Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 November 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत
आढावा बैठक
** राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये
आजपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू, अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद
** भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी येत्या सहा डिसेंबरला अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी
न करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन
** वाढीव वीजबिल माफ केलं
जात नसल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज राज्यभर वीजबिल होळी आंदोलन
आणि
** औरंगाबाद जिल्ह्यात आज
एका कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा
बैठक घेणार आहेत. उद्या सकाळी दहा वाजता दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ही
बैठक होणार आहे. देशात कोरोनाचा विषाणूचा कहर सुरूच आहे. अनेक राज्यांत कोरोना विषाणूचं
संकट वाढताना दिसत असून, अनेक राज्यांनी संचारबंदी लागू केली आहे. काही राज्यांमध्ये
रुग्णसंख्या वाढत आहे. या सर्व बाबींवर उद्याच्या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.
****
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये
आजपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांची तपासणी करूनच शाळा महाविद्यालयांमध्ये
प्रवेश देण्यात आला.
जालना जिल्ह्यातल्या माध्यमिक
विभागाच्या ५२६ पैकी ४०९ शाळा आजपासून सुरू झाल्या. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा
अल्प प्रतिसाद मिळाला. शाळेत येणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींची शिक्षकांनी गेटवरच
हातांवर सॅनिटायझर देऊन थर्मलगन आणि ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करून आत प्रवेश दिला. वर्गातही
विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरानेच बसविण्यात आलं. दरम्यान, आजपर्यंत जिल्ह्यातल्या
चार हजार ९८४ शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची स्वॅब चाचणी करण्यात आली असून,
त्यापैकी ४८ शिक्षक तर ८ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं
आहे. दरम्यान, शाळांना आज मिळालेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी असला तरी आठवडाभरात
विद्यार्थ्यांची संख्या निश्चित वाढेल, असं माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी
सांगितलं.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
४९१ शाळेतल्या ७० शिक्षकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर खबरदारी घेत शाळा सुरू
झाल्या. शाळेत विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर
चा वापर करून आणि पुरेसे अंतर राखून ज्ञानदान करणं सुरू झालं आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड आणि शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांनी आज वाशी,
भूम आणि येडशी इथल्या शाळांना भेट देऊन, शाळा सुरू करण्याच्या अनुषंगानं कामकाजाची
पाहणी केली.
लातूर जिल्ह्यातल्या बहुतांश
शाळा सुरू झाल्या असल्याचं माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकरंडे यांनी सांगितलं.
कनिष्ठ महाविद्यालयात दयानंद महाविद्यालयाने प्रत्यक्ष वर्ग सुरु केले आहेत, फक्त दहा
टक्के पालकांनी संमती दिली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यात अद्याप
सगळ्या शिक्षकांचे कोविड चाचणी अहवाल प्राप्त न झाल्यानं जिल्ह्यातल्या शाळा टप्प्याटप्प्यानं
सुरु होणार आहेत. आज शाळा सुरु होण्याच्या पहील्या दिवशी काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची
संख्या कमी दिसून आली.
चांद्रपूर, सातारा जिल्ह्यातही
शाळा सुरु झाल्या असून, पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून आला.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी केलं आहे.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या महापरिनिर्वाणदिनी येत्या सहा डिसेंबरला अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी करु
नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगानं
मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली, त्यावेळी ते
बोलत होते. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील,
त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही असं ते म्हणाले. परिस्थितीचं भान ओळखून या
अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी असं मुख्यमंत्री म्हणाले. महापरिनिर्वाण
दिन समन्वय समितीनेही सहा डिसेंबर रोजी अनुयायांना अभिवादनासाठी मुंबईत न येण्याचं
आवाहन केलं आहे. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचं
थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी
यांसह विविध सुविधा यांचं नियोजन करण्यात येणार आहे.
****
महाविकास आघाडी सरकारकडून
वाढीव वीजबिल माफ केलं जात नसल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज राज्यभर
वीजबिल होळी आंदोलन करण्यात आलं.
उस्मानाबाद इथं जिल्हाध्यक्ष
नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं. यावेळी
भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकार विरोधात घोषणा देऊन बिलांची होळी केली.
परभणी इथं वीज वितरण कंपनीच्या
मुख्य कार्यालयासमोर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली
वीज बिलांची होळी करण्यात आली. वीज बिलांची दरवाढ रद्द करावी, टाळेबंदीच्या काळातली
सरासरी बिलं रद्द करावीत, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
नाशिक, गडचिरोली, वाशिम,
बुलडाणा, चंद्रपूर, कोल्हापूर, अहमदनगर, धुळे इथंही भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात
आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड
इथल्या ८० वर्षीय महिलेचा आज कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत
या आजारानं एक हजार १३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आज सकाळपर्यंत १२
नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात
३८ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १२
हजार १५ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या १० रुग्णांना आज सुटी देण्यात
आली. आजपर्यंत जिल्ह्यातले अकरा हजार २३८ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित
असलेल्या ४१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत ३०७ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू
झाला आहे.
****
भंडारा जिल्ह्यात आज ३५ नवे
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले.
****
येत्या दोन ते तीन महिन्यात
राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे
यांनी केला आहे. ते आज परभणी इथं, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार शिरीष
बोराळकर यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत बोलत होते. या निवडणुकीत पदाधिकारी आणि
कार्यकर्त्यांनी सक्रीयपणे काम करावं, असं ते म्हणाले.
****
परभणी जिल्ह्यात वीज वितरण
कंपनीने वीज चोरीस आळा बसावा यासाठी मोहीम हाती घेतली असून, शहरातल्या विविध भागात
वीज वितरण कंपनीचे अधिकारी - कर्मचारी भेटी देत वीज चोरी करणारांविरूध्द कारवाई करत
साहित्य जप्त करत आहेत. अनेक जण मीटर असतानाही आकडे टाकून वीज चोरी करत असल्याचं निदर्शनास
आलं आहे. या मोहीमेत ग्राहकांच्या वीज बिलांची वसुलीही करण्यात येत आहे. नागरिकांनी
वीज चोरी करू नये, असं आवाहन सहाय्यक अभियंता रुपाली जोशी यांनी केलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज कांद्याचे भाव घसरले. मनमाड कृषी उत्पन्न बाजार
समितिमध्ये कांद्याच्या भावात तब्बल ७०० रूपयांची घसरण झाली. आज प्रचंड आवक झाल्याने
कांद्याचे भाव कमी झाल्याचं सांगण्यात आलं. उन्हाळ कांद्याला सरासरी तीन हजार १०० रूपये,
तर लाल कांद्याला सरासरी तीन हजार ६०० रूपये क्विंटल असे भाव होते. लासलगाव बाजार समितीच्या
आवारातही उन्हाळ कांद्याचे भाव ७५० तर लाल कांद्याचे भाव ३०० रुपयांनी घसरले. आज लाल
कांद्याला सरासरी तीन हजार ८०० तर उन्हाळ कांद्याला चार हजार ४०० रुपये भाव मिळाला.
****////****
No comments:
Post a Comment