Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 November 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
·
येणाऱ्या
काही महिन्यात नागरीकांना कोविड १९ लस उपलब्ध होईल - केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन
यांचा विश्वास
·
पंढरपूरची
आगामी कार्तिकी वारी प्रतिकात्मक स्वरुपात साजरी व्हावी असा सोलापूरचे जिल्हाधिकारी
आणि पोलिस अधिक्षकांचा प्रस्ताव
· नांदेड जिल्ह्यात आज ३६ नवे
कोरोना विषाणू बाधित रुग्ण
आणि
·
परभणी
आणि नांदेड जिल्ह्यात जागतिक शौचालय दिनानिमित्त विविध उपक्रम
****
येणाऱ्या काही महिन्यात नागरीकांना
कोविड १९ लस उपलब्ध होईल, असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी
व्यक्त केला आहे. भारतीय उद्योग आणि वाणिज्य महासंघ - फिक्कीनं आयोजित केलेल्या एका
कार्यक्रमात ते आज बोलत होते. लसीच्या वितरणासाठी दिशानिर्देश तयार करण्याचं काम सुरु
असल्याचं ते म्हणाले. सुरवातीला कोरोना योद्ध्यांना, आणि त्यानंतर ६५ वर्षांवरील नागरीकांना
ही लस दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. पुढच्या वर्षी जुलै किंवा ऑगस्ट पर्यंत या
लसीचे ४० ते ५० कोटी डोस तयार होतील, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
****
जागतिक शौचालय दिन आज पाळण्यात
येत आहे. सर्वांना शौचालय यासाठी भारताचा दृढसंकल्प
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. कोट्यावधी भारतीयांसाठी गेल्या काही वर्षापासून शौचलाय आणि स्वच्छता
व्यवस्था निर्माण करण्याचं अद्भुत कार्य आपण पहिलं, याद्वारे मोठ्या प्रमाणात
आरोग्य लाभ आणि नारी शक्तीस सन्मान प्राप्त झाला असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
राज्याची
आर्थिक परिस्थिती खरोखरच बिकट असून, ही वस्तुस्थितीदेखील लक्षात घेतली पाहिजे, असं
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक
इथं वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसच्या मंत्र्यांकडील खात्यांना पुरेसा निधी दिला
जात नाही असा आक्षेप काही मंत्र्यांनी घेतला असल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
आपण यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून, यासंदर्भातल्या
त्रुटी लवकरच दूर होतील, असं ते म्हणाले. टाळेबंदी काळातलं वाढीव वीज बिल माफ करण्याबाबत
मागणी केली जात असली तरी, त्यासाठी राज्याच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार करावा लागेल,
असंही थोरात यावेळी म्हणाले.
****
पंढरपूरची
आगामी कार्तिकी वारी प्रतिकात्मक स्वरुपात साजरी व्हावी, मानाच्या दिड्यांनी पंढरीकडे
मार्गस्थ होऊ नये, असा प्रस्ताव सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांनी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. पांडूरंगाचे धार्मिक विधी पंरपरेनुसार पार पडतील,
मात्र वारकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून संबंधित यंत्रणांना त्यानुसार आदेश द्यावेत,
असं त्यांनी म्हटलं आहे. मंदिर समितीच्या ठरावावर प्रातांधिकाऱ्यांनी अभिप्राय देत
तो प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना पाठवला, त्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे
हा प्रस्ताव सादर केला. आठ महिन्यांपासून श्री विठ्ठल- रूक्मिणी मंदिर बंद असल्यानं
यंदा कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी होईल, त्या गर्दीत वयस्क भाविकांना
श्वास घेण्यास अडचणी येतील, दर्शन रांगेत तथा वाळवंटात, मठात वारकऱ्यांची गर्दी होऊन
सामाजिक अंतराचं पालन होऊ शकणार नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान,
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे वारकऱ्यांनी वारीदिवशी पंढरपुरात गर्दी न करता इतरवेळी
टप्प्याटप्याने दर्शनासाठी यावं, आता स्वत:च्या घरी तथा गावातच वारी साजरी करावी, असं
आवाहन प्रातांधिकारी सचिन ढोले यांनी केलं आहे.
****
तर
दुसरीकडे, राज्य सरकारने आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिकी यात्रा रद्द केल्यास आगामी काळात
होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीच्या मतदानावर बहीष्कार टाकण्याचा इशारा वारकरी संप्रदायानं
दिला आहे. केंद्र आणि राज्य शासनाने घालून दिलेले नियम तसंच वारकरी संप्रदायाने यात्रा
नियोजनासंदर्भात राज्य शासनाला दिलेला प्रस्ताव या दोन्हीच्या समन्वयातून कार्तिकी
यात्रेचं नियोजन केलं जावं, अशी वारकरी संप्रदायाची मागणी आहे. कार्तिकी यात्रेसंदर्भात
सर्वसमावेशक अशी एकच भूमिका मांडण्यासाठी संत वंशज, प्रमुख वारकरी संघटना आणि महाराज
मंडळी यांचा एकत्रित समावेश असणारी ‘कार्तिकी यात्रा समन्वय समिती’ स्थापन करण्यात
आली आहे.
****
कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवहन लातूरचे महापौर
विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे.
****
माजी
पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आज त्यांच्या एकशे तिनाव्या जयंतीनिमित्तानं सर्वत्र
अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विट संदेशातून अभिवादन
केलं.
मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन केलं. यावेळी त्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथही दिली.
औरंगाबादचे
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी इंदिरा गांधी यांना अभिवादन करुन उपस्थितांना राष्ट्रीय
एकात्मतेची शपथ दिली.
****
दिवाळीच्या
सुट्टीनंतर सात दिवसांनी उघडलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये
आज कांद्याला चांगला भाव मिळाला. गेल्या आठवड्यात दिवाळी मुळे बाजार बंद झाले तेव्हा
तीन हजार ६०० रुपये क्विंटल दर असलेल्या उन्हाळ कांद्याला आज सरासरी चार हजार रुपये
भाव मिळाला. तर कमी आवक असलेल्या नव्या लाल कांद्याच्या दरातही हजार रुपयांनी वाढ झाली
त्यामुळे या कांद्याला चार हजार १०० रुपये भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीत उन्हाळ
कांद्याच्या दरात क्विंटलला ४००, तर लाल कांद्याच्या दरात हजार रुपयांनी वाढ झाली.
दिवाळीनंतर कांद्याची मागणी पुन्हा वाढल्यानं दरात वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज नव्याने ३६ कोरोनाविषाणू बाधीत रूग्ण आढळून आले.
जिल्ह्यात आता एकूण १९ हजार ७७३ बाधीतांची संख्या झाली आहे. बरे झालेल्या ४३
रूग्णांना आज घरी सोडण्यात आलं. आजपर्यंत एकूण १८ हजार ७८२ रुग्ण बरे झाले असून,
सध्या २५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
धुळे
जिल्ह्यात कोविड १९ ची साथ आटोक्यात येत असून, सलग दोन आठवड्यापासून एकही रुग्णाचा
मृत्यू झालेला नाही. तसंच नवीन रुग्ण वाढ देखील मोठ्या प्रमाणात घटली आहे. धुळे जिल्ह्यात
१३ हजार २०३ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. तर आज आणखी १७ रुग्ण आढळले, जिल्ह्यात
एकूण बाधितांची संख्या आता १३ हजार ७५२ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ३७७ जणांचा या विषाणू
संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
****
भंडारा
जिल्ह्यात ८७, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी १२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले
****
परभणी
जिल्ह्यात जागतिक शौचालय दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये वैयक्तिक
शौचालयाची स्वच्छता राखणं, त्याचा नियमित वापर करणं, हातांची स्वच्छता, महिलांचं आरोग्य
चांगलं राखण्यासाठीचे प्रयत्न, असे विविध उपक्रम या माध्यमातून राबवण्यात आले. यासाठी
महिला बचत गट, आशाताई, अंगणवाडीताई, सरपंच आणि ग्रामसेवक आदी व्यक्तींच्या माध्यमातून
संवाद साधला जात आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या सर्व गावांमधून स्वच्छतेचे उपक्रम राबवण्यात आले.
नांदेड तालुक्यातल्या चिमेगाव इथं मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
यांनी शौचालयाची पाहणी करुन गावकऱ्यांशी संवाद साधला. निरोगी राहण्यासाठी नागरिकांनी नियमित शौचालयाचा वापर करणं
आवश्यक असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.
****
केंद्र सरकारनं अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पीएम किसान योजनेचा
फायदा अपात्र शेतकऱ्यांनी घेतल्याचं उघडकीस आलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या पाच
हजार २९२ शेतकऱ्यांना महसूल विभागाने एक कोटी पाच लाख रुपये वसुलीच्या नोटिसा
बजावल्या आहेत. तासगाव तालुक्यातल्या ६९ गावातून ४८ हजार ९४२ शेतकऱ्यांनी अर्ज
भरले होते, त्यापैकी चार हजार ७१३ करदाते, आणि ५३९ शेतकरी अपात्र ठरले. प्राप्त
अर्जाची पडताळणी केल्यानंतर अपात्र शेतकऱ्यांनीही पीएम योजनेचा फायदा घेतल्याचं
उघडकीस आलं आहे.
****
बुलडाणा
जिल्ह्यात आज अवकाळी पाऊस झाला. खामगाव तालुक्यात डोंगराळ भागात असलेल्या हिवरखेड,
घारोड, लोखंडा, इथं मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, तसंच शेगाव, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड
राजा, मोताळा, बुलडाणा याठिकाणीही दुपारी पाऊस झाला. हा अवकाळी पाऊस तुर पिकाला पोषक
असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
****////****
No comments:
Post a Comment