Monday, 21 December 2020

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकानं आज सकाळी औरंगाबाद तालुक्यातल्या निपाणी इथं भेट देऊन शेतकर्यांशी संवाद साधला. औरंगाबाद तालुक्यातल्या पिंपळगाव पांढरी, पैठण तालुक्यातील शेकटा, गाजीपूर, निलजगाव, गंगापूर तालुक्यातील ढोरगाव, मुरमी, वरखेड इथं, तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातही हे पथक पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.

****

नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं पुढच्या टप्प्याच्या चर्चेची तारीख ठरवण्यास सांगितलं आहे. या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकर्यांनी चर्चा करावी, असं कृषी मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल यांनी शेतकर्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. सरकारनं इतर काही शेतकरी संघटनांसोबत चर्चा केली असून, या संदर्भात सूचना मागवल्या असल्याचं ते म्हणाले. कृषी कायद्यात काही सुधारणा करण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी फेटाळला होता आणि चर्चा करण्यास नकार दिला होता. त्यामुळे सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे.

****

दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वात राज्यातले शेतकरी कार्यकर्ते, आज दिल्लीला रवाना होत आहेत. नाशिक इथून दुपारी हे शेतकरी कार्यकर्ते संघटनेचे नेत डॉ. अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला रवाना होणार आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थान मार्गे २४ डिसेंबर रोजी हे सर्व शेतकरी दिल्लीत पोहोचणार आहेत.

****

बुलडाणा जिल्ह्यातले हुतात्मा वीर जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी सिंदखेडराजा तालुक्यातल्या पळसखेड चक्का या त्यांच्या मूळ गावी अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह जिल्ह्यातल्या सर्व राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी मांदळे यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.

****

उत्तरेकडील शीत वाऱ्याचा जोर वाढल्यानं, राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिकमध्ये आज हंगामातलं निवांकी नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

//**************//

No comments:

Post a Comment