▼

Wednesday, 18 November 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 18.11.2020 रोजीचे सायंकाळी 06.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 November 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

·      आगामी कार्तिकी आणि आळंदी वारी किमान वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडावी याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं आश्वासन.

·      मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेच्या प्रभावी संनियंत्रणासाठी पुणे इथं मध्यवर्ती कॉल सेंटर.

·      औरंगाबाद जिल्ह्यात आज दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू.

आणि

·      जालन्यातल्या मंठा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेचे सहा महिन्यांसाठी निर्बंध.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा २४ नोव्हेंबरला होणारी पंढरपूर कार्तिकी वारी आणि ११ डिसेंबरला होणारी आळंदी वारी ही किमान वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडावी, याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे. मुंबईत आज वारकऱ्यांना दरवर्षी वारीदरम्यान येणाऱ्या समस्या आणि कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वारीचं नियोजन करण्यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी पटोले यांनी विविध समस्या जाणून, वारकरी बांधवांना सर्व सोयीसुविधा उपलबध व्हाव्यात यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. सांस्कृतिक आणि धार्मिक समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायास परंपरेनुसार वारी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणं हे शासनाचं दायित्व असल्याचं पटोले यावेळी म्हणाले. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार मर्यादित संख्येतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत ही वारी परंपरा यशस्वी व्हावी असं त्यांनी सांगितलं. वारीला जाण्यासाठी फड परंपरेच्या दिंड्यांसाठी वारकऱ्यांशी समन्वय साधून त्यांना एस. टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्याचे निर्देशही पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

****

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेच्या प्रभावी संनियंत्रणासाठी पुणे इथल्या पशुसंवर्धन आयुक्तालयात मध्यवर्ती कॉल सेंटर उभारण्यात येणार असल्याचं पसुसंवर्धन आणि दुग्धव्यवसात मंत्री सुनिल केदार यांनी दिली. हे कॉल सेंटर उभारणीसाठी आज मुंबईत इंडसइंड बँक यांची उपकंपनी असलेली भारत फायनांस इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला. पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्यात आल्याचं केदार यांनी सांगितलं. राज्यातल्या दुर्गम, डोंगराळ, आदिवासी बहुल भागामध्ये तसंच ज्या भागामध्ये पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी आहे, दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा आहेत, अशा तालुक्यात या योजनेअंतर्गत फिरते पशुचिकित्सा पथक स्थापन करण्यात येणार असल्याचं केदार यांनी सांगितलं.

****

मुंबई विद्यापीठात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरु करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. या अध्यासन केंद्रात व्यंगचित्रकार, साहित्यिक, कला अभ्यासक्रमाचा सामावेश असणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचं सामंत यांनी सांगितलं. या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून अनेक विषयांवर सखोल अभ्यास करून एक आदर्शवत पीढीच्या निर्माणासाठी या केंद्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचं ते म्हणाले.

****

सिंधुदुर्ग इथं ५८ महाराष्ट्र बटालियन एन सी सी या ठिकाणी फर्स्ट ऑफिसर पदावर कार्यरत स्नेहल पावरी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवहन केलं आहे.

****

भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी अटकेत असलेले सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव यांना पुढच्या १५ दिवसांसाठी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं दिली आहे. राव यांची प्रकृती ढासळली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्याची मागणारी याचिका त्यांच्या पत्नी हेमला यांनी न्यायालयात दाखल केली होती. राव यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारला वहन करावा लागणार आहे. तसंच न्यायालयाच्या परवानगीनंतरच त्यांना रूग्णालयातून सोडलं जाईल, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.

****

भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांना आज सकाळी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि काही वेळानंतर सोडून दिलं. कदम यांनी पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले हत्याकांड प्रकरणी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ही कारवाई करण्यात आली. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असून, तो दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया कदम यांनी दिली आहे.

गेल्या १६ एप्रिलच्या रात्री पालघर जिल्ह्यात गडचिंचले परिसरात दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अद्याप कारवाई करण्यात आलेली नसल्याच्या निषेधार्थ कदम यांनी खार इथल्या आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधल्या संबंधित घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. या यात्रेपूर्वीच पोलिसांनी कदम आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं होतं.

****

ज्येष्ठ लेखिका, भाजप नेत्या, गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचं आज निधन झालं, त्या ७७ वर्षांच्या होत्या. २०१४ ते २०१९ या काळात त्या गोव्याच्या राज्यपाल होत्या. सिन्हा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गंगापूर इथली ६२ वर्षीय महिला आणि औरंगाबाद इथल्या ३२ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. तर जिल्ह्यात आज १४ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात ४५ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता अकरा हजार ७७३ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या २१ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले दहा हजार ९६५ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ५०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

नाशिक जिल्ह्यात सद्य:स्थितीत दोन हजार ४९७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, जिल्ह्यातले ९३ हजार ७८ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ६३६ रुग्णांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी १३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५ हजार १०८ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आज देवगड आणि कणकवली तालुक्यातल्या प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १३७ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या १६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

जालन्यातल्या मंठा अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेनं सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. यानुसार बँकेला परवानगी शिवाय कोणतेही कर्ज वाटप करता येणार नाही. जुन्या कर्जांचं नुतनीकरण तसंच कोणतीही गुंतवणूक करायला देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. १७ नोव्हेंबर नंतर पुढचे सहा महिने हे निर्बंध लागू राहणार आहे. दरम्यान, या बँकेत गुंतवणूक केलेली रक्कम परत द्यावी अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा मुंबई महापालिकेनं २० आणि २१ नोव्हेंबर रोजी मुंबईत समुद्र किंवा नदी किनारी छटपूजा आणि या उत्सवाशी संबंधित कार्यक्रम करण्यास बंदी घातली आहे. या संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी केलं आहे.

****

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतले अपक्ष उमेदवार डॉ.विलास तांगडे यांनी विभागातल्या पदवीधरांच्या अकराशे समस्या मांडल्या आहेत. निवडणुकीतले भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यासह इतर उमेदवारांना या समस्यांवर चर्चा करण्याचं आव्हान तांगडे यांनी दिलं आहे. यासाठी त्यांनी प्रश्नावली तयार केली आहे. प्राध्यापक भरती, पदवीधर ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मराठा, धनगर, इतर मागासवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गातल्या पदवीधरांना शिष्यवृत्ती, मराठा समाजातल्या तरुणांना एम फील, पीएचडीसाठी फेलोशिप आदी प्रश्नांकडे तांगडे यांनी लक्ष वेधलं आहे.

****

No comments:

Post a Comment