Sunday, 13 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 December 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 December 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १३ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** राज्य विधीमंडळाचं उद्यापासून मुंबईत दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन

** सरकार जनतेच्या प्रश्र्नांपासून पळ काढत असल्याची टीका करत भाजपचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

** औरंगाबाद जिल्ह्यात आज चार कोविड बाधितांचा मृत्यू; जालना जिल्ह्यात आज १५ रुग्णांना सुटी

आणि

** बारावीच्या परीक्षेसाठी परवा, मंगळवारपासून अर्ज दाखल करता येणार 

****

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. उद्या आणि परवा दोन दिवस हे अधिवेशन चालणार आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार आहे. त्या अनुषंगानं मंत्रालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, कोरोना, अवकाळी पावसानं झालेले शेतकऱ्यांचं नुकसान, आदी विषय अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. महिला अत्याचाराच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद असलेला शक्ती हा कायदा या अधिवेशनात संमत होण्याची शक्यता आहे. या कायद्याच्या मसुद्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत याआधीच मान्यता देण्यात आली. परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी दोन्ही सदनाचे विरोधी पक्षनेते, गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना चहापानाला आमंत्रित केलं आहे.

सरकारच्या या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी कमी करून सरकार जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढत असल्याची टीका करत, हे अधिवेशन किमान दोन आठवड्यांचं हवं होतं, असं फडणवीस म्हणाले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेलं हेक्टरी २५ हजार तसंच ५० हजार रुपये मदतीचं आश्वासन न पाळत, सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. कोविड विरुद्धच्या लढाईत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार पहायला मिळाला, या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी फडणवीस यांनी केली. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, महिला सुरक्षा, मेट्रो कारशेड, यासह विविध मुद्यावरून फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर टीका केली.

****

इलेक्ट्रिक वाहनं, वायूरुपी तसंच द्रवरुपी इंधनावर चालणारी वाहनं हे भारतीय वाहनक्षेत्राचं भविष्य असून यासाठी लागणाऱ्या सुट्या भागाच्या निर्मितीचं मुख्य केंद्र म्हणून नागपूर विकसित व्हावं, असं केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं हिंगणा औद्योगिक वसाहतीत केंद्रीय सुक्ष्म लघू उद्योग मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा कामांचा प्रारंभ करताना बोलत होते. विद्युत वाहनांचा वापर करून खर्चात बचत व्हावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. वाहन उद्योगांना लागणाऱ्या सुट्या भागांची निर्मीती करणाऱ्या कंपन्याना एक सामायिक सुविधा या अंतर्गत उपलब्ध होणार आहे.

****

`रिपब्लिक टीव्ही`चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदांनी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकानं ही कारवाई केली. आपलीच दूरचित्रवाहिनी लावून ठेवावी, या करता घरोघऱी पैसे वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. `फक्त मराठी`, `बॉक्स सिनेमा` या वाहिन्यांवरही हा आरोप ठेवण्यात आला असून तेरा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

****

केंद्र सरकारनं लागू केलेले तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांचा हिताचे असल्याचं, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कृषी सुधार कायदे रद्द करण्याची मागणी विरोधक आणि शेतकरी संघटना करत असले तरी आपण या मागणीशी सहमत नाही, येत्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या संसदीय अधिवेशनात या कायद्यात सुधारणा करण्याची तयारी सरकारनं दर्शवली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकत्र येणं शक्य नाही, मात्र तसं झालं तर याचा मोठा फायदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच होईल, असंही आठवले म्हणाले.

****

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असलेल्या तीन कृषी कायद्यांसंदर्भात विरोधकांकरून चुकीचा प्रचार सुरू असून, मूठभर दलाल तसंच काळा बाजार करणाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी दिशाभूल दूर होणं आवश्यक असल्याचं, जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज जळगाव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्या प्रवृत्ती हे शेतकरी आंदोलन चिघळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांचा खरा चेहरा समोर आणणं तसंच या कृषी कायद्यांबाबत वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं पाटील यांनी नमूद केलं.

****

कृषीसुधार कायद्यावर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाला योग्य  आणि खरी माहिती मिळावी, तसंच विरोधी पक्षांकडून होत असलेल्या चुकीच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारनं एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. ‘पुटींग फार्मर्स फस्ट’ असं पुस्तिकेचं नाव असून पत्र सूचना कार्यालयाच्या संकेतस्थळावर ही पुस्तिका उपलब्ध आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज चार कोविड बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या एक हजार १७३ झाली आहे. दरम्यान, औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज १० नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४४ हजार ३१७ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२ हजार ५१३ जणांनी या विषाणू संसर्गावर मात केली असून, जिल्ह्यात सध्या ६३३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोना विषाणू संसर्ग झालेले नवीन नऊ रुग्ण आढळले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता बारा हजार ७४८ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या १५ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले बारा हजार ११० रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ३०५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

****

कोविड संसर्गापासून बचावासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी केलं आहे.

****

भारत ही संतांची भूमी असून संतांनी समाज प्रबोधनाचं कार्य करण्यासोबतच देश जोडण्याचंही कार्य केलं, असं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. सुषमा नहार यांनी संपादित केलेल्या ‘गुरु ग्रंथसाहिब मधील संत नामदेव’ या पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते आज पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात झालं त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाचं संत नामदेव अध्यासन आणि सरहद पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं संत नामदेव यांच्या साडे सातशेव्या जयंती वर्षात देशभर राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांना १५ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान, तर पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार आणि व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ५ जानेवारी ते १८ जानेवारीदरम्यान अर्ज करता येणार आहे. खासगी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार असल्यानं, या कालावधीत विद्यार्थ्यांनी अर्ज भरू नये, असं शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या सैनिकाला जम्मू काश्मीरमधील नवसेरा भागात देशसेवा करत असताना वीरमरण आलं. मेजर सुरेश रघुनाथ घुगे असं त्यांचं नाव असून, नांदगाव तालुक्यातल्या आस्ते गावाचे मूळ रहिवासी आहेत. घुगे यांचा पार्थिव देह पुणे मार्गे आस्ते या त्यांच्या मूळ गावी आणला जाणार असून उद्या सकाळी अंत्यसंस्कार होणार आहे.

****

परभणी औद्योगिक वसाहतीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीच्या माहितीची चोरी तसंच संगणकीय माहिती नष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यानं कंपनीचे प्रशिक्षणाच्या चित्रफिती, एक्सेल डाटा, वायरिंग डायग्राम, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आणि अन्य माहिती वैयक्तीक फायद्यासाठी चोरी केली. तसंच कंपनीच्या संगणकातली माहिती नष्ट करून, कंपनीला नुकसान पोहोचवल्याचं या  फिर्यादीत म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथल्या शिवाजी विद्यालयाचा मुख्याध्यापक बबन झोटे याला एक हजार ८० रुपये लाच घेताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केली. सहशिक्षकाला भविष्य निर्वाह निधीतून अग्रीम रकमेच्या मंजुरीसाठी झोटे यानं लाच मागितली होती.

****

राज्याच्या काही भागांमध्ये आज पाऊस झाला. नाशिकमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. औरंगाबाद शहर परिसरातही पावसाची भुरभूर सुरू होती. या पावसामुळे गहू, तूर आणि हरभरा या पिकांवर दुष्परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

****////****

 

No comments:

Post a Comment