Saturday, 3 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.10.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 October 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

बातमीपत्राच्या सुरूवातीला गांधी वचन –

एखाद्या देशाची संस्कृती लोकांच्या चांगुलपणात आणि आत्म्यात असते.

****

·      हिमाचल प्रदेशमध्ये तयार करण्यात आलेल्या जगातल्या सर्वात लांब महामार्ग अटल बोगद्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन.

·      महात्मा गांधी यांच्या वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसाचा दर्जा मिळण्याची गरज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

·      शेती सुधारणा तसंच कामगार विरोधी काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसनं पाळला ‘किसान मजदूर बचाओ दिन’.

·      राज्यात आणखी १५ हजार ५९१ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण, ४२४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      मराठवाड्यात ३२ बाधितांचा मृत्यू तर एक हजार ८८ नवे बाधित रुग्ण.

आणि

·      औरंगाबादचे हिमरू नक्षीकामाचे आधुनिक प्रणेते अहमद कुरेशी यांना यंदाचा स्वातंत्र्यसैनिक अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हिमाचल प्रदेशच्या रोहतांगमध्ये तयार करण्यात आलेल्या अटल बोगद्याचं उदघाटन होणार आहे. जगातला हा सर्वात लांब महामार्ग बोगदा आहे. हिमालयाच्या पीर पंजाल डोंगर रांगामध्ये असलेला हा बोगदा समुद्र सपाटीपासून १० हजार फुटाच्या उंचीवर असून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इलेक्टो-मैक्निकल प्रणालीच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. जवळपास नऊ किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे मनालीला लाहौल-स्पीति खोऱ्यासोबत जोडण्यात आलं आहे. यापूर्वी मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी झाल्यावर जवळपास सहा महिने या दोन विभागांचा एकमेकांशी संपर्क राहत नसे. या बोगद्यामुळे आता संपर्क कायम राहणार असून, मनाली आणि लेह मधले अंतर ४६ किलोमीटरने कमी होईल तर प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होईल.

****

महात्मा गांधी यांच्या वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसाचा दर्जा मिळण्याची गरज असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्तानं सेवाग्राम आश्रमातल्या विकास कामांचं त्यांच्या हस्ते काल ई-लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. गांधीजींच्या स्मारकाच्या जपणुकीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही देत शस्त्राशिवाय युद्ध जिंकू शकतो, हे सांगणाऱ्या महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमाचा जागतिक प्रेरणा केंद्र म्हणून लौकीक निर्माण करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी बोलतांना दिलं.

उपमुख्यमंत्री अजित पवारही या समारंभात सहभागी झाले होते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत मातोश्री या आपल्या निवासस्थानी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या दोन्हीही महापुरुषांनी भारताला एक राष्ट्र म्हणून ओळख मिळवून देण्यात आणि राष्ट्र उभारणीत दिलेलं योगदान अतुलनीय असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी दिल्लीत राजघाटावर गांधीजींच्या तर विजयघाटावर शास्त्रीजींच्या समाधीस्थळी पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.

****

मुंबईत विधान भवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर तसंच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार आणि गुलाबाची फुलं अर्पण करुन अभिवादन केलं.

****

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी गांधीजी आणि शास्त्रजींच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी औरंगाबाद इथं शहागंज परिसरात गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, आणि औरंगाबाद जिल्हा शहर कॉंग्रेस समितीच्या वतीनंही गांधीजींना आदरांजली वाहण्यात आली.

औरंगाबाद महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीनं गांधीजयंती निमित्त “सायकल फॉर चेंज” ही सायकल फेरी काढण्यात आली. मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे आणि पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला.

नांदेड इथं महात्मा गांधी यांच्या १५१व्या जयंती निमित्त धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या वतीनं गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

उस्मानाबाद इथंही भाजपच्या वतीनं महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. तसंच स्वच्छता कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

नांदेड इथं प्राध्यापक जगदीश कदम यांच्या “गांधी समजून घेतांना” या पुस्तकाचं खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते दूर दृश्य संवाद प्रणालीद्वारे प्रकाशन करण्यात आलं.

****

शेती सुधारणा तसंच कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल राज्यभरात ‘किसान मजदूर बचाओ दिन’ पाळण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसंच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं धरणे आंदोलन करण्यात आलं. हे कायदे आणून शेतकरी आणि कामगारांना उद्योजकांचे गुलाम बनवण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका थोरात यांनी यावेळी केली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी तसंच कार्यकर्ते या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

जालना जिल्ह्यातल्या आठही तालुक्यांमध्ये काल काँग्रेसच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. जालना इथं गांधी चमन चौकात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशात झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध करण्यात आला. अंबड आणि परतूर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून या धक्काबुक्कीचा निषेध केला.

****

उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीनंही काल जिल्ह्यात धरणं आंदोलन करण्यात आलं. शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे अन्यायकारक असून केंद्र सरकारने सदरील कायदे रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

****

हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि कामगार कायद्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा यावेळी सातव यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांना या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्हा शहर कॉंग्रेस समितीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांच्या नेतृत्वात फुलंब्री इथं धरणे आंदोलन करण्यात आलं. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. लातूर जिल्ह्यातही काँग्रेसनं केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत तीन तास धरणं आंदोलन केलं, त्यानंतर लातूर शहरातून निषेध फेरी काढली.

दरम्यान, शेतकरी संघटनेच्यावतीनंही लातूर इथं शेतकरी कायद्यात दुरुस्ती करावी या मागणीसाठी धरणं आंदोलनं करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. नाशिकमध्येही कॉँग्रेसच्या वतीनंही धरणे आंदोलन करण्यात आलं.

****

आणि आता ऐकू या जेष्ठ पत्रकार, गांधी विचारांचे अभ्यासक अरूण खोरे यांनी सांगितलेला गांधी विचार –

गांधीजी हे देशातले पहिले असे मोठे नेते होते की, ज्यांनी आपल्या चळवळीला एक अध्यात्मिक अशा स्वरूपाचं अधिष्ठान दिलं होतं. आणि त्यातूनच त्यांनी आपल्या आश्रम पद्धतीय जीवनातून रोज संध्याकाळी प्रार्थना सभा सुरू केली होती. यातल्या एका प्रार्थनासभेत गांधीजी म्हणाले होते, गवताचे पातेही त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही. त्याच्या इच्छेशिवाय म्हणजे पांडुरंगाच्या, ईश्वराच्या ईच्छेशिवाय. विख्यात विचारवंत टॉलस्टॉय यांच्या ‘द किंगडम ऑफ गॉड विदीन यू’ या ग्रंथाचा फार मोठा प्रभाव आणि परिणाम गांधीजींच्या एकूण भूमिकेमधे झालेला होता. आणि त्यामुळे ईश्वराच्या प्रार्थनेबद्दलचे त्यांचे विचार देखील त्या पद्धतीने आपल्याला विकसित झालेले लक्षात येतात आणि त्यामुळे गांधीजी नेहमी असं म्हणायचे की, आयुष्यातील प्रत्येक क्षणाला मला ईश्वराच्या अस्त्तिवाची जाणीव होत असते. प्रत्येक मानवी हृदय ईश्वराचं घर आहे आणि म्हणूनच प्रत्येक हृदय हे ईश मंदिर आहे. अगदी टॉलस्टॉयनं जसं सांगितलं त्याच पद्धतीची भूमिका गांधीजींच्या या ईश्वराच्या प्रार्थनेच्या संदर्भातल्या विवेचनामधे आपल्याला पाहायला मिळते.

****

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर मराठा आरक्षणाची जबाबदारी टाकून महाविकास आघाडीतल्या इतर दोन पक्षांनी त्यांना अपेक्षित सहकार्य केलं नाही, असा आरोप केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ते काल जालना इथं बोलत होते. राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू योग्य पध्दतीनं न मांडल्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, असं दानवे म्हणाले. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडायला हवी होती, असं मत दानवे यांनी व्यक्त केलं.

****

राज्यात काल १५ हजार ५९१ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या १४ लाख १६ हजार ५१३ झाली आहे. काल दिवसभरात एकूण ४२४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे राज्यात या संसर्गानं मृत पावलेल्यांची संख्या ३७ हजार ४८०एवढी झाली आहे. आतापर्यंत ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण यातून बरे होऊन घरी गेले आहेत तर सध्या दोन लाख ६० हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ३२ बाधितांचा मृत्यू झाला तर एक हजार ८८ नवे बाधित रुग्ण आढळले.

लातूर जिल्ह्यात नऊ बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर २१५ नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यात काल प्रत्येकी सहा बाधितांचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात १६९ तर नांदेड जिल्ह्यात १५८ नवे बाधीत रूग्ण आढळले. बीड जिल्ह्यात काल चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर दोनशे नवे रुग्ण आढळले. जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी तीन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर जालना ११८ आणि परभणी जिल्ह्यात ४६ नवे बाधित रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधिताचा मृत्यू झाला आणि नव्या २४ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातही काल १५८ नव्या कोरोना विषाणू बाधितांची काल नोंद झाली.

****

पुणे जिल्ह्यात दोन हजार ५७१ नवे रुग्ण आढळले तर ८९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबईत दोन हजार ४४० नवे रुग्ण आढळले आहेत तर ४२ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये ९२५ नवे रुग्ण आढळले तर २८ जणांचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात ४९७ नवे रुग्ण आढळले तर ११ जणांचा मृत्यू झाला. अमरावती १८६, बुलडाणा १०९, भंडारा १३९, गडचिरोली १०५, गोंदिया ७३, सिंधुदुर्ग ६४, रत्नागिरी ६७, यवतमाळ ९८, तर अहमदनगर जिल्ह्यात काल २१० नवे रुग्ण आढळले.

****

बीड जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेला द्रवरुप प्राणवायू प्रकल्प काल गांधी जयंतीपासून कार्यान्वीत करण्यात आला. प्रतिदिन सहा लाख लीटर प्राणवायू निर्मिती क्षमता असलेला हा जिल्ह्यातला तिसरा प्रकल्प आहे. जिल्ह्यात लोखंडी सावरगाव इथं एक हजार रुग्णखाटांचं कोविड केंद्र आणि अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात याच क्षमतेचे प्राणवायू प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्यामुळे दररोज १८ लाख लीटर प्राणवायू निर्मिती होणार असल्यानं, वैद्यकीय उपचारांच्या प्राणवायूबाबतीत बीड जिल्हा आत्मनिर्भर होईल, असा विश्वास जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी वर्तवला आहे.

****

औरंगाबाद इथले हिमरू नक्षीकामाचे आधुनिक प्रणेते अहमद कुरेशी यांना यंदाचा ‘स्वातंत्र्यसैनिक अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. २६ ऑक्टोबर रोजी अनंतरावांच्या पुण्यतिथीला छोटेखानी कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अनंत भालेराव स्मृती प्रतिष्ठानच्या कार्यवाह डॉ. सविता पानट यांनी दिली. ५० हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ७८ वर्षांचे अहमद कुरेशी यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासूनच हिमरू विणकाम क्षेत्रात काम करायला सुरवात केली. अजिंठा लेण्यांतील कमळचित्रांना त्यांनी पहिल्यांदा हिमरू शैलीत आणून ही कलात्मक शैली लोकप्रिय केली आहे.

****

परभणीच्या विकासासाठी भरीव निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. परभणीचे आमदार डॉ. राहूल पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेवून परभणीच्या विविध विकास कामांसंदर्भात चर्चा केली, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली. केवळ अतिवृष्टीग्रस्त गावांचे पिक पंचनामे न करता सरसकट सर्व गावातील पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणीही यावेळी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

****

राज्य सरकारने आठवडाभरात ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सततच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून, बागायती शेतीला हेक्टरी ५० हजार रुपये तर कोरडवाहू शेतीला हेक्टरी २५ हजार रुपये मदत करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, दरेकर यांनी काल फुलंब्री तसंच कन्नड परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची काल पाहणी केली. पीक नुकसानाचे पंचनामेही केले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, दरेकर यांनी, राज्यातलं महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.

****

अत्यावश्यक वस्तू कायद्यातल्या त्रुटींमध्ये सुधारणा करुन शेतकऱ्यांना संपूर्ण स्वातंत्र्य देण्याची विनंती शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या संबंधीचं निवेदन औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यामार्फत काल प्रशासनाला सादर करण्यात आलं. अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेतून वगळलेल्या शेतमालाचे दर पुन्हा ठराविक पातळीपेक्षा जास्त वाढल्यास, ती पिके पुन्हा या कायद्याच्या कक्षेत घेण्याबाबत केलेली तरतूद ही, सुधारणा विधेयकांच्या हेतूशी विसंगत आहे, असं या निवेदनात म्हटलं आहे.

****

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात सामुहिक प्रतिज्ञा घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनं केलं आहे. या अनुषंगाने सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, आस्थापनांनी कार्यालय स्तरावर ६ तारखेला सकाळी ११ वाजता प्रतिज्ञा घ्यावी. यामध्ये खासगी संस्था, नागरिकांनी देखील नियोजित वेळेस कार्यालय, घर किंवा इतर ठिकाणाहून सहभागी होऊन प्रतिज्ञा घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे.

****

No comments:

Post a Comment