Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 October 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१
ऑक्टोबर
२०२० सकाळी ७.१० मि.
****
बातमीपत्राच्या सुरूवातीला गांधी वचन –
भविष्य या गोष्टीवर अवलंबून
आहे की आज तुम्ही काय करताय.
****
·
राज्यात पाच ऑक्टोबरपासून हॉटेल्स, फुड कोर्ट, उपाहारगृह तसंच राज्यांतर्गत
चालणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्व रेल्वे सेवा सुरु करण्यास परवानगी, मात्र शाळा, महाविद्यालयं,
खासगी शिकवण्या, इतर शैक्षणिक संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार.
·
कृषिविषयक कायद्यांची राज्यात अंमलबजावणी करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी
मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन.
·
अयोध्येतल्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता.
·
राज्यात आणखी १८ हजार ३१७ कोविड बाधितांची नोंद, ४८१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.
·
मराठवाड्यात ३९ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या एक हजार ३८८ रुग्णांची नोंद.
आणि
·
कोरोना विषाणू बाधित रुग्णांना जास्तीचं बील आकारल्यावरुन औरंगाबाद शहरातल्या
१४ रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस.
****
देशात कोविड-19 प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेली टाळेबंदी उठवण्याच्या पाचव्या
टप्प्याला आजपासून सुरुवात होत आहे. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने मार्गदर्शक
सूचना जारी केल्या आहेत. देशभरात प्रतिबंधित क्षेत्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत टाळेबंदी कायम
राहणार आहे.
राज्यात पाच ऑक्टोबरपासून हॉटेल्स, फुड कोर्ट, उपाहारगृह आसन क्षमतेच्या ५०
टक्के सुरु करण्यास, तसंच राज्यांतर्गत चालणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्व रेल्वे सेवा
सुरु करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल्स, फुड कोर्ट, उपाहारगृह सुरू करण्यासंदर्भात
प्रमाणित नियमावली पर्यटन विभाग जारी करणार आहे. शाळा, महाविद्यालयं, खासगी शिकवण्या,
इतर शैक्षणिक संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहतील. त्याचबरोबर चित्रपट गृह, जलतरण
तलाव, मनोरंजन पार्क्स, सभागृह, नाट्यगृहही बंदच राहणार आहेत. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक,
शैक्षणिक, क्रीडा विषयक कार्यक्रमांनाही राज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदी कायम आहे.
केंद्र सरकारनं मात्र चित्रपटगृह, मनोरंजन पार्क, मल्टिप्लेक्स १५ ऑक्टोबर पासून
एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांसह सुरु करण्यास परवानगी दिली आहे. केवळ खेळाडूंच्या
शिकवणीसाठीच जलतरण तलाव सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयं,
खासगी शिकवण्या, इतर शैक्षणिक संस्थाही संबंधित राज्य सरकारं १५ ऑक्टोबरनंतर सुरु करण्यासंदर्भात
निर्णय घेऊ शकतात, असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. मात्र पालकांची लेखी अनुमती असेल,
तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतील, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
केंद्र सरकारनं संमत केलेल्या कृषिविषयक कायद्यांची राज्यात अंमलबजावणी करण्यासंदर्भात
निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं
घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. या कायद्याच्या
अनुषंगाने राज्यातल्या विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा करण्यात
येणार असून, त्याआधारे योग्य त्या सुधारणांचा मसुदा मंत्रिमंडळ उपसमितीसमोर सादर करण्यात
येईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण
सभा ३१ मार्च २०२१ पर्यंत घेण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळे सहकारी संस्थांना निवडणूक, वार्षिक सर्वसाधारण सभा, लेखापरिक्षण
तसंच पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ याबाबतीत कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत होता, यातून
मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधल्या विविध कलमात देखील
सुधारणा करण्यात येणार आहेत.
वृक्ष संरक्षण आणि जतनासंदर्भात विषयक कायद्याचं नियमन आता नगरविकास विभागाऐवजी
पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
गेल्या वर्षी मुंबईत आरे इथं मेट्रोसाठी केली जाणारी वृक्षतोड थांबवण्याकरता
आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्यांवरवे गुन्हे मागे घेण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला
आहे.
****
अयोध्येतल्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता
करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयच्या लखनऊतल्या विशेष न्यायालयानं
काल हा निर्णय दिला. अयोध्येत सहा डिसेंबर १९९२ रोजी झालेली ही घटना पूर्वनियोजित नव्हती
आणि सीबीआयनं लावलेल्या आरोपांना सिद्ध करण्यासाठी कोणतेही सबळ पुरावे नाहीत, असं न्यायालयानं
या निर्णयात म्हटलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा
भारती, यांच्यासह एकूण ३२ जण या खटल्यात आरोपी होते.
दरम्यान, या निर्णयाचं या प्रकरणातले आरोपी लालकृष्ण अडवाणी तसंच मुरली मनोहर
जोशी यांनी स्वागत केलं आहे.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा प्रारंभिक परीक्षा स्थगित करण्यास सर्वोच्च
न्यायालयानं नकार दिला आहे. गेल्या वेळेस कोविड-19 मुळे ज्या उमेदवारांना ही परीक्षा
देता आली नाही, त्यांच्यासाठी ही आणखी एक संधी असेल, असं न्यायालयानं म्हटलं आहे. चार
ऑक्टोबरपासून होणारी ही परीक्षा कोविड-19 चा प्रादुर्भाव आणि देशाच्या विविध भागातल्या
पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, स्थगित करण्याची मागणी केली जात होती. न्यायालयानं
२०२० आणि २०२१ची नागरी सेवा परीक्षा एकत्र घेण्यासही नकार दिला आहे. परीक्षा सर्वांसाठी
आवश्यक असून, परीक्षेसाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात आल्याचं न्यायालयानं म्हटलं
आहे.
****
आणि आता ऐकू या जेष्ठ पत्रकार, गांधी विचारांचे अभ्यासक अरूण खोरे यांनी सांगितलेला
गांधी विचार –
गांधीजी म्हणायचे गीता ही माझी आई आहे. पुढे जाऊन गांधीजी म्हणायचे गीता ही
साऱ्या जगाची आई आहे, ती कोणाकडेही दुर्लक्ष करत नाही. जो कोणी तिचे दार ठोठावेल त्या
प्रत्येकासाठी तिचे दरवाजे उघडे आहेत. आणि म्हणून गांधीजींनी आपल्या प्रार्थना प्रवचनांमधे
अनेकवेळा गीतेमधील श्लोकांच्यावर भाष्य केले आहे. गांधींजींच्या दृष्टीने भगवत गीता
म्हणजे केवळ तत्वज्ञानाची सुत्रं सांगणारं काव्य नसून ते एक महान असं धर्मकाव्य आहे.
गांधीजींनी यापुढेही जाऊन गीतेबद्दल आपली काही मतं विविध ठिकाणी मांडलेली आहेत. एके
ठिकाणी गांधीजी असं म्हणतात गीता ही ‘अनासक्ती’ या मध्यवर्ती विषयाचा जसा विचार करते
तशीच ती अहिंसेची शिकवण देते हा माझा अन्वयार्थ आहे. गांधीजींनी या संदर्भात पुढे असं
म्हटलं होतं एका प्रार्थना सभेमधे की महाभारत हे वाचल्यानंतर आपल्या मनामधे शांततेचा
विचार येतो, अहिंसेचा विचार येतो. हे महाभारतामधे युध्दप्रवण स्थितीला पुढे जाण्याची
भूमिका नसून शांतता स्थापन केली पाहिज. आणि अहिंसेला प्राधान्य दिलं पाहिजे हाच विचार
आहे असं मला वाटतं. याकडे गांधीजींनी विशेष प्रमाणामधे आपल्या सर्वांचं लक्ष वेधलेलं
आहे.
****
कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर मराठवाडा ग्रामीण पर्यटन
विकास कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी
सांगितलं. मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. ग्रामविकास विभागामार्फत
कोकणात ग्रामीण भागातल्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी
निधी दिला जातो, अशीच योजना मराठवाड्यासाठी राबवता येईल, असं ते म्हणाले. यातून मराठवाड्यातल्या
पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता असल्याचं
सत्तार यांनी सांगितलं.
****
पोलिस दलातल्या ४३ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसह एकूण १५० वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या
काल बदल्या करण्यात आल्या. यात औरंगाबादचे पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांची औरंगाबाद
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी बदली झाली आहे. नाशिक इथल्या महाराष्ट्र
पोलिस अकादमीचे अपर पोलिस अधीक्षक दीपक गिर्हे यांची औरंगाबादच्या उपायुक्तपदी बदली
झाली आहे. औरंगाबादच्या नागरी हक्क समितीच्या अधीक्षक डॉ. दीपाली धाटे - घाडगे यांची
सोलापूर उपायुक्तपदी बदली झाली आहे.
****
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळानं आयकर विवरणपत्र आणि वस्तु आणि
सेवा कर-जीएसटी परतावा भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ३० नोव्हेंबरपर्यंत आयकर विवरणपत्र
आणि ३१ ऑक्टोबर पर्यंत जीएसटी परतावा दाखल करता येईल.
****
राज्यात काल दिवसभरात आणखी १८ हजार ३१७ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे
राज्यातली एकूण रुग्णसंख्या १३ लाख ८४ हजार ४४६ झाली आहे. राज्यभरात काल ४८१ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ३६ हजार ६६२ रुग्णांचा
मृत्यू झाला आहे. तर काल १९ हजार १६३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं.
राज्यात आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या
दोन लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ३९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक
हजार ३८८ रुग्णांची नोंद झाली.
लातूर जिल्ह्यात दहा रुग्णांचा मृत्यू, तर नवे २५५ रुग्ण, उस्मानाबाद - आठ बाधितांचा
मृत्यू, तर नवे १९६ रुग्ण, औरंगाबाद - सात रुग्णांचा मृत्यू, तर नवे २३७ रुग्ण, नांदेड
-पाच रुग्णांचा मृत्यू, तर नवे २६४ रुग्ण, जालना - चार जणांचा मृत्यू, तर नवे ११६ रुग्ण,
बीड - तीन रुग्णांचा मृत्यू, तर नवे २०४ रुग्ण, परभणी - दोन बाधितांचा मृत्यू, तर नवे
७७ रुग्ण आणि हिंगोली जिल्ह्यात आणखी ३९ रुग्ण आढळले.
****
पुणे जिल्ह्यात आणखी तीन हजार २९८ रुग्ण आढळले, तर ८४ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत
दोन हजार ६५४ रुग्ण आणि ४६ मृत्यूंची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात ९८२ रुग्ण, सांगली
५८०, सातारा ५१२, बुलडाणा १८८, भंडारा १४०, गडचिरोली १०७, रत्नागिरी ७७, यवतमाळ ६६
आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या ५३ रुग्णांची नोंद झाली.
****
कोरोना विषाणू बाधित रुग्णांना जास्तीचं बील आकारल्यावरुन औरंगाबाद शहरातल्या
१४ रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या रुग्णालयांनी ६५६ रुग्णांकडून
६२ लाख ३३ हजार इतकी जादा रक्कम आकारलेली आहे. रुग्णालयांनी या नोटीसला सात दिवसांमध्ये
समर्पक उत्तर न दिल्यास आणि बिल कमी करणेबाबत आवश्यक ती कारवाई न केल्यास कारवाई करण्यात
येईल असा इशारा जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिला आहे.
****
‘माझं कुटुंब - माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्हा प्रशासन
विविध उपाययोजना राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून लोहारा तालुक्यातील स्पर्श रुग्णालयाच्या
वतीनं ‘मोबाईल मेडिकल व्हॅन’चा शुभारंभ जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते
सास्तुर इथं हिरवा झेंडा दाखवून काल झाला. या उपक्रमाविषयी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
यांनी माहिती दिली. ते म्हणाले –
चार मोबाईल युनिटच्या माध्यमातून ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम १००
पेक्षा जास्त गावांमधे आम्ही नेतो आहोत. डॉक्टरांच्या मदतीने आणि तपासणी पथकाच्या मदतीने
हे गावोगावी जाऊन लोकांचं स्क्रिनिंग करणं, पल्स ऑक्सीमीटर आणि थर्मल गनच्या मदतीने
जे संशयित रुग्ण आहेत त्यांची लवकरात लवकर अँटीजन चाचणी घेणं आणि त्यांना वेळेत उपचार
देऊन बरं करणं या दृष्टीनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आम्ही वापर करतो आहोत.
****
नांदेडच्या स्वामी रामनानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात
आल्या आहेत. कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन सुरु असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. सर्व
परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल,
असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं. औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनीही आजपासून लेखनी बंद ऐवजी काम बंद आंदोलन सुरु केलं आहे.
****
आजपासून सुरु होत असलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेला विद्यार्थ्यांना उपस्थित
राहता यावं म्हणून राज्य परीवहन महामंडळानं औरंगाबाद जिल्ह्यात जादा बसेस सोडण्याचं
नियोजन केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात तसंच बीड, जालना, परभणी,
बुलडाणा आणि इतर विभागातून औरंगाबादसाठी जादा बसेस सोडण्यात येत असल्याचं विभाग नियंत्रक
अरुण सिया यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर ते रहाटी रस्त्याचं हे काम तातडीने पूर्ण करण्याचे
निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. मुंबईत यासंदर्भात
झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. भोकर ते रहाटी रस्त्याचं काम प्रलंबित असल्याच्या
अनेक तक्रारी, आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
****
परभणी शहरात सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न केल्याबद्दल गेल्या दोन दिवसांत
पोलिस यंत्रणेने एक हजार पाच व्यक्तींविरूद्ध दंडात्मक कारवाई करत एक लाख ३० हजार ८००
रुपये दंड वसूल केला.
****
किल्लारी भूकंपाला काल २७ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्तानं आमदार अभिमन्यू पवार
यांनी किल्लारी इथल्या स्मृती स्तंभासमोर पुष्पचक्र अर्पण करून भुंकपात मुत्यूमुखी
पडलेल्यांना अभिवादन केलं. पोलिसांनी हवेमध्ये बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली.
भुकंपग्रस्त भागातले अनेक प्रश्न प्रलंबित असून, ते सोडवण्यासाठी आपला सातत्याने शासनाकडे
पाठपुरावा सुरू असल्याचं आमदार पवार यावेळी म्हणले.
****
परभणी तालुक्यातल्या येलदरी धरणाचे सर्व दरवाजे काल बंद करण्यात आले. विद्युत
निर्मिती प्रकल्पाद्वारे दोन हजार ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडलं
जात असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
****
उस्मानाबाद इथले वृत्तपत्र छायाचित्रकार नंदकिशोर भन्साळी यांचं काल निधन झालं,
ते ७५ वर्षांचे होते. उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे ते माजी अध्यक्ष होते.
उस्मानाबाद इथल्या प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे संगोपक, आणि जिल्हा
माहेश्वरी सभेचे ते सदस्य आणि मार्गदर्शक होते.
****
अबुधाबी इथं सुरु असलेल्या इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल स्पर्धेत काल कोलकाता
नाईट रायडर्स संघानं राजस्थान रॉयल्स संघांचा ३७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी
करताना कोलकाता नाईट रायडर्स संघानं निर्धारित षटकात १७४ धावा केल्या, प्रत्त्युतरादाखल
राजस्थान रॉयल्सचा संघ १३७ धावाच करु शकला.
****
No comments:
Post a Comment