Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 November 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ नोव्हेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
देशाचा कोविड संसर्ग मुक्तीचा
दर ९३ पूर्णांक ६७ शतांश टक्के झाला आहे. गेल्या २४ तासात देशभरात कोविड संसर्ग झालेले
४६ हजार २३२ नवे रुग्ण आढळले, तर ५६४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातला कोविडग्रस्तांचा
आकडा आता ९० लाख ५० हजार ५९८ झाला आहे. यापैकी ८४ लाख, ७८ हजार १२४ रुग्ण आतापर्यंत
बरे झाले आहेत, तर या संसर्गानं झालेल्या मृत्यूची संख्या आता एक लाख ३२ हजार ७२६ झाली
आहे. सध्या देशात ४ लाख ३९ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, भारतीय वैद्यकीय
संशोधन परिषद - आयसीएमआरने काल एका दिवसात १० लाख ६६ हजार २२ नमुन्यांची कोविड तपासणी
केली. आतापर्यंत देशात एकूण १३ कोटी ६ लाख ५७ हजार ८०८ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
****
तरुणांसमोर असलेल्या आव्हानांपेक्षा
त्यांच्या क्षमता अधिक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये
गांधीनगर इथल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पेट्रोलियम विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत
समारंभात पंतप्रधान दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. जे आव्हानांचा
स्वीकार करतात, ज्यांना जबाबदारीची जाणीव असते, असे लोकच जीवनात यशस्वी होतात, असं
पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. ऊर्जेच्या क्षेत्रात नैसर्गिक वायूचं प्रमाण चार पटींनी
वाढवण्याचा निर्धार व्यक्त करतानाच पंतप्रधानांनी निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाची गरजही
व्यक्त केली.
****
२१ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र
राज्य ‘हुतात्मा स्मृती दिन’ म्हणून पाळला जातो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या
निर्मितीसाठी मराठी जनतेने सर्वस्व पणाला लावून लढा दिला. या लढ्यात १०७ हुतात्म्यांनी
प्राणार्पण केलं. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज मुंबईत हुतात्मा चौकात हुतात्मा
स्मारकाला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री
अनिल देशमुख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव संजय कुमार यांच्यासह अनेक
मान्यवरांनी हुतात्म्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहिली.
संयुक्त महाराष्ट्राच्या
गौरवशाली, प्रेरणादायी इतिहासातून सीमाभागातल्या मराठीभाषक गावांसह संयुक्त महाराष्ट्र
स्थापनेचं अपूर्ण स्वप्न, पूर्ण करण्यासाठी बळ मिळेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी म्हटलं आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्मा वीरांना अभिवादन केल्यानंतर
ते बोलत होते. या लढ्यात योगदान दिलेल्या सर्वांच्या त्यागाबद्दल आपण कृतज्ञ असल्याचं,
पवार यावेळी म्हणाले.
****
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातले
सैनिक हवालदार संग्राम शिवाजी पाटील यांना जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर लढताना वीरमरण
आलं. राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन
केलं. यावेळी सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात संग्राम पाटील हुतात्मा झाल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
यवतमाळ इथल्या शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्था - आयटीआयच्या माध्यमातून झालेल्या रोजगार मेळाव्यात १०२ उमेदवारांची
सुझुकी मोटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत निवड झाली आहे. या मुलांना आयटीआयतर्फे समारंभपूर्वक
निरोप देण्यात आला. या मुलांना घेऊन कंपनीच्या दोन बस गुजरातमध्ये हसनपूर इथल्या कारखान्याकडे
रवाना झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सततचा पाऊस आणि परतीच्या
पावसामुळे या वर्षी खरीप हंगामात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सध्या गेल्या
पंधरा दिवसांत थंडीत वाढ झाल्यानं, तुरीचे पीक चांगल्या स्थितीत आहे, मात्र गेल्या
दोन तीन दिवसांपासून अनेक भागात ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीचं पीक धोक्यात आलं आहे,
यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकरी चिंताग्रस्त झाला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी
येत्या १ डिसेंबरला मतदान होणार आहे. या दिवशी ताप किंवा इतर आजारांनी त्रस्त असलेल्या
मतदारांना टोकन घेऊन, दुपारी चार ते पाच या वेळेत मतदान करता येईल, त्यांच्यासाठी आरोग्य
अधिकाऱ्यांकडून वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी
तथा नोडल आरोग्य अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी दिली आहे. मतदान केंद्रावर मास्क,
सॅनिटाइजर, थर्मलगन आदी कोविड प्रतिबंधात्मक साहित्य जिल्हाधिकारी कार्यालय पुरवणार
असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
****
अंमली पदार्थ नियंत्रण विभाग
- एनसीबीने आज विनोदी कलाकार भारती सिंह हिच्या मुंबईतल्या घरावर छापा घातला. अभिनेता
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या अंमली पदार्थ प्रकरणी ही कारवाई करण्यात
आली आहे. भारती सिंहच्या घरासह अंधेही, लोखंडवाला आणि वर्सोवा इथं तीन वेगवेगळ्या ठिकाणी
देखील एनसीबीने आज धाडी टाकल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment