ण जगाच्या मृत्यूदराच्या तुलनेत हा दर जवळपास अर्धा असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, देशात आतापर्यंत सात कोटी ९० लाख कोविड नमून्यांची चाचणी करण्यात आली आहे. यासोबतच भारत आता दररोज सर्वाधिक चाचण्या करणारा देश बनला आहे. गेल्या २४ तासांत देशात ११ लाख ५० हजार कोविड नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

****

थोर स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. आपल्या ट्वीट संदेशात उपराष्ट्रपती नायडू यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी युरोपात राहून केलेल्या कार्याला उजाळा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही श्यामजी कृष्ण वर्मा यांना आदरांजली अर्पण केली आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी जीवन समर्पित केलेल्या श्यामजी कृष्ण वर्मा यांचं कार्य अनेकांसाठी प्रेरणादायक ठरल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

देशभरातल्या ७२ शहरांतील २ हजार ५६९ केंद्रांवर आज केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा होत आहे. ही पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मुंबईत उपनगरी रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. आयोगाच्या विनंतीनंतर रेल्वे मंत्रालयानं या परीक्षार्थींसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे वर विशेष उपनगरी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. या परीक्षार्थींना ओळखपत्र आणि परीक्षेच्या प्रवेशपत्राच्या आधारे हा प्रवास करता येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

****

राज्यात उद्यापासून ५० टक्के क्षमतेनं हॉटेल्स आणि अन्य रेस्टॉरंटस सुरू करण्यात येणार आहेत. यासाठीच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनानं जारी केल्या आहेत. या सूचनांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यानुसार ग्राहकांची तापमान आणि लक्षणं विषयक तपासणी केल्यानंतरच, हॉटेमधे प्रवेश देता येणार आहे. याशिवाय ग्राहकांना मास्क अनिवार्य असून, परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं तसंच हॉटेल आणि रेस्टॉरंटमधे ग्राहकांसाठी सॅनीटायझर उपलब्ध करून देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. संसर्ग टाळण्यासाठी शक्यतो डिजीटल पेमेंटचा पर्याय वापरावा, असंही या नियमावलीत म्हटलं आहे. प्रसाधनगृह तसंच ग्राहकांद्वारे सातत्यानं वापरल्या जाणाऱ्या जागा, फर्नीचर सतत स्वच्छ करावं. कॅश काऊंटरसह ग्राहकांशी सातत्यानं संपर्क येऊ शकतो अशा ठिकाणी काचेच्या भिंतीसारख्या रोधकांचा वापर करावा असंही या नियमावलीत म्हटलं आहे. ग्राहकांना फक्त शिजवलेले खाद्य पदार्थ द्यावेत, कच्चे पदार्थ देणं टाळावं असं या सुचवण्यात आलं आहे. हॉटेलं आणि रेस्टॉरंटमधले सर्व सीसीटीव्ही कार्यरत असावेत, हॉटेलं आणि रेस्टॉरंटमधे प्रवेश करण्यासाठी तसंच बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र दरवाजे ठेवावेत असंही या नियमावलीत म्हटलं आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा इथल्या उप-कारागृहातल्या ५५ आरोपींपैकी ३६ आरोपींना कोरोनाविषाणूची बाधा झाली आहे. त्यापैकी दोन आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली असून ३४ आरोपींना उपचारासाठी नगर इथल्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्या एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३४ हजार १९३ झाली आहे. यापैकी २८ हजार ६७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्याआजपर्यंत एकूण ९५२ जणांचा मृत्यू झाला असून, सध्या ४ हजार ५६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

नाशिक शहरात कोविड रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करणाऱ्या खासगी रुरूग्णालयांच्या देयकांची तपासणी करून नाशिक महापालिकेने सुमारे अडीच कोटी रुपये रुग्णांच्या नातेवाईकांना परत केले आहेत. नाशिक महापालिकेने १३२ खासगी रुग्णालयांमध्ये लेखा परीक्षक नियुक्त केले आहेत.

//***********//

 

No comments:

Post a Comment