Sunday, 22 November 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.11.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 November 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ नोव्हेंबर २०२० सकाळी ७.१० मि

****

·      नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा उद्यापासून सुरू करण्याची तयारी जवळपास पूर्ण; काही जिल्ह्यांमध्ये मात्र शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर.

·      महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून हुतात्म्यांना अभिवादन.

·      पंढरपुरात कार्तिकी एकादशीला भाविकांनी गर्दी करू नये - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन.

·      राज्याचा कोविडमुक्तीचा दर ९२ पूर्णांक ८२ शतांश टक्के; मराठवाड्यात ३९३ नवीन रुग्ण.

आणि

·      प्रसिद्ध गायिका चित्ररेखा देशमुख यांचं पुण्यात दीर्घ आजारानं निधन.

****

राज्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा उद्यापासून सुरू करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शाळाखोल्यांच्या निर्जंतुकीकरणासह सॅनिटायझर, साबण आदी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये मात्र काही शिक्षकांचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल बाधित आल्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर गेला आहे.

औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतल्या सर्व शासकीय आणि खाजगी शाळा तीन जानेवारीपर्यंत बंद राहणार असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या शाळा मात्र उद्यापासून सुरू होत आहेत.

कोविड-19 ची दुसरी लाट येण्याची शक्यता आणि शहरातली वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, महापालिका हद्दीतल्या शाळा सध्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काल दिली. शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना शाळेत जाता येणार असल्याचं ते म्हणाले. येत्या वीस डिसेंबरला यासंदर्भात पुन्हा आढावा घेण्यात येणार असून, त्यावेळी परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असं आयुक्तांनी सांगितलं.

 

औरंगाबाद ग्रामीण भागातल्या नववी ते १२ पर्यंतच्या सर्व शाळा उद्यापासून सुरु होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या ऑनलाईन शिक्षण देण्यात अडचणी येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ६७६ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात आली, त्यापैकी ६५ जण बाधित आढळले.

****

लातूर जिह्यात उद्यापासून इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु केले जाणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ४४८ शिक्षकांच्या कोरोना विषाणू चाचण्या झाल्या असून यामध्ये तीन शिक्षक बाधित आढळले आहेत. काही शाळांमधील शिक्षकांच्या तपासण्या २४ आणि २५ तारखेला होणार असल्यानं, या शाळा २६ नोव्हेंबरपासून सुरु होतील असं उकिरडे यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार २३२ शिक्षकांच्या कोविड चाचणीचे अहवाल मिळाले असून, २० शिक्षकांना कोविडची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एक हजार २४४ चाचण्यांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात आठ शिक्षकांना कोविड संसर्ग झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अडीच हजारावर शिक्षकांनी कोविड तपासणीसाठी नमुने दिले असून, यापैकी २८० अहवाल मिळाले आहेत.

****

परभणी जिल्ह्यातही उद्यापासून शाळा सुरु होणार असून, त्यानुसार महानगरपालिका आरोग्य केंद्रानं शहरातल्या सर्व शाळा, महाविद्यालयातल्या शिक्षकांची कोविड-19 ची चाचणी केली. एकूण ६०५ शिक्षकांची चाचणी करण्यात आल्याचं महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं कळवलं.

****

उस्मानाबादमध्येही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती न करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –

उस्मानाबाद जिल्ह्यात ३७९५ शिक्षकांपैकी ५२ शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार उस्मानाबादचे जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर यांनी २३ नोव्हेंबरपासून शाळांमधे ऑक्सिमीटर, थर्मलगन, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरण, साबण, पाणी या प्रतिबंधात्मक व्यवस्थांसह नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व शाळांना दिले आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर गर्दी न होऊ देता समुपदेशन करून घरी कोणता अभ्यासक्रम स्वयंअध्ययनाने पूर्ण करता येऊ शकतो याची सूची तयार करून पालकांना देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद

****

जालना जिल्हा प्रशासनानं उद्यापासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक प्रशासन तसंच मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजारांवर शिक्षकांची कोविड चाचणी करण्यात आली असून, यापैकी ९ शिक्षक कोविड बाधित आढळले आहेत.

****

नांदेड जिल्ह्यातल्या ८५८ शाळा उद्यापासून उघडण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सर्व शिक्षकांना शाळेत एकाच वेळी न बोलावता, फक्त नववी ते बारावीच्याच शिक्षकांना शाळेत बोलवावं, असं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त काल हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल मुंबईत हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव संजय कुमार, यांच्यासह अनेक मान्यवरांनी हुतात्म्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहिली.

 

संयुक्त महाराष्ट्राच्या गौरवशाली, प्रेरणादायी इतिहासातून सीमाभागातल्या मराठीभाषक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचं अपूर्ण स्वप्न, पूर्ण करण्यासाठी बळ मिळेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्मा वीरांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. या लढ्यात योगदान दिलेल्या सर्वांच्या त्यागाबद्दल आपण कृतज्ञ असल्याचं, पवार म्हणाले.

****

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गा विषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी यांनी केलं आहे.

****

कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातले सैनिक हवालदार संग्राम शिवाजी पाटील यांना जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर लढताना वीरमरण आलं. राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळी सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात संग्राम पाटील हुतात्मा झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

तरुणांसमोर असलेल्या आव्हानांपेक्षा त्यांच्या क्षमता अधिक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये गांधीनगर इथल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पेट्रोलियम विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. जे आव्हानांचा स्वीकार करतात, ज्यांना जबाबदारीची जाणीव असते, असे लोकच जीवनात यशस्वी होतात, असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. ऊर्जेच्या क्षेत्रात नैसर्गिक वायूचं प्रमाण चार पटींनी वाढवण्याचा निर्धार व्यक्त करतानाच पंतप्रधानांनी निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाची गरजही व्यक्त केली

****

राज्यामध्ये तीन पक्षांनी एकत्र येऊन ज्या किमान समान कार्यक्रमावर सरकार बनवलं, त्यामध्ये शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता, असं ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केलं. ते काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. भारतीय जनता पक्षानं सुद्धा त्यांच्या काळात ही सर्व परिस्थिती अनुभवली आहे. सरकारला सवलत देणं कितपत शक्य आहे, हे त्यांनाही माहित असल्याचं ते म्हणाले.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी  राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. कोरोना विषाणूचं सावट कायम असल्यानं यंदा चैत्यभूमीवर शासकीय मानवंदनेचं थेट प्रक्षेपण होणार असून, महामानवाला घरबसल्या अभिवादन करता येणार आहे. या दिवशी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसंच कोरोनाची दुसरी लाट येण्याची संभाव्यता लक्षात घेऊन यंदा राज्य शासनासह महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

****

येत्या २६ तारखेला पंढरपुरात कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री तसंच पालकमंत्री यांना शासनाच्या विधी आणि न्याय विभागानं परवानगी दिली आहे. त्यामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तसंच आचारसंहितेचा भंग न करता विठ्ठल रुख्मिणीची पाद्यपूजा होणार आहे. पंढरपूरसह आजूबाजूच्या दहा गावात संचारबंदी लागू केल्यानं नागरिकांनी या काळात गर्दी करु नये असं आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलं आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवीन पाच हजार सातशे साठ रुग्ण आढळले. यामुळे राज्यात कोविड बाधितांची एकूण संख्या सतरा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे पंचावन्न झाली आहे. काल राज्यभरात चार हजार अठ्ठ्याऐंशी रुग्ण कोविड मुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यभरात या संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता १६ लाख सत्तेचाळीस हजार चार झाली असून, राज्याचा कोविडमुक्तीचा दर ९२ पूर्णांक ८२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात काल ६२ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला, राज्यभरात या संसर्गाने झालेल्या मृत्यूंची संख्या आता शेहेचाळीस हजार पाचशे त्र्याहत्तर झाली आहे, मृत्यूचा हा दर दोन पूर्णांक बासष्ट शतांश टक्के एवढा आहे. राज्यात सध्या एकोणऐंशी हजार आठशे त्र्याहत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल १० कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३९३ रुग्णांची नोंद झाली.

बीड तसंच लातूर जिल्ह्यात काल प्रत्येकी तीन रुग्णांचा तर औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यात काल प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. बीड आणि नांदेड जिल्ह्यात काल प्रत्येकी ७२ नवे रुग्ण आढळले, लातूर जिल्ह्यात ६८, औरंगाबाद ६६, उस्मानाबाद ५८, जालना ४१, परभणी १२ तर हिंगोली जिल्ह्यात काल चार नव्या कोविडबाधितांची नोंद झाली.

****

औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी येत्या एक डिसेंबरला मतदान होणार आहे. या दिवशी ताप किंवा इतर आजारांनी त्रस्त असलेल्या मतदारांना टोकन घेऊन, दुपारी चार ते पाच या वेळेत मतदान करता येईल, त्यांच्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांकडून वाहनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी तथा नोडल आरोग्य अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी दिली आहे. मतदान केंद्रावर मास्क, सॅनिटाइजर, थर्मलगन आदी कोविड प्रतिबंधात्मक साहित्य जिल्हाधिकारी कार्यालय पुरवणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

****

प्रसिद्ध गायिका चित्ररेखा देशमुख यांचं परवा पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं, त्या ७६ वर्षांच्या होत्या. पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी - एसएनडीटी महाविद्यालयातून संगीत विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या चित्ररेखा देशमुख यांनी पंडित दिवाण यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. औरंगाबाद इथल्या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयातल्या संगीत विभाग प्रमुख पदावरून त्या निवृत्त झाल्या होत्या. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या ‘स्वरशिल्प’ या कार्यक्रमात त्यांनी गायलेली गाणी रसिकांच्या खास पसंतीची आहेत. प्रसिद्ध नाटककार दिवंगत कुमार देशमुख यांच्या त्या पत्नी तर प्रसिद्ध अभिनेते रोहित देशमुख यांच्या त्या मातु:श्री होत. त्यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

लातूरचे माजी खासदार जनार्दन वाघमारे यांनी नागरिकांना कोविडपासून बचावासाठी त्रिसुत्रींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

****

हवामान, येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याकाळात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

****

No comments:

Post a Comment