Saturday, 12 December 2020

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १२ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१२ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

राज्यातल्या सर्व खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातल्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांना यापुढे सुधारीत आकृतीबंध लागू करण्याऐवजी विद्यार्थी संख्येनुसार प्रतीशाळा शिपाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागानं काल यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला. या शाळांमधले नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाई कामगार, हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर या पदांवरचे कर्मचारी निवृत्त झाल्यावर ही पदं संपुष्टात येतील, असं शिक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत, औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या नव्या जलवाहिनीसह विविध विकास कामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये शहरातल्या मिटमिटा परिसरात प्राणी संग्रहालयासाठी सफारी पार्क, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक तथा स्मृतीवन आणि शहरात सुरू असलेल्या तसंच प्रलंबित १५२ कोटी रुपयांच्या रस्ते कामांचा शुभारंभही मुख्यमंत्री करणार आहेत. दुपारी एक वाजेदरम्यान मुख्यमंत्र्यांचं औरंगाबाद इथं आगमन होईल. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत असलेल्या गरवारे क्रीडा संकुलावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या चारही कामांचा शुभारंभ होईल.

****

केंद्र सरकारनं पारित केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटलं आहे. लोकसभेत आणि राज्यसभेत कृषी विधेयक आणलं त्यावेळी सर्व पक्षांनी त्या चर्चेत सहभाग घेतला होता, आपल्या सूचनाही दिल्या होत्या. त्या सगळ्या सूचना सरकारनं लक्षात घेतल्या. त्यामुळे चर्चा झालीच नाही हा विरोधकांचा आरोप चुकीचा असल्याचं गडकरी म्हणाले. शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा असून, त्यात कोणीही राजकारण आणू नये, असं त्यांनी नमूद केलं.

****

माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी राज्य वाहतुक आणि माथाडी कामगार संघटनेनं सोमवारी १४ डिसेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे. या दिवशी रेल्वे रोको आणि रास्ता रोको करणार असल्याचा इशाराही संघटनेनं दिला आहे. राज्यातल्या अनेक बाजार समित्याही बंद ठेवण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

**//**

 

No comments:

Post a Comment