▼

Tuesday, 20 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.10.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 October 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० ऑक्टोबर २०२० दुपारी १.०० वा.

****

देशाचा कोविड संसर्गमुक्तीचा दर ८८ पूर्णांक ६३ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात देशभरात ६९ हजार ७२० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले, यामध्ये सर्वाधिक १५ हजारावर संसर्गमुक्त झालेले रुग्ण महाराष्ट्रातले असल्याचं, आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत ६७ लाखापेक्षा अधिक रुग्ण कोविड संसर्गातून यशस्वीरित्या बरे झाले आहेत. सध्या देशात कोविडचे साडे सात लाख सक्रीय रुग्ण आहेत. ही संख्या एकूण बाधित रुग्णांच्या तुलनेत ९ पूर्णांक ८५ शतांश टक्के असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३६ हजार ६८९ झाली आहे. यापैकी ३३ हजार ७८२ रुग्ण संसर्गमुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण एक हजार ३६ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला असून, सध्या एक हजार ८७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

शासकीय अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचून पाहणी करावी, असं, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. ते आज बीड जिल्ह्यात सावरगाव इथं अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर बोलत होते. पंचनाम्यांसंदर्भात जिल्हाधिकारी तसंच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचं आवाहन त्यांनी केलं. शेतकरी हा आपला केंद्रबिंदू असून, त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. केंद्र तसंच राज्य सरकारनेही राजकारणाच्या पलिकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करावी, रबी पिकासाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणं आवश्यक असल्याचं, संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केलं.

****

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पावसामुळे खरडून गेल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या शेतातल्या विहिरीत गाळ साचलेला आहे, तसंच इलेक्ट्रिक पंप किंवा इरिगेशन संचाचं नुकसान झालं आहे, या नुकसानीसाठी वेगळ्या विशेष योजना तयार करण्याची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता बळीराजाला पंचनामे न करता तत्काळ दिलासा देण्यासाठी इच्छाशक्तीची गरज हवी असं फडणवीस यांनी नमूद केलं.

दरम्यान, फडणवीस यांनी उस्मानाबाद तालुक्यात बेगडा इथं नुकसान झालेल्या सोयाबीनची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तुळजापूर तालुक्यात अपसिंगा इथं अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची तसंच काक्रंबा इथं अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेत पिकांची पाहणी केली, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत, सरकारला मदत करायला भाग पाडू असं आश्वासन दिलं.

फडणवीस आज लातूर, बीड तसंच परभणी जिल्ह्यातही अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. तुळजापूर तालुक्यात काटगाव, अपसिंगा, इथल्या पडझड झालेल्या घरांची तसंच शेतपिकांच्या नुकसानाची मुख्यमंत्री पाहणी करूप ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. दुपारी बारा वाजेनंतर ते तुळजापूर शासकीय विश्रामगृह इथं पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत एकूण ४ लाख ७१ हजार ८१२ हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचं नुकसान झालं आहे. सुमारे ७ लाख १९ हजार ३५१ शेतकऱ्यांना या नुकसानाचा फटका बसला आहे. पीक नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ३२१ कोटी रूपयांची मागणी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने शासनाकडे केली आहे. जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी आज ही माहिती दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

खरीप वितरण हंगाम २०२०-२१ साठी राज्यांकडून केंद्रानं धान्याची खरेदी वेगानं सुरू केली आहे. आतापर्यंत सात लाख ८२ हजार शेतकऱ्यांकडून ९० लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक धान्याची खरेदी करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र, तमिळनाडू आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांकडून पाच कोटी ४८ लाख रूपयांच्या किमान आधारभूत किंमतीत मूग आणि उडिदाची खरेदी करण्यात आल्याचं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

सण उत्सवांच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे ५० विशेष गाड्या सोडणार आहे. यामध्ये मुंबई - गोरखपूर, पुणे - निजामुद्दीन, मडगाव – नागपूर - मडगाव, लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर या गाड्यांचा समावेश आहे. फक्त कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना रेल्वेत बसताना, प्रवासादरम्यान तसंच गंतव्यस्थानी उतरल्यावर कोविड संबंधी नियमांचं पालन करणं आवश्यक असेल.

****

No comments:

Post a Comment