▼

Wednesday, 21 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.10.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 October 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप कायम, प्रतिबंधात्मक उपायांचं जबाबदारीनं पालन करण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन.

·      उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पाहणी करणार.

·      वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून औरंगाबाद, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उस्मानाबाद, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी.

·      राज्यात आणखी आठ हजार १५१ कोविड बाधितांची नोंद, २१३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      मराठवाड्यात २२ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या ६६० रुग्णांची नोंद.

आणि

·      मास्कच्या किमती निश्चित, राज्य सरकारनं जारी केला आदेश.

****

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपला आहे असा गैरसमज करुन न घेता, प्रतिबंधात्मक उपायांचं जबाबदारीनं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला केलं आहे. आगामी दसरा, दिवाळी, ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर ते काल देशवासियांना संबोधित करत होते. काही लोक सुरक्षा उपायांच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

मेरे प्यारे देशवासियों, लॉकडाऊन भले ही चला गया हो, वायरस नही गया। कई लोगों नें अब सावधानी बरतना या तो बंद कर दिया है, या बहोत ढिलाई लिया है। ये बिलकुल ठिक नहीं। अगर आप लापरवाही बरत रहे हैं, बिना मास्क के बाहर निकल रहे हैं, तो आप अपने आप को, अपने परिवार को, अपने परिवार के बच्चों को, बुजुर्गों को उतने ही बडे संकट मे डाल रहे है। दो गज की दुरी, समय समय पे साबुन से हाथ धोना और मास्क लगाना इसका ध्यान रखें।

देशात या विषाणूच्या संसर्गावर उपचारासाठी अनेक लसींवर संशोधन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या प्रत्येक नागरिकाला सणांचा आनंद घेता आला पाहिजे, असं आपल्याला वाटतं, त्यामुळे जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत कोणताही निष्काळजीपणा न दाखवता, काळजी घेण्याचं आवाहन, पंतप्रधानांनी यावेळी केलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पाहणी करणार आहेत. तुळजापूर तालुक्यात काटगाव, अपसिंगा, इथल्या पडझड झालेल्या घरांची तसंच पिकांच्या नुकसानाची मुख्यमंत्री पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. दुपारी बारा वाजेनंतर ते तुळजापूर शासकीय विश्रामगृह इथं पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

****

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल औरंगाबाद, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या मुरमा आणि औरंगाबाद तालुक्यातल्या पिंपळगाव या ठिकाणी बांधावर जाऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. शासन नियमानुसार नुकसान भरपाई देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.  

जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या आंतरवाली सराटी या गावातही देशमुख यांनी काल पिकांची पाहणी केली.

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी तसंच कोविड-19 संसर्गाचा त्यांनी आढावा घेतला. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा, त्याचबरोबर कोविड-19 च्या संदर्भाने उपचार आणि जनजागृती करताना दुर्लक्ष होऊ नये, असे निर्देश देशमुख यांनी यावेळी दिले.

****

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल उस्मानाबाद, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

फक्त पिकाच्या नुकसानीची भरपाई न देता खरडून गेलेल्या शेत जमिनीची ही नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलताना केली. मदतीचे नियम काय आहेत, या पेक्षा शेतकऱ्याला मदत करण्यासाठी कोणत्या प्रकारचे नियम आणि अटी करता करता येतील, त्या करून तत्काळ मदत करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

लातूर इथं वार्ताहरांशी बोलताना फडणवीस यांनी, शेतकऱ्यांना बियाणे देण्यासाठी बियाणे महामंडळाची सोडत पद्धत अत्यंत चुकीची असून, सातबारा असेल त्या शेतकऱ्याला बियाणं दिलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं.

परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या निळा इथंही त्यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

तत्पूर्वी काल सकाळी फडणवीस यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी केली. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पावसामुळे खरडून गेल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या शेतातल्या विहिरीत गाळ साचलेला आहे, तसंच इलेक्ट्रिक पंप किंवा सिंचन संचाचं नुकसान झालं आहे, या नुकसानीसाठी वेगळ्या विशेष योजना तयार करण्याची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले.

****

अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. दरेकर यांनी काल सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी केली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी नुकसानग्रस्त बळीराजाला हेक्टरी २५ हजार ते ५० हजार रुपयांची मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची त्यांनी पूर्तता करावी, भाजपचीही हीच मागणी आहे, असंही दरेकर म्हणाले.

****

तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांनी टाळाटाळ न करता तात्काळ सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत. उस्मानाबाद तालुक्याच्या जुनोनी परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकरी, तसंच ग्रामस्थांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. राज्यशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यांनी खचून जाऊ नये, असं ते म्हणाले. या भागात अतिवृष्टीमुळे पूर्णतः वाहून गेलेले रस्ते तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना सत्तार यांनी प्रशासनाला केल्या.

****

शासकीय अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचून पाहणी करावी, असं, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. ते काल बीड जिल्ह्यात सावरगाव इथं अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर बोलत होते. पंचनाम्यांसंदर्भात जिल्हाधिकारी तसंच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचं आवाहन त्यांनी केलं.

****

राज्यातल्या ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास आपण रस्त्यावर उतरु असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिला आहे. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे आणि जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मुंडे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली पाहिजे, त्यामध्ये कोणताही भेदभाव, वर्गवारी होता कामा नये, असं त्या म्हणाल्या. मुंडे यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या काही गावांनाही भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

****

सप्टेंबर अखेरपर्यंत राज्याच्या हक्काचे वस्तु आणि सेवा कर परताव्याचे ३० हजार कोटी रुपये केंद्र सरकारनं तातडीनं देण्याची मागणी महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राज्य सरकारनं पगार आणि इतर दैनंदीन खर्चासाठी लागणारा ५५ हजार कोटींचा निधी कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारला असून कोरोना विषाणूमुळे महसूलही कमी झाला आहे. महाराष्ट्र हे केंद्र सरकारला सर्वात जास्त कर देते, मात्र राज्याला मदत करताना केंद्राकडून हात आखडता घेतला जातो, असं ते म्हणाले.

****

महिलांच्या तक्रारींप्रकरणात तातडीनं लक्ष घालून सुनावणीसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक होणं आवश्यक असल्याचं मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होत्या. राज्यातल्या महिलांशी संबंधित प्रकरणांमध्ये सुनावणीसाठी शर्मा गेल्या दोन दिवसांपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. कोविड सेंटर मध्ये लैंगिक अत्याचार, विनयभंग, तसंच छेडछाडीची ११ प्रकरणं केंद्रीय महिला आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती, त्याअनुषंगाने माहिती घेऊन, अशा घटना रोखण्यासाठी राज्याच्या प्रमाणित कार्यपद्धतीसोबतच अन्य उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी होणं आवश्यक असल्याचं, शर्मा यांनी नमूद केलं.

****

राज्यात गेल्या काही महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितले रस्ते आणि पुलांच्या नुकसानीचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल आढावा घेतला. अतिवृष्टी आणि पुरामुळे वाहून गेलेले रस्ते आणि पुलांची कामं तातडीनं सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

****

राज्यात काल दिवसभरात आणखी आठ हजार १५१ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख नऊ हजार ५१६ झाली आहे. राज्यभरात काल २१३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४२ हजार ४५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल सात हजार ४२९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १३ लाख ९२ हजार ३०८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ७४ हजार २६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल २२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ६६० रुग्णांची नोंद झाली.

बीड जिल्ह्यात सात रुग्णांचा मृत्यू, तर नवे ८५ रुग्ण, औरंगाबाद जिल्ह्यात सहा बाधितांचा मृत्यू, तर नवे १५६ रुग्ण, लातूर जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू, तर नवे १०७ रुग्ण आढळले. नांदेड आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, नांदेड जिल्ह्यात नव्या १११ तर जालना जिल्ह्यात ९६ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात ६८, तर परभणी जिल्ह्यात आणखी २५ रुग्णांची भर पडली. हिंगोली जिल्ह्यात नव्या १२ रुग्णांची नोंद झाली.

****

मुंबईत आणखी एक हजार ९१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४५ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ७४५ नवे रुग्ण, तर ३६ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ४३४ नवे रुग्ण आढळले, तर तीन जणांचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात १६३, गडचिरोली १३४, जळगाव १३०, अमरावती ७८, यवतमाळ ४८, वाशिम ३२, सिंधुदुर्ग २८, तर रत्नागिरी जिल्ह्यात आणखी नऊ बाधितांची नोंद झाली.  

****

राज्य सरकारने मास्कच्या किमती निश्चित केल्या असून, त्याबाबतचा निर्णय काल जाहीर केला. राज्यात आता एन ९५ मास्क, १९ ते ४९ रुपयांना मिळणार आहे, तर दुहेरी आणि तिहेरी पदर असलेले मास्क तीन ते चार रुपयांना मिळतील, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. विविध दर्जाच्या मास्कची निश्चित केलेली कमाल किंमत साथरोग कायदा लागू असेपर्यंत कायम राहतील, असं त्यांनी सांगितलं.

****

दसरा-दिवाळी सणांच्या अनुषंगानं मिठाईच्या डब्यांवर दर्शनी भागावर मिठाई वापराची अंतिम मुदत स्पष्ट लिहिण्याचे निर्देश देण्यात आले असून, एक ऑक्टोबरपासून लागू झालेल्या या निर्देशानुसार, औरंगाबाद जिल्ह्यातल्या जवळपास ५० मिठाई उत्पादकांची तपासणी करण्यात आली. यापैकी काही दुकानदारांना सुधारणेची नोटीस देण्यात आली असल्याचं, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सह-आयुक्त मिलिंद शहा यांनी सांगितलं. या उपरही दुकानदारांनी सुधारणा न केल्यास, अन्न मानके कायद्यानुसार कारवाईचा इशारा शहा यांनी दिला.

****

धुळे - सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात ट्रॅव्हल्सची बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर ३० ते ३५ जण जखमी झाले. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. ही बस जळगाव वरुन सुरत कडे जात होती.

****

शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर इथं काल ललिता पंचमीनिमित्त श्री तुळजाभवानी देवीची रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. आज देवीची मुरली अलंकार महापूजा बांधण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

कोरोना विषाणू प्रतिबंधाचे नियम पाळण्याचं आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

****

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आठ दिवसांत मदत न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते काल उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात नुकसानीची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. रबी पेरणीसाठी तातडीने पंचनामे न करता हेक्टरी पंचवीस हजार रुपये द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

****

परभणी जिल्ह्यात कोविडग्रस्तांची संख्या समाधानकारकरित्या कमी होत आहे. जिल्ह्यातल्या नऊ कोविड केंद्रात सध्या एकही रुग्ण नसून, १५ रुग्णालयांमध्ये नऊपेक्षा कमी रुग्ण आहेत. सध्या जिल्ह्यात २६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिलेल्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या बामणी शाखा अंतर्गत विजेच्या तारेवर आकडे टाकून वीज वापरणाऱ्या २१९ ग्राहकांविरुध्द काल कारवाई करण्यात आली.

****

हवामान, येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, कोकण, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याचबरोबर संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

****

No comments:

Post a Comment