▼

Friday, 20 November 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.11.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२० नोव्हेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

गेल्या चोवीस तासात देशात कोरोना विषाणू बाधित ४५ हजार ८८२ नवे रुग्ण आढळले तर ५८४ जण मरण पावले. आतापर्यंत या आजारामुळे देशात नव्वद लाख ४ हजार ३६६ रुग्ण बाधित झालेले असून सध्या सक्रीय रुग्ण संख्या चार लाख त्रेचाळीस हजार ७९४ असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२ हजार ८४ झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ४० हजार २४० कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण १ हजार १२८ जणांचा मृत्यू झाले असून, सध्या ७१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

****

उस्मानाबाद जिल्ह्यातली कोविड टाळेबंदीच्या काळातली वीज देयके माफ करा, अशी मागणी आम आदमी पार्टीनं मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली आहे. या मागणीचं निवेदन काल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. वीज देयके तात्काळ माफ करण्यात यावीत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

****

नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातलं नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य आजपासून पर्यटकांसाठी खुलं होणार आहे. हिवाळ्यात विदेशातले पाहुणे पक्षी या अभयारण्यात येत असतात. ते पाहण्यासाठी पक्षीप्रेमी पर्यटकांची गर्दी होते. यंदा मात्र कोविडसंदर्भात शासनाने घालून दिलेल्या अटी आणि आरोग्य नियमांचे पर्यटकांना पालन करावं लागणार आहे.

****

No comments:

Post a Comment