Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 November 2020
Time 13.00 to 13.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ नोव्हेंबर २०२० दुपारी १.००
****
देशात काल दिवसभरात ११ लाख ३१ हजार कोविड
१९ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशभरात १३ कोटी १७ लाखांहून अधिक चाचण्या
करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीत संशोधन परिषदेनं सांगितलं. चाचण्यांची संख्या
अधिक असल्याचं कोविड बाधित रुग्ण लवकर सापडत गेले आणि लवकर उपचार करता आले, असं
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच अधिक चाचण्यांमुळे रुग्ण
सापडण्याच्या प्रमाणात घट होत आहे, हे प्रमाण आता चार टक्क्यांपेक्षा कमी झालं
आहे.
****
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
रोखण्याच्या प्रयत्नात भारतानं महत्वपूर्ण यश संपादन केलं आहे. देशात सलग
एकोणिसाव्या दिवशी ५० हजारापेक्षा कमी रुग्ण आढळून आले. काल देशात ४४ हजार नव्या
रुग्णांची नोंद झाली, तर ५२४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर काल ३६ हजार
रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ८६ लाख ७९ हजार
रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या चार लाख ५२ हजार ३४४ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
****
गुजरातमधल्या राजकोट इथं उदय शिवानंद
कोविड रुग्णालयातल्या अति दक्षता विभागात काल रात्री आग लागली, यात पाच रुग्णांचा
मृत्यू झाला. या विभागात ३३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. या
आगीत सहा रुग्ण भाजले असून, त्यांना दुसर्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अतिदक्षता विभागाच्या दुसर्या मजल्यावर असलेल्या मशिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं
ही आग लागल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री विजय रुपाणी
यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांनी
मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे.
****
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुरू
असलेल्या कोविड चाचण्यांमध्ये केल्या जाणाऱ्या कोविड रूग्ण संपर्क शोध
मोहिमेअंतर्गत चुकीच्या पद्धतीनं नागरिकांची नावं नोंदवली गेल्याचा प्रकार उघडकीस
आला आहे. काही दिवसांपूर्वी कुटुंबातल्या एका सदस्यानं कोविड चाचणी केल्यानंतर
संबंधित कुटुंबातल्या सर्व सदस्यांची चाचणी नकारात्मक दाखवण्यात आल्याचं पालिकेने
दिलेल्या अहवालातून समोर आलं आहे. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण
दरेकर यांनी गुरूवारी संध्याकाळी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर
यांची भेट घेतली. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी दरेकर यांनी केली.
दरम्यान, कोविड चाचणी मधील हा प्रकार दोन
दिवसांपूर्वी उघड झाला आहे. याबाबत महापालिकेच्या सर्व कोविड चाचणी केंद्राकडून
अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानुसार निष्पक्ष चौकशी करून कारवाई केली जाईल, ही चूक
माहिती भरताना झाली आहे, की आणखी काही याबाबतही चौकशी केली जाणार आहे. तसंच हे
केवळ एकाच केंद्राच्या बाबतीत आहे किंवा नाही याबाबतही चौकशी केली जाणार असल्याची
माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात
‘सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया’ला भेट देणार आहेत. या भेटीत ते ‘कोविशिल्ड’ लस
निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान परवा रविवारी २९
नोव्हेंबरला, आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ७१ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
सर्वच पक्षातल्या प्रस्थापित मराठा
नेत्यांमुळे मराठा समाजातल्या उपेक्षितांना आरक्षण मिळत नाही, असा आरोप मराठा सेवा
संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केला आहे. ते सांगली इथं प्रसार
माध्यमांशी बोलत होते. मराठा समाजासाठी इतर मागास प्रवर्गातून आरक्षण द्यावं, तीस
वर्षापासून आम्ही हीच मागणी करत असून, यासाठी सर्वच पक्षातल्या नेत्यांनी प्रयत्न
करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
****
लातूर जिल्ह्यातल्या मराठवाडा रेल्वे बोगी
प्रकल्पाचं काम जवळपास पूर्ण झालं असून, येत्या फेब्रुवारी महिन्यात या
प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार आहे. खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी काल
विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांच्यासह आढावा बैठक घेवून, प्रकल्पाची
पाहणी केली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पात मराठवाड्यातल्या
तरुणांसाठी ८० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रकल्प कार्यान्वित होत
असताना टप्प्याटप्प्यानं या जागा भरल्या जाणार असल्याचं खासदार श्रृंगारे यांनी
सांगितलं.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड-पनवेल-नांदेड
या उत्सव विशेष गाडीला ३० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. दक्षिण मध्य
रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सिडनी इथं
सुरु असलेल्या पहिला एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा
ऑस्ट्रेलियाच्या ४६ षटकात ५ बाद ३३६
धावा झाल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment