Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 October 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ ऑक्टोबर २०२० दुपारी १.०० वा.
****
देशाची
प्रगती आणि कल्याणासाठी स्वत:ला समर्पित करा, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं
आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्तानं दिलेल्या संदेशातून राष्ट्रपतींनी
हे आवाहन केलं. गांधीजींनी दिलेल्या सत्य आणि अहिंसा या मंत्राचं अनुसरण करावं, असंही
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
उपराष्ट्रपती
एम व्यंकय्या नायडू यांनी आपल्या ट्वीट संदेशात, गांधीजींचा अंत्योदयाचा विचार आपल्याला
देशातल्या सर्वाधिक उपेक्षितांच्या उत्थानासाठी सदैव प्रेरणा देत राहतील, असं म्हटलं
आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात बापूंचे आदर्श आपल्याला आनंदी
आणि करुणामयी भारताच्या उभारणीचा मार्ग दाखवतील, असं म्हटलं आहे.
राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांच्या १५१व्या तर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ११६व्या
जयंतीनिमित्त त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे.
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीत राजघाटावर गांधीजींच्या
समाधीस्थळी तसंच विजयघाटावर शास्त्रीजींच्या समाधीस्थळी पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.
गांधीजी
तसंच शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्तानं देशभरात अनेक भागात विविध कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात आलं आहे. कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रम दूरदृश्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून होत आहेत.
****
राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला स्वच्छता, सेवाकार्य तसंच वृक्षारोपणाच्या
माध्यमातून महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. आजचा दिवस महात्मा
गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि स्वावलंबन या त्रिसूत्रीची आठवण करून देतो, असं राज्यपालांनी
आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
मुंबईत
विधान भवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर तसेच विधानसभेचे अध्यक्ष
नाना पटोले यांनी गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार आणि गुलाबाची फुलं अर्पण करुन अभिवादन
केलं.
****
विधान
परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज औरंगाबाद इथं शहागंज परिसरात गांधीजींच्या
पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या
वतीनंही गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. औरंगाबाद जिल्हा
शहर कॉंग्रेस समितीच्या वतीनं शहागंज इथं गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं.
औरंगाबाद
महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या वतीनं
आज गांधीजयंती निमित्त “सायकल फॉर चेंज” ही सायकल फेरी काढण्यात आली. मनपा आयुक्त अस्तिक
कुमार पांडे आणि औरंगाबाद पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला.
नांदेड
इथं आज महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंती निमित्त धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या वतीनं
गांधीजींच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
मराठा
आरक्षण संदर्भात आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती युवा मोर्चाच्या
वतीनं निदर्शनं करण्यात आली. मराठा आरक्षणावर केंद्र तसंच राज्य सरकारने लवकरात लवकर
निर्णय घ्यावा, यासह अनेक मागण्या आंदोलकांच्या वतीनं करण्यात आल्या.
****
केंद्र
सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयक आणि कामगार कायदा सुधारणा विधेयक रद्द करावं या
मागणीसाठी औरंगाबाद जिल्हा शहर कॉंग्रेस समितीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे
यांच्या नेतृत्वात फुलंब्री इथं धरणे आंदोलन करण्यात येत आहे. धुळे जिल्हा कॉंग्रेस
कमिटीच्या वतीने या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आलं.
****
देशात
कोविड बाधितांचा बरे होण्याचा दर ८३ पूर्णांक ७० शतांश टक्के इतका झाला आहे. देशात
आतापर्यंत ५३ लाख ५२ हजार ७८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत
या संसर्गाचे ८१ हजार ४८४ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे बाधितांची संख्या ६३ लाख ९४ हजार
६८ झाली तर, १ हजार ९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातली या संसर्गामुळे मृत्यू
झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९९ हजार ७७३ झाली आहे.
दरम्यान,
देशात गेल्या २४ तासांत ११ लाख कोविड चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत जवळपास ७ कोटी
७० लाख तपासण्या करण्यात आल्या आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ८४१ झाली आहे.
तर २७ हजार ८१४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. आजपर्यंत ९४१ जणांचा कोरोना विषाणू
संसर्गामुळे मृत्यू झाला असून ५ हजार ८६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनातर्फे
सांगण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment