Thursday, 10 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 December 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 December 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १० डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** नवं संसद भवन आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

** देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ६६ शतांश टक्के

** औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे सहा नवे रुग्ण तर पाच रुग्णांचा मृत्यू

आणि

** मराठा आरक्षण मिळवून देण्याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे बाजू मांडत असल्याची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती

****

आधुनिकतेनं परिपूर्ण असणारं नवं संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसद भवनाच्या नव्या इमारतीची पायाभरणी आज पंतप्रधानांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. सध्याच्या संसद भवनानं देशाची स्वातंत्र्य चळवळ आणि जडणघडण पाहिली आहे. ही संसद आपल्या सफलतेचं प्रतिक आहे. संसदेचा हा वैभवशाली इतिहास लक्षात ठेवतानाच वर्तमान स्थितीही लक्षात घेतली पाहिजे, असं त्यांनी नमुद केलं. गरजेनुसार वेळोवेळी या संसद भवनात बदल करायला लागले. मात्र आता या इमारतीला विश्रांतीची गरज आहे. २०२२ पर्यंत ही इमारत पूर्ण होईल, आणि नवं संसद भवन देशाच्या स्वातंत्र्याच्या पंचहात्तरीचं साक्षीदार असेल, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

****

देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत असून तो आता ९४ पूर्णांक ६६ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. काल दिवसभरात देशात ३७ हजार ७३५ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत ९२ लाख ५३ हजार ३०६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. काल ३१ हजार ५२२ नवे रुग्ण आढळले, तर ४१२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी काल एका दिवसात नऊ लाख २२ हजार ९५९ नमुन्यांची तपासणी केली. संसर्ग तपासणीसाठी आतापर्यंत पंधरा कोटी सात लाख ५९ हजार ७२६ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केलं आहे. 

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय रूग्णालयात आज कोरोना विषाणू संसर्गाचे सहा नवे रुग्ण दाखल झाले असून जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४४ हजार १३० झाली आहे. जिल्ह्यातल्या ४२ हजार १७४ जणांनी या विषाणू संसर्गावर मात केली आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात या संसर्गावर उपचार घेत असलेल्या पाच रुग्णांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता ११६५ झाली आहे.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी धरणातील पाणीसाठा, पायथा विजगृह प्रकल्प, पाणी वाटप नियोजन, पाणीसाठा किती दिवस पुरेल याची माहिती घेतली. त्यापूर्वी त्यांनी पोफळी इथंल्या कोयना जलविद्युत केंद्र प्रकल्पाच्या चौथा टप्पाच्या जलविद्युत प्रकल्पाची पाहणी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाचीही प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी त्यानंतर प्रकल्प कार्यालयात एका सादरीकरणाद्वारे सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली.

****

हज यात्रेला जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या नोंदणीची मुदत वाढवण्यात आली असून आता १० जानेवारी पर्यंत नाव नोंदणी करता येणार असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आरोग्याची तपासणी आणि अंतरराष्ट्रीय विमान वाहतुक नियमांचं पालन करत नोंदणीची तारिख वाढवण्यात आली असल्याचंही नक्वी म्हणाले.

****

लातुर जिल्ह्यातल्याल्या ८ हजार ७९७ दिव्यांगाना आज केंद्र सरकारच्या सहकार्यानं मोफत उपकरणं, साहित्य वाटप करण्यात आलं. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि दिव्यांग सशक्तीकरण विभाग आणि लातूर जिल्हा परिषदेनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे, भारतीय कृत्रीम अवयव निर्मिती केंद्राचे पदाधिकारी आदी दुरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. संसदीय कार्य राज्य मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील, आमदार रमेश कराड यावेळी प्रमुख उपस्थित होते.

****

परभणी जिल्ह्यात अनियंत्रितपणे मुद्रा कर्ज वाटपामुळे बँका अडचणीत आल्याचा आरोप करत मुद्रा कर्ज वाटप प्रकरणी बँक अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करण्यात यावी, बँक अधिकारी, अग्रणी बँक अधिकारी यांच्यावर वसुलीची जबाबदारी निश्चीत करण्यात यावी, अशी मागणी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे केली आहे.

****

मराठा आरक्षण बाबतीत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे बाजू मांडत असल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते सांगली इथं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असून पुर्वीच्या फडणवीस यांच्या सरकारनं नियुक्त केलेल्या वकिलांबरोबर आघाडी सरकारनं अन्य दोन वकील नियुक्त केले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. न्यायालय मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबत योग्य न्याय देईल, असं ते म्हणाले. सांगली जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेमुळे ७० अब्ज घनफूट पाणी साठा झाल्याची फसवी घोषणा तत्कालीन सरकारनं केली होती पण पाणीसाठा तर झाला नाही, मात्र पाणी गळती खुप झाली, असं जलसंपदा मंत्री पाटील यांनी सांगितलं.

****

दक्षिण रेल्वेनं घोषित केल्यानुसार रामेश्वरम-ओखा-रामेश्वरम उत्सव विशेष गाडीच्या या महिन्यात सहा फेऱ्या होणार आहेत. या अंतर्गत गाडी उद्यापासून २५ डिसेंबर दरम्यान दर शुक्रवारी रामेश्र्वरम इथून रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी सुटणार असल्याचं रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कळवलं आहे. मदुराई, तिरुपती, काचीगुडा, नांदेड, औरंगाबाद, अहमदाबाद मार्गे ओखा इथं सोमवारी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी पोहचणार आहे. ओखा - रामेश्र्वरम उत्सव विशेष गाडी ओखा इथून पंधरा  ते २९ डिसेंबर दरम्यान दर मंगळवारी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल. राजकोट, अहमदाबाद, औरंगाबाद, नांदेड, काचीगुडा, तिरुपती, मदुराई मार्गे रामेश्र्वरम इथं गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजता पोहचेल. पूर्णतः आरक्षित असलेल्या या गाडीला  १९ डबे असतील, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

****

राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या पार्थीव देहावर आज दुपारी पालघर जिल्ह्यातल्या वाडा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा डॉ. हेमंत सावरा यांनी त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला. विष्णू सावरा यांचं काल संध्याकाळी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं होतं. विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसंचं जिल्ह्यातले आमदार, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अंत्यसंस्काराला उपस्थित होते.

****

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीन या देशांचा हात असल्याच्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कथित विधानाचा नाशिक इथं काँग्रेस सेवादलाच्या वतीनं आज निषेध करण्यात आला आणि त्यांच्या राजिनाम्याची मागणी करण्यात आली. धुळे जिल्ह्यात शिरपुर इथंही काँग्रेस, प्रहार जनशक्ती, भारतीय कम्युनिष्ठ पक्ष, शिवसेना या पक्षांच्या वतीनं दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं आणि त्यांच्या राजिनाम्याची मागणी करण्यात आली.

****

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ४० रुग्ण आज आढळले आहेत. जिल्ह्यात या संसर्गाच्या एकूण रुग्णांची संख्या आता ११ हजार ६९८ झाली आहे. जिल्ह्यातल्या ३० रुग्णांना आज उपचार घेऊन बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

****////****

 

No comments:

Post a Comment