Saturday, 21 November 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 November 2020 Time 18.00 to 18.10 Language Marath

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 November 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** औरंगाबाद महापालिका हद्दीतल्या सर्व शासकीय आणि खाजगी शाळा तीन जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा महानगरपालिकेचा निर्णय

** कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातले सैनिक हवालदार संग्राम पाटील यांना जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर लढताना वीरमरण

** महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवरच्या शासकीय मानवंदनेचं थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय

आणि

** औरंगाबाद जिल्ह्यात आज दोन कोविड बाधितांचा मृत्यू

****

औरंगाबाद महापालिका हद्दीतल्या सर्व शासकीय आणि खाजगी शाळा तीन जानेवारी पर्यंत बंद राहणार आहेत. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी आज ही माहिती दिली. कोविड-19 ची दुसरी लाट येण्याची शक्यता आणि शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना शाळेत येता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या वीस डिसेंबरला यासंदर्भात पुन्हा आढावा घेण्यात येणार असून, त्यावेळी परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, औरंगाबाद ग्रामीण भागातल्या नववी ते १२ पर्यंतच्या सर्व शाळा परवा २३ तारखेपासून सुरु होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या ऑनलाईन शिक्षण देण्यात अडचणी येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

२१ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेने सर्वस्व पणाला लावून लढा दिला. या लढ्यात १०७ हुतात्म्यांनी प्राणार्पण केलं. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज मुंबईत हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.

संयुक्त महाराष्ट्राच्या गौरवशाली, प्रेरणादायी इतिहासातून सीमाभागातल्या मराठीभाषक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचं अपूर्ण स्वप्न, पूर्ण करण्यासाठी बळ मिळेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्मा वीरांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते.

****

कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातले सैनिक हवालदार संग्राम शिवाजी पाटील यांना जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर लढताना वीरमरण आलं. राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळी सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात संग्राम पाटील हुतात्मा झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यामध्ये तीन पक्षांनी एकत्र येऊन ज्या किमान समान कार्यक्रमावर सरकार बनवलं, त्यामध्ये शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता, असं ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलं. ते आज अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. भारतीय जनता पक्षानं सुद्धा त्यांच्या काळात ही सर्व परिस्थिती अनुभवली आहे. सरकारला सवलत देण कितपत शक्य आहे, हे त्यांनाही माहित असल्याचं ते म्हणाले.

****

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी केलं आहे.

****

कोरोना विषाणूचं सावट कायम असल्यानं यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर शासकीय मानवंदनेचं थेट प्रक्षेपण होणार असून, महामानवाला घरबसल्या अभिवादन करता येणार आहे. या कार्यक्रमाचं ऑनलाईन थेट प्रक्षेपण होईल. या दिवशी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. महापरिनिर्वाण दिना निमित्तानं चैत्यभूमी स्मारक इथं करण्यात येत असलेल्या तयारीची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसंच कोरोनाची दुसरी लाट येण्याची संभाव्यता लक्षात घेऊन यंदा राज्य शासनासह महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

****

राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विसंवाद असून, अनेक जनहितविरोधी निर्णय या सरकारनं घेतले असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. ते आज उस्मानाबाद इथं बोलत होते. मराठवाड्याच्या पदवीधरांची भूमिका मांडण्यात आमदार सतीश चव्हाण यांनी पुढाकार घेतलेला नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

****

प्रसिद्ध गायिका चित्ररेखा देशमुख यांचं काल पुण्यात निधन झालं, त्या ७६ वर्षांच्या होत्या. पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी - एसएनडीटी महाविद्यालयातून संगीत विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या चित्ररेखा देशमुख यांनी पंडित दिवाण यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. औरंगाबाद इथल्या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयातल्या संगीत विभाग प्रमुख पदावरून त्या निवृत्त झाल्या होत्या. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या स्वरशिल्प या कार्यक्रमात त्यांनी गायलेली गाणी रसिकांच्या खास पसंतीची आहेत. प्रसिद्ध नाटककार दिवंगत कुमार देशमुख यांच्या त्या पत्नी तर प्रसिद्ध अभिनेते रोहित देशमुख यांच्या त्या मातु:श्री होत. त्यांच्या पार्थिव देहावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज दोन कोविड बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या विषाणू संसार्गानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार एकशे एकतीस झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या ४२ हजार १८० झाली असून ६८१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४० हजार ३६८ रुग्णांना बरे झाल्यानं सुटी देण्यात आली आहे.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात ४१ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता अकरा हजार ९५२ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या १०७ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले अकरा हजार १७८ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ४६८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ पूर्णांक ५२ टक्के असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५६ टक्के इतका आहे.

****

धुळे जिल्ह्यात आज २३ कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. त्यामुळे जिल्ह्यातले १३ हजार २५७ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले आहेत. तसंच आज नविन १५ बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता १३ हजार ७७५ वर पोहोचली आहे. धुळे जिल्ह्यात सध्या १४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज चार जणांनी कोरोना विषाणूवर मात केली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत चार हजार ८३९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर आज नव्या ३१ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आता पाच हजार १५४ एवढी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या १७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

****

सोलापूर जिल्ह्यातल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांच्या घेण्यात येत असलेल्या चाचण्यांमध्ये बाधित आढळलेल्या शिक्षकांना उपचारासाठी खास रजा देण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिली. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शाळा परिसरात सोमवारी खास पोलिस बंदोबस्त नियुक्त करण्यात यावा असे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलिसांना दिले आहेत.

****

धुळे शहरासह जिल्ह्यात इयत्ता नववी ते १२ वी पर्यंतच्या शाळा २३ तारखेपासून सुरु करण्याची तयारी पुर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात १८ ते २० नोव्हेंबर या तीन दिवसात तीन हजार २९२ शिक्षकांची कोविड चाचणी करण्यात आली.
दरम्यान, शाळेत ५० टक्के विद्यार्थी उपस्थित राहतील, तर ५० टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेतील, आणि शाळा चार तास घेण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुभाष बोरसे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातल्या शाळा सुरु करण्यासंदर्भात उद्या निर्णय घेण्यात येणार असल्याचं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.

****

अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीनं आज विनोदी कलाकार भारती सिंह हिच्या मुंबईतल्या घरावर छापा घातला. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या अंमली पदार्थ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. भारती सिंहच्या घरासह अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा इथं तीन वेगवेगळ्या ठिकाणी देखील एनसीबीनं आज धाडी टाकल्या असून, त्याठिकाणी अंमली पदार्थ आढळून आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

//***************//

No comments:

Post a Comment