Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 November 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
भारतात
कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं ७५ लाखाचा टप्पा पार केला आहे.
देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१ पूर्णांक ६८ टक्के इतकं झालं आहे. बरे होणाऱ्या
रुग्णांची संख्या ही सध्या असलेल्या बाधित रुग्णांपेक्षा १३ पटीनं जास्त आहे. गेल्या
२४ तासांत ५३ हजार रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ७५ लाख ४५ हजार रुग्ण कोरोना विषाणू
मुक्त झाले आहेत. देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असून, सध्या
पाच लाख ६१ हजार ९०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशभरात वाढलेली वैद्यकीय पायाभूत
सुविधा, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे केंद्राच्या मानक उपचार पद्धतींची अंमलबजावणी,
यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं घट होत असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
म्हटलं आहे. डॉक्टर्स, परिचारीका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समर्पणामुळे आणि
वचनबद्धतेमुळे, या संसर्गानं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणंही अत्यल्प असल्याचं, मंत्रालयानं
नमूद केलं आहे. जगभरात भारतात कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वात
कमी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४९ टक्के इतका आहे.
****
दरम्यान,
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं काल एका दिवसात एकूण आठ लाख ५५ हजार ८०० नमुन्यांची
तपासणी केली आहे. आतापर्यंत देशात एकूण ११ कोटी सात लाख ४३ हजार १०३ चाचण्या घेण्यात
आल्याची माहिती, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे.
****
इंदिरा
गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानं विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या नोंदणीची
मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. विद्यार्थ्यांना आता विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन १५
नोव्हेंबर पर्यंत प्रवेशासाठीची नोंदणी करता येणार आहे.
****
कोविड
कालावधीमध्ये समाजाच्या हितासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या
निर्णयाचा फायदा अनेक गरीब नागरिकांना झाला, शासन आपल्या पाठीशी असल्याची भावना सर्वसामान्यांच्या
मनात रुजली, असं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. जन स्वास्थ्य
अभियान महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींबरोबर वेबिनारद्वारे चर्चा करताना
त्या काल बोलत होत्या. ज्या रुग्णालयांना शासकीय जमीन अथवा शासकीय निधी देण्यात आलेला
आहे, किंवा वैद्यकीय महाविद्यालय जोडलेले आहे, अशा रुग्णालयांना सामाजिक बांधिलकी म्हणून
काही खाटा आरक्षित करणं आणि बिलामध्ये सवलत देणं याबाबत काटेकोर अंमलबजावणीसाठी शासन
प्रयत्न करेल, आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणारी ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’ला
मुदत वाढ द्यावी याबाबत आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असं गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं.
****
मुंबईत
बेस्ट सेवेसाठी दाखल झालेल्या ५०० एसटी कर्मचाऱ्यांची गैरसोय झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी
काल आंदोलन केलं. मुंबईत सेवेसाठी दाखल झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची सोय गोरेगाव इथल्या
हॉटेल रॉयल पाममध्ये करण्यात आली आहे, मात्र हे हॉटेल पूर्वी विलगीकरण कक्ष होतं आणि
त्याठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्णांना ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर या हॉटेलची
स्वच्छता नीट करण्यात आलेली नाही, तसंच जेवणही निकृष्ट दर्जाचं दिलं जात आहे. त्यामुळे
संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीच हॉटेलबाहेर येत आंदोलनाला सुरुवात केली.
दरम्यान,
पोलिसांनी घटनास्थळी येऊन हॉटेल चालक आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मध्यस्थी केली. हॉटेल
स्वच्छ करून एसटी कर्मचाऱ्यांना उत्तम अन्न देण्याचे आदेश पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापकांना
दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
सांगली
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं शेतीसाठी दीर्घ आणि मध्यम मुदतीची कर्जे न देण्याचा
निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे कर्ज मिळणं
अवघड झालं आहे. कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा अजिबात करायचा नाही, असा
आदेश बँकेने काढला आहे. जिल्हा बँकेचे कामकाज व्यावसायिक बँकाप्रमाणे सुरू झालं असून,
शेतीसाठी उपेक्षित शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचा मूळ हेतू बाजूला ठेवला आहे. त्यामुळे
या बँकेत शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. जिल्हा बँकेनं हा निर्णय त्वरित मागे घ्यावा
अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सुनील फराटे
यांनी दिला आहे.
****
लातूर
शहरात रक्ताचा तुटवडा भासत असल्यानं अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे
लातूरकरांनी मोठ्या संख्येनं रक्तदान करण्याचं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी
केलं आहे. लातूर शहरातल्या जवळपास सगळ्याच रक्तपेढ्या सध्या रिकाम्या असून, नागरिकांनी
रक्तदान शिबिरांचं आयोजन करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं महापौर गोजमगुंडे
यांनी जारी केलेल्या ध्वनिफीतीत म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय
राजधानी दिल्लीत वायू गुणवत्तेचं प्रमाण खालावलं आहे. आज सकाळी वायु गुणवत्ता सूचकांक
३१८ इतका नोंदवण्यात आला. दिल्लीच्या शेजारच्या राज्यांमध्ये वाळलेला पेंढा मोठ्या
प्रमाणात जाळला जातो, त्याचबरोबर हवेची कमी गती आणि वाहनांच्या संख्येत वाढ यामुळे
दिल्लीत हवेच्या गुणवत्तेचं प्रमाण खालावलं आहे.
****
No comments:
Post a Comment