▼

Wednesday, 18 November 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 November 2020 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 November 2020

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ नोव्हेंबर २०२० सकाळी ७.१० मि

****

** उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आणि विद्यापीठांनी भारताला ज्ञान आणि नवसंकल्पनांचे केंद्र बनवावं- उप राष्ट्रपतींचं आवाहन 

** जमिनीवरून आकाशात मारा करू शकणाऱ्या स्वयंचलित यंत्रणेची यशस्वी चाचणी

** कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्रातला लढा देशाला दिशादर्शक- काँग्रेस प्रभारी एच के पाटील

** औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून दहा उमेदवारांची माघार; निवडणुकीच्या रिंगणात ३५ उमेदवार

** मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत आठ कोविडग्रस्तांचा मृत्यू तर नव्या ३२६ रुग्णांची नोंद

आणि

** अतिवृष्टीग्रस्त मोठ्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत द्यावी- आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची मागणी

****

उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आणि विद्यापीठांनी भारताला ज्ञान आणि नवसंकल्पनांचे केंद्र बनवावं, असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल आगरतळा इथल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या १३व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करत होते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक संशोधन करून, उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये सहकार्याची गरज उपराष्ट्रपतींनी नमूद केली. ग्रामीण भागातील जीवनामध्ये असलेली आव्हानं समजून घेण्यासाठी, विद्यार्थ्यांनी काही काळ खेड्यात वास्तव्य करावं, तसंच शेती व्यवसाय व्यवहार्य आणि किफायतशीर बनवण्यासाठी कार्य करण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी केलं.

****

पंधराव्या वित्त आयोगाचा २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षांसाठीचा अहवाल आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह यांच्या पथकानं काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सुपूर्द केला. अर्थमंत्री हा अहवाल आणि त्याबाबत सरकारनं केलेली कार्यवाही संसदेत सादर करतील. चार खंडात असलेल्या या हा अहवालात पहिल्या आणि दुसऱ्या खंडात मुख्य अहवाल आहे. तिसऱ्या खंडात केंद्र सरकार समोर असलेली आव्हानं आणि भविष्यातल्या योजनांचा उल्लेख, तर चौथ्या खंडात राज्यांचा उल्लेख आहे. आयोगानं प्रत्येक राज्याच्या आर्थिक स्थितीचा बारकाईनं अभ्यास केला असून, तिथल्या परिस्थितीनुसार राज्यांना सूचना केल्या आहेत. 

****

जमिनीवरून आकाशात मारा करू शकणाऱ्या क्विक रिॲक्शन क्षेपणास्त्र यंत्रणेची काल ओडिशात चांदीपूर इथं यशस्वी चाचणी घेण्यात आली. या स्वयंचलित यंत्रणेने आकाशातून उडणाऱ्या मानवरहित लक्ष्याचा अचूक वेध घेतला. तेरा नोव्हेंबरला या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात या यंत्रणेतल्या रडार आणि अन्य यंत्रणेची चाचणी घेण्यात आली होती, काल दुसऱ्या टप्प्यातल्या चाचणीत यंत्रणेनं अचूक लक्ष्यभेद केला. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी या यशाबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे

****

समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोहचायला हवं असं मत केंद्रीय रस्ते आणि वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल पुण्यात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हिरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेत बोलत होते. भारताकडे शिक्षण क्षेत्रात पुढे जाण्याची पूर्ण क्षमता आहे, देशानं तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे, त्याचा वापर होणं गरजेचं असल्याचं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं.

****

केंद्रीय लोकसेवा आयोग - यूपीएससीच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतल्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन आणि १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण २६ हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी काल ही माहिती दिली. अनुसूचित जमातीमधल्या विद्यार्थ्यांचं प्रशासकीय सेवेत प्रमाण वाढावं, यासाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य योजना सुरू करण्यात आली असल्याचं पाडवी यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत यूपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीची तयारी करणाऱ्या २५ अशा ५० उमेदवारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. सन २०२०-२१ पासून ही योजना लागू होणार असून, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत अनुसूचित जमातीतल्या पात्र विद्यार्थ्यांची निवड करून थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार असल्याचं पाडवी यांनी सांगितलं.

****

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधातला महाराष्ट्रातला लढा देशाला दिशादर्शक ठरला असल्याचं, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी म्हटलं आहे. कृषी कायद्यांच्या विरोधातल्या लढ्यात पक्षाने स्वाक्षरी मोहीम राबवली. याअंतर्गत ६० लाख शेतकरी, शेतमजुरांच्या सह्या असलेलं निवेदन काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पाटील यांच्याकडे सोपवलं, त्यावेळी ते बोलत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात सह्यांची मोहीम आतापर्यंत कोणत्याही पक्षानं राबवली नाही, असं पाटील यावेळी म्हणाले. देशभरातल्या शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन १९ नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे देण्यात येणार आहे. हे कायदे रद्द होईपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरुच राहणार असल्याचं थोरात यांनी यावेळी सांगितलं.

****

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गा विषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी केलं आहे.

****

राज्यातले नागपूर, औरंगाबाद आणि पुणे हे पदवीधर मतदार संघ, तसंच अमरावती आणि पुणे या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत काल संपली. औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून ४५ उमेदवारांपैकी दहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ३५ उमेदवारांमध्ये ही निवडणूक होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे शिरीष बोराळकर, महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण, समाजवादी पक्षाचे अब्दुल रऊफ, राष्ट्रीय मराठा पार्टीचे अंकुश पाटील, अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादुल मुसलमिन - एमआयएमचे कुणाल खरात, प्रहार जनशक्ती पक्षाचे सचिन ढवळे, वंचित बहुजन आघाडीचे नागोराव पांचाळ यांचा समावेश आहे.

 

नागपूर पदवीधर मतदार संघातून काल सात जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता या मतदार संघात भाजपचे उमेदवार नागपूरचे विद्यमान महापौर संदीप जोशी आणि कॉंग्रेसचे उमेदवार विधीज्ञ  अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. 

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एका उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यामुळे २८ पैकी २७ उमेदवार कायम आहेत. 

पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत १६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता ६२ उमेदवार रिंगणात आहेत. तर पुणे शिक्षक मतदारसंघात १५ जणांनी अर्ज मागे घेतल्यानं आता ३५ उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी येत्या एक डिसेंबरला मतदान होईल, तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

****

माजी केंद्रीयमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यत्वाचा तसंच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा पाठवला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा पारंपारिक मतदार संघ असल्यानं तो पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची इच्छा होती, मात्र पक्षाने उमेदवारी नाकारल्यानं राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबियांसोबत दादर इथल्या शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेकांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली.

औरंगाबाद इथं विविध ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आलं, तसंच सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते दृष्टीहीन आणि दिव्यांगांना अन्न धान्याचं तसंच तीन चाकी सायकलचं वाटप करण्यात आलं.

****

राज्यात काल आणखी दोन हजार ८४० कोविड बाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १७ लाख ५२ हजार ५०९ झाली आहे. काल ६८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४६ हजार १०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल पाच हजार १२३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख २३ हजार ५०३ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ८१ हजार ९२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ६४ इतका आहे.  

****

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३२६ रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद, परभणी तसंच लातूर जिल्ह्यात, काल, प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात काल ११४ नवे रुग्ण, लातूर १८ , परभणीत १०, जालना १७, तर नांदेड जिल्ह्यात, काल नवे ३२ रुग्ण आढळले.

बीड जिल्ह्यात, गेल्या दोन दिवसांत, चार रुग्णांचा मृत्यू झाला तर नव्या १११ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात, गेल्या दोन दिवसांत, एका रुग्णाचा मृत्यू तर २४ नव्या रुग्णांची नोंद झाल्याचं, आरोग्य विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे.

****

अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या राज्यातल्या मोठ्या शेतकऱ्यांनाही सरकारनं आर्थिक मदत करावी, अशी मागणी उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सरकारनं जाहीर केलेल्या मदतीतून मोठ्या शेतकऱ्यांना वगळण्यात आलं आहे. या शेतकऱ्यांना मदती पासून वंचित ठेवू नये, खरवडून गेलेल्या शेतजमिनीची दुरुस्ती शासकीय योजनेतून करावी तसंच यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी भरपाई देण्याची मागणी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

****

परभणी जिल्ह्यात आशिया खंडातली पहिली सौर उर्जा सक्षम कापड गिरणी लवकरच उभारण्यात येणार आहे. जय भवानी महिला सहकारी वस्त्रोद्योग मिल या तीस एकर क्षेत्रात पसरलेल्या गिरणीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, तसंच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. परभणी जिल्हा कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो, त्यामुळे या जिल्ह्याला विशेष लाभ मिळणं शक्य होणार असल्याचं, या कापड गिरणीच्या अध्यक्ष डॉ. संप्रिया पाटील यांनी म्हटलं आहे.

****

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे यांनी नागरिकांना कोविडपासून बचावासाठी त्रिसुत्रींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

****

बुलडाणा जिल्ह्याच्या शेगाव इथल्या संत गजानन महाराजांचं मंदीर कालपासून दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. भाविकांना ई-पास घेऊनच दर्शन घ्यावं लागणार आहे. मंदिरात भाविकांनी गर्दी करू नये, तसंच दर्शनासाठी येत असतांना शासनाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, असं आवाहन संस्थानकडून करण्यात आलं आहे.

****

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरात आजपासून एका तासात दोन हजार भाविकांना विठ्ठलाचं मुखदर्शन घेता येणार आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी ही माहिती दिली

****

नांदेड - पनवेल - नांदेड उत्सव विशेष रेल्वे गाडीला आणखी आठ दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागणीवरुन ही मुदतवाढ दिल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****

 

No comments:

Post a Comment