Friday, 27 November 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.11.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ नोव्हेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रयत्नात भारतानं महत्वपूर्ण यश संपादन केलं आहे. देशात सलग एकोणिसाव्या दिवशी ५० हजारापेक्षा कमी रुग्ण आढळून आले. काल देशात ४४ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५२४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर काल ३६ हजार रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ८६ लाख ७९ हजार रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या चार लाख ५२ हजार ३४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

****

औरंगाबाद इथं वीज महावितरणनं काल एका पिठाच्या गिरणीवर धडक कारवाई करत, सुमारे १८ हजार युनीटची वीज चोरी उघडकीस आणली. संबंधित गिरणी चालकानं रिमोटद्वारे विद्युत मीटरमध्ये फेरफार करत गेल्या दोन वर्षांत १७ हजार ८५६ युनीटची वीज चोरी केल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी महावितरणनं गिरणी चालकाला एक लाख ९७ हजार ७४८ रुपयांचं वीज देयक दिलं असल्याचं, महावितरणकडून सांगण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यात पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकानं वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांविरूध्द कारवाई केली. पालम, जिंतूर, परभणी ग्रामीण, पिंपळदरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या या कारवाईत, २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

****

औरंगाबाद इथं काल पोलीस गुन्हे शाखेच्या पथकानं एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोदामावर छापा टाकून २५ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य पाच व्यापाऱ्यांचा शोध सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

परभणी शहरात कोरोना सुरक्षा उपाय आणि नियम पाळावेत ह्याबाबत वाहतुक पोलिस जनजागृती करत आहेत. युवासनेच्या वतीनं काल वाहतुक पोलिसांना कोरोना सुरक्षा किटचं वाटप करण्यात आलं.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना सिडनी इथं सुरु आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियानं २२ षटकात ११२ धावा केल्या होत्या.

****

No comments:

Post a Comment