▼

Tuesday, 3 November 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद - दिनांक 03.11.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०३ नोव्हेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

बिहार विधानसभा निवपणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज सकाळी सात वाजता सुरु झालं. या टप्प्यात पाटणा, वैशाली, सीतामढी, दरभंगा आणि मधुबनीसह १७ जिल्ह्यातल्या ९४ मतदारसंघांचा समावेश आहे.

त्याचबरोबर दहा राज्यांच्या ५३ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक, ओडिशा, हरीयाणा, छत्तीसगढ, तेलंगणा आणि नागालँड या राज्यांचा यात समावेश आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालणार आहे.

****

अमेरिकेत आज राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बिडेन यांच्यात ही लढत होत आहे. नऊ कोटी २० लाख नागरीकांनी यापूर्वीच मतदान केलं आहे.

****

आपत्कालीन पत हमी योजनेची मुदत केंद्र सरकारनं ३० नोव्हेंबर पर्यंत किंवा या योजनेची तीन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मंजूर होईपर्यंत वाढवली आहे. अर्थव्यवसथेची विविध क्षेत्रं खुली होत आहेत आणि वर्तमान उत्सवी हंगामात मागणीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे, हे लक्षात घेऊन हमी योजनेची ही मुदत वाढवण्यात आली आहे.

****

मुंबईत सध्या १७ हजार ६४५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. मुंबईत रुग्णसंख्या घटत असून, नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण अधिक आहे. काल नव्या ७०६ रुग्णांची नोंद झाली, तर दहा हजार ६४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. मुंबईत आतापर्यंत दहा हजार ३०५ रुग्णांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे. 

****

नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातल्या एका व्यापाऱ्याला परवाना दिल्याच्या निषेधार्थ काल बागलाण तालुक्यातल्या नामपूर बाजार समितीत स्थानिक व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले होते. यामुळे बाजार समितीनं व्यापाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत.

****

अबुधाबी इथं सुरु असलेल्या इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल दिल्ली कॅपिटल्स संघानं रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा सहा गडी राखून पराभव केला. या विजयासोबतच दिल्ली संघानं गुणतालिकेत पहिल्या दोन संघांमध्ये स्थान मिळवलं आहे. या स्पर्धत आज शारजाह इथं सनराईजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघांदरम्यान सामना होणार आहे.

****

No comments:

Post a Comment