Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 October 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ ऑक्टोबर २०२० दुपारी १.०० वा.
****
काँग्रेसच्या
नेतृत्त्वाखालील सरकारच्या काळामधे संरक्षण हितसंबंधांशी दीर्घकाळ समझौता करण्यात आला
आणि सामरिक प्रकल्प दूर्लक्षले गेल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
हिमाचल प्रदेशच्या रोहतांगमध्ये ‘अटल बोगद्या’चं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. अटल
बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते या बोगद्याच्या कामाचा प्रारंभ झाला होता पण त्यांचं
सरकार गेल्यानंतर हा प्रकल्प विस्मृतीत गेला होता, असं त्यांनी यावेळी सांगितलं. या
सरकारच्या काळात २६ वर्षांचं काम सहा वर्षांत पूर्ण करण्यात आल्याची माहितीही त्यांनी
यावेळी दिली. सामरिक दृष्ट्या महत्त्वाचे असलेले असे डझनावारी प्रकल्प दूर्लक्षले गेले
असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमुद केलं. आपल्यासाठी देशाची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची
असल्याचा त्यांनी पुरुच्चार केला. ‘अटल बोगदा’ हा जगातला हा सर्वात लांब महामार्ग बोगदा
आहे. हिमालयाच्या पीर पंजाल डोंगर रांगामध्ये असलेला हा बोगदा समुद्र सपाटीपासून १०
हजार फुटाच्या उंचीवर असून सुमारे नऊ किलोमीटर लांबीचा आहे. या बोगद्यामुळे मनालीला
लाहौल-स्पीति खोऱ्यासोबत जोडण्यात आलं आहे. यापूर्वी मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी झाल्यावर
जवळपास सहा महिने या दोन विभागांचा एकमेकांशी संपर्क राहत नसे. या बोगद्यामुळे मनाली
आणि लेह मधले अंतर ४६ किलोमीटरने कमी होईल तर प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी
होईल.
****
देशात
कोरोना विषाणू संसर्गामुळे आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमधे एक हजार ६९ रुग्णांचा
मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ८४२ झाली आहे.
मृत्यू दर एक पूर्णांक ५६ शतांश टक्के आहे. देशात या संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचं
प्रमाण ८३ पूर्णांक ८४ टक्के झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली
आहे. देशात या संसर्गाचे नवे ७९ हजार ४७६ रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या ६४ लाख
७३ हजार ५४४ झाली आहे. यातले ५४ लाख २७ हजार ७०६ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. देशात
सध्या कोरोना विषाणुचे नऊ लाख ४४ हजार ९९६ रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण रुग्णांच्या
तुलनेत हे प्रमाण १४ पूर्णांक ६० शतांश टक्के आहे.
****
देशात
कोरोना विषाणू संसर्गासाठी कालपर्यंत सात कोटी ७८ लाख ५० हजार ४०३ नमुन्यांच्या चाचण्या
करण्यात आल्या आहेत. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं ही माहिती दिली आहे. यातल्या
अकरा लाख ३२ हजार ६७५ चाचण्या काल करण्यात आल्या असल्याची माहितीही परिषदेनं दिली आहे.
****
स्वच्छता
अणि पिण्याच्या पाण्याची सुविधा यासाठी उत्कृष्ट कार्य करणारे राज्ये, जिल्हे, ग्रामपंचायती,
यांना काल केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं स्वच्छ भारत पुरस्कार देण्यात आले.
दरम्यान, देशातली ९७ टक्क्यांपेक्षा अधिक शहरं उघड्यावरील शौचापासून मुक्त झाली असल्याची
माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदिप सिंह पुरी यांनी दिली आहे. ते
काल स्वच्छता अभियानाला सहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित एका ‘वेबिनार’मध्ये बोलत
होते.
****
ज्येष्ठ
विचारवंत प्राध्यापक पुष्पा भावे यांचं काल रात्री मुंबईत निधन झालं. त्या एक्क्याऐंशी
वर्षांच्या होत्या. विद्यार्थीदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पा
भावेंचा संपर्क होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा अनेक सत्याग्रहांमध्ये
त्यांनी भाग घेतला होता. मुंबईतल्या रूईया महाविद्यालयात त्यांनी मराठी विभाग प्रमुख
म्हणून अनेक वर्ष काम पाहिलं होतं. पुष्पा भावे यांच्या पश्चात पती आनंद भावे आहेत.
****
थोर
स्वातंत्र सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेन्द्र भागवत यांनी विधानभवन परिसरात असलेल्या
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास अर्पण करुन अभिवादन केले.
****
राज्यात
काल १५ हजार ५९१ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची
संख्या १४ लाख १६ हजार ५१३ झाली आहे. काल दिवसभरात एकूण ४२४ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. यामुळे राज्यात या संसर्गानं मृत पावलेल्यांची संख्या ३७ हजार ४८०एवढी
झाली आहे. आतापर्यंत ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण यातून बरे होऊन घरी गेले आहेत तर सध्या
दोन लाख ६० हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मराठवाड्यात काल कोरोना विषाणू संसर्गामुळे
३२ रुग्णांचा मृत्यू झाला तर एक हजार ८८ नवे बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या
रूग्णांची संख्या ३४ हजार दहा झाली आहे. आतापर्यंत २८ हजार २४३ रूग्ण बरे झाले आहेत.
सध्या चार हजार ८२० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. काल ४२९ रूग्णांना बरे झाल्यानं रूग्णालयातून
सुटी देण्यात आली असल्याचं औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment